छोट्या दुकानातून सुरुवात अन् आज 78000 कोटींचा ब्रँड; अशी आहे Haldiram ची कहानी...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2024 04:10 PM2024-07-30T16:10:55+5:302024-07-30T16:14:33+5:30

Haldiram Business : तुमचा आवडता ब्रँड हल्दीराम ब्रँड लवकरच विकला जाणार आहे. 78000 कोटी रुपयांमध्ये हा करार होईल.

Haldiram Success Story : हल्दीरामचे नाव ऐकताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटते. सर्वसामान्यांपासून ते देशातील उच्चभ्रू लोकांपर्यंत, अनेकांच्या घरात हल्दीरामचे प्रोडक्ट पाहायला मिळतात. हल्दीराम कंपनीने स्वातंत्र्याच्या आधीपासून ते ते एकविसाव्या शतकापर्यंतचा प्रवास केला आहे. एकेकाळी एका छोट्या दुकानातून सुरू झालेली व्यवसाय आज हजारो कोटींचा ब्रँड बनला आहे. पण, आता याच हल्दीरामबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा फूड ब्रँड विकण्याच्या मार्गावर आहे. हल्दीराम खरेदी करण्याच्या शर्यतीत परदेशी कंपन्याही रांगेत उभ्या आहेत.

अलीकडेच ब्लॅकस्टोन इंक, अबू धाबी इनवेस्टमेंट अथॉरिटी आणि सिंगापूर स्टेट फंड जीआईसीने हल्दीरामसाठी बोली लावली होती. पण, आता अशा बातम्या येत आहेत की, ब्लॅकस्टोन इंक या भारतीय स्नॅक्स ब्रँडमध्ये 78000 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीसह कंपनीतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्यास तयार आहे. विशेष म्हणजे, हल्दीराम विकत घेण्याच्या शर्यतीत टाटा आणि पेप्सीदेखील सामील आहे. परंतु मूल्यांकनावर चर्चा न झाल्याने अंतिम करार होऊ शकला नाही. हा करार होण्यास उशीर होण्याचे कारण म्हणजे, ब्लॅकस्टोनला हल्दीराममधील 74 टक्के भागभांडवल खरेदी करायचे होते.

पण हल्दीरामचे व्यवस्थापन करणाऱ्या अग्रवाल कुटुंबाला 51 टक्क्यांपेक्षा जास्त हिस्सा विकायचा नव्हता. हा करार झाला, तर देशातील FMCG क्षेत्रातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा करार असेल. विशेष म्हणजे, एकट्या हल्दीरामने देशातील 13 टक्के स्नॅक्स मार्केट व्यापले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डीलपूर्वी हल्दीरामचे तीन भाग एकत्र केले जातील. अग्रवाल कुटुंब हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडच्या हल्दीराम स्नॅक फूड प्रायव्हेट लिमिटेडचे ​​मालक असेल. हल्दीरामचा व्यवसाय तीन भागात विभागलेला आहे.

नागपूरचा व्यवसाय हल्दीराम फूड्स इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आणि दिल्लीचा व्यवसाय हल्दीराम स्नॅक्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारे हाताळला जातो. त्यांच्या विलीनीकरणानंतर हल्दीराम स्नॅक्स फूड्स प्रायव्हेट लिमिटेड नावाची नवीन कंपनी स्थापन केली जाईल. दिल्लीचे मनोहर अग्रवाल आणि मधु सुदन अग्रवाल यांची त्यात 55 टक्के भागीदारी असेल, तर नागपूरचे कमलकिशन अग्रवाल यांची 45 टक्के भागीदारी असेल.

थोड्या पैशातून सुरू झालेली कंपनी आज 78000 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. हल्दीरामची सुरुवात 1937 मध्ये गंगाभिशन अग्रवाल यांनी केली होती. बिकानेरमध्ये रस्त्याच्या कोपऱ्यावर एका छोट्याशा दुकानात भुजिया विकणाऱ्या गंगाभिशन यांना त्यांची आई लाडाने हल्दीराम म्हणायची. त्यामुळे त्यांनी आपल्या दुकानाचे नाव हल्दीराम भुजियावाला ठेवले. लोकांना त्याच्या भुजियाची चव इतकी आवडली की, हळूहळू त्यांनी आपल्या व्यवसायाचा विस्तार केला.

व्यवसायाला पुढे नेण्यासाठी गंगाभिशन अग्रवाल यांनी बिकानेरचे महाराजा डुंगर सिंग यांच्या नावावर भुजियाचे नाव 'डुंगर शेव' ठेवले. महाराजांच्या नावाने भुजिया मिळालया लागल्यावर विक्रीत कमालीची वाढ झाली. त्यावेळी 5 पैसे किलो दराने विकली जाणारी डुंगर शेव बिकानेरमध्ये प्रसिद्ध झाली होती. 1941 पर्यंत हल्दीराम नमकीन संपूर्ण बिकानेरमध्ये प्रसिद्ध झाले. लग्नासाठी कोलकात्याला गेल्यावर त्यांनी तेथील लोकांना आपल्या पदार्थांची चव चाखायला लावली. लोकांना ती आवडली, म्हणून त्यांनी कोलकात्यातही दुकान उघडले. कोलकाता नंतर, हल्दीरामचे पहिले स्टोअर 1970 मध्ये नागपुरात सुरू झाले. 1982 मध्ये हल्दीराम दिल्लीला गेले. फक्त आठवी उत्तीर्ण झालेल्या गंगाभिशन अग्रवाल यांनी सुरू केलेला हल्दीरामचा व्यवसाय आज 40 हून अधिक देशांमध्ये पसरला आहे.