Half Pant Ban in Banks: हाफ पँटमधील ग्राहक बँकेत जाऊ शकत नाहीत?; मॅनेजरच्या नोटीशीची सर्वत्र चर्चा, काय सांगतो नियम..

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 12:05 PM2022-09-01T12:05:01+5:302022-09-01T12:11:32+5:30

Half Pant customers Ban in Banks: बँकेत जाणाऱ्या ग्राहकांसाठी देखील ड्रेसकोड असतो का? SBI ने देखील जानेवारीत एका ग्राहकाला फुल पँट घालून ये म्हणत परत पाठविले होते.

बँकेत जाणाऱ्या ग्राहकांसाठी देखील ड्रेसकोड असतो का? कॅनरा बँकेच्या एका ब्रँच मॅनेजरने हाफ पँट घालून येणाऱ्या पुरुषांना बँकेत प्रवेश नसल्याची नोटीस लावली आणि याची चर्चा होऊ लागली आहे. उत्तर प्रदेशच्या बागपत जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. धक्कादायक म्हणजे एसबीआयच्या ग्राहकाला देखील जानेवारीमध्ये बँकेने फुल पँट घालून ये असे सांगत माघारी पाठविले होते.

शाखा व्यवस्थापक अर्चना कुमारी यांनी 26 ऑगस्ट रोजी नोटीस चिकटवली आहे. यामध्ये बँकेचे बरेच ग्राहक तरुण आहेत, जे हाफ पँट घालून बँकेत येतात. बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी या हाफ पँटवाल्या तरुणांमुळे लक्ष विचलित होत असल्याची लेखी तक्रार केली आहे. त्यामुळे त्यांना काम करणे अवघड होते, असे त्या तक्रारीत म्हणाल्या आहेत, असे कुमारी यांनी म्हटले आहे.

बँक मॅनेजरने हाफ पँटमध्ये येऊ नका, अशी नोटीस बजावली आहे, याबाबत ग्राहकांचे अधिकार काय? याबाबत अॅडव्होकेट सचिन नायक यांनी दै.भास्करला सांगितले की, बिकिनी किंवा अंडरगारमेंट्स वगळता ग्राहक त्यांना हवे ते घालू शकतात. मात्र, नग्नता नसावी, अशा परिस्थितीत ग्राहकांवर कायदेशीर कारवाईही होऊ शकते. काय सांगतात सार्वजनिक परिसरात कपडे घालण्याचे नियम...

एखादी व्यक्ती कपडे न घालता किंवा खूपच कमी कपडे घालून सार्वजनिक ठिकाणी जात असेल तर त्याला नग्नता म्हणतात. असे केल्यास आयपीसी कलम 294 अंतर्गत कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यामध्ये कोणत्याही व्यक्तीला तीन महिन्यांपर्यंतच्या तुरुंगवासाची किंवा दंडाची किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

बँक ग्राहकांसाठी बनवली आहे. ग्राहक बँकेसाठी बनलेले नाहीत. कपड्यांबाबत नोटीस जारी करणे म्हणजे तुम्ही ग्राहकांना बँकेत येण्यास बंदी घालत आहात. ग्राहक बँकेत येतोय की नाही याचा बँकेला फरक पडत नाही, हे चुकीचे आहे. शाखा व्यवस्थापकाने हाफ पँट घालून येऊ नका, अशी नोटीस बजावली आहे, यावर ग्राहक काय करू शकतात?

शाखा व्यवस्थापकाचे अधिकारी कर्मचाऱ्यांपर्यंत असल्याने ग्राहकावर तो त्याचे निर्णय लादू शकत नाही. ते कर्मचाऱ्यांना ड्रेसकोडचे बंधन टाकू शकतात. ग्राहकांनी नग्नता दाखवल्यास शाखा व्यवस्थापक त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करू शकतात. परंतू, हाफ पँटवर ते कारवाई करू शकत नाहीत.

बँक व्यवस्थापक केवळ ग्राहकांच्या प्रवेशावर बंदी घालू शकतात. याविरोधात ग्राहक शाखा व्यवस्थापकाकडे तक्रार करू शकतो. जर व्यवस्थापकाने कोणतीही कार्यवाही केली नाही तर ते झोनल ऑफिसरकडे लेखी तक्रार करू शकतात. तसेच कोणतीही बँक आपल्या ग्राहकांना लंच टाईमच्या नावाखाली थांबवू शकत नाही. तसेच हे कर्मचारी एकाच वेळी जेवणासाठी जाऊ शकत नाहीत. तरी देखील बँक कर्मचारी सर्रास मनमानी करत असतात.