रिटर्नची गॅरंटी; अशा स्कीम्सचे फायदे काय? जाणून घ्या 'योजना भारी'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2022 12:35 PM2022-09-18T12:35:41+5:302022-09-18T12:47:26+5:30

चंद्रकांत दडस, उपसंपादक तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी बचत करायची असेल, तर तुम्ही वेळोवेळी विविध योजनांत गुंतवणूक करावी. आजकाल बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत; पण तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे. तुमच्या खिशातील पैशा अधिकाधिक बचत करणाऱ्या योजना कोणत्या ते पाहू...

तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी बचत करायची असेल, तर तुम्ही वेळोवेळी विविध योजनांत गुंतवणूक करावी. आजकाल बाजारात गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत; पण तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे. तुमच्या खिशातील पैशा अधिकाधिक बचत करणाऱ्या योजना कोणत्या ते पाहू...

गुंतवणुकीला सुरुवात कधी करावी? तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यात गुंतवणूक करण्याचा विचार केला पाहिजे. जेणेकरून तुम्ही तुमच्या भविष्यासाठी पैसे सुरक्षित करू शकता. मुदत ठेव हा गुंतवणुकीचा एक सर्वोत्तम पर्याय आहे. मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक केल्यावर, बचत खात्याच्या तुलनेत तुम्हाला अधिक व्याज मिळते.

मुदत ठेव खाते उघडण्यासाठी तुम्ही कोणत्याही खासगी किंवा सरकारी बँकेत जाऊ शकता. खात्याशी संबंधित काही कागदपत्रे जमा करून तुम्ही तुमचे पैसे अगदी सहजपणे यामध्ये गुंतवू शकता. या गुंतवणुकीची खास गोष्ट म्हणजे जर तुम्हाला पैशांची गरज असेल तर तुम्ही येथून सहज पैसे काढू शकता.

मुदत ठेव (एफडी) मुदत ठेव ही बचत योजना आहे. ज्यामध्ये ठरावीक कालावधीसाठी रक्कम गुंतवली जाते. यामध्ये, कार्यकाळ पूर्ण झाल्यावर, गुंतवलेल्या रकमेवर निश्चित व्याजदराने पैसे मिळतात. एफडीमध्ये, तुम्हाला परिपक्वतेवर मुद्दल आणि चक्रवाढ व्याज मिळते.

आरडी योजना आरडी स्कीममधील बचतीचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात कोणत्याही जोखमीशिवाय उत्तम परतावा मिळतो. आर.डी.मधील गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. आर.डी.मध्ये जमा केलेल्या पैशाची हमी सरकारकडून दिली जाते. या योजनेतील गुंतवणूक कधी बुडली, तर त्याची भरपाई सरकारकडून केली जाते.

सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी (पीपीएफ) सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ हीदेखील सरकारद्वारे चालवली जाणारी योजना आहे. यामध्येही गुंतवणूक १०० टक्के सुरक्षित राहते. पीपीएफवरील व्याजदर सरकार ठरवते. पीपीएफमधील गुंतवणुकीसाठी, आर्थिक वर्षात एकरकमी किंवा जास्तीत जास्त १२ हप्त्यांमध्ये पैसे जमा केले जाऊ शकतात.

या योजनेत १.५ लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक करता येते. पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराला तीन प्रकारचे कर लाभ आहेत. पीपीएफमध्ये गुंतवलेल्या पैशांवर करकपातीचा लाभ तर मिळतोच; शिवाय व्याज आणि मॅच्युरिटी रकमेवर कोणताही कर लागत नाही. पीपीएफ खातेधारकाला खाते उघडण्याच्या एक वर्षाच्या समाप्तीनंतर त्याच्या ठेवींवर कर्ज मिळू शकते.

दररोज २५० रुपयांची बचत करून मिळवा २४ लाख रोजची बचत : २५० रुपये मासिक बचत : ७५०० रुपये वार्षिक बचत आणि गुंतवणूक : ९०,००० रुपये

व्याजदर : वार्षिक ७.१ टक्के चक्रवाढ १५ वर्षांनंतर परिपक्वतेवर रक्कम : २४.४० लाख रुपये एकूण गुंतवणूक : १३.५० लाख रुपये व्याज लाभ : १०.९१ लाख

गुंतवणूक करण्याअगोदर योजनेची सखोल माहिती घेऊनच, खात्री करुनच पैसे गुंतववावेत. कारण, बाजारात स्पर्धेमुळे अनेक फसव्या कंपन्याही संधी साधत आहेत