HBD Ratan Tata: ९ वर्ष ३६ कंपन्या टेकओव्हर! रतन टाटांची अफाट कारकीर्द; Tata ग्रुपचा अवाका पाहून व्हाल अवाक् By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 12:32 PM 2022-12-28T12:32:41+5:30 2022-12-28T12:46:16+5:30
HBD Ratan Tata: मिठापासून ते संरक्षण दलांसाठी विमाने तयार करण्यापर्यंत तब्बल ३० कंपन्यांचे परिचालन करणारा रतन टाटांचा TATA ग्रुप जगातील १०० हून अधिक देशांमध्ये पसरलेला आहे. टाटा ग्रुपचे चेअरमन रतन टाटा (Ratan Tata Birthday) देशातील सर्वात मोठ्या उद्योगपतींपैकी एक आहेत. ते किती श्रीमंत आहेत हेही कुणाला वेगळे सांगायला नको. २८ डिसेंबर रोजी रतन टाटा यांचा वाढदिवस असतो. रतन टाटा यांचा साधेपणा आणि विनम्रता ही त्यांची ओळख आहे. रतन टाटा हे देशातील सर्वात मोठ्या दानशूरांपैकी एक आहेत.
TATA ग्रुप आताच्या घडीला अनेकविध क्षेत्रात दमदार कामगिरी करत आहे. टाटा समूह जगातील सर्वांत यशस्वी उद्योगांपैकी एक असून, ऑटोमोबाइल, विमान, इन्सुरन्स, स्टील, केमिकल अशा अनेकविध क्षेत्रात टाटा ग्रुपने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.
रतन टाटा यांचा केवळ भारतात नाही, तर जगभरात दबदबा आहे. रतन टाटा यांनी अनेक रसातळाला गेलेल्या कंपन्यांना नवसंजीवनी दिल्याचे सांगितले जाते. रतन टाटा यांची जीवन प्रवास हा तितकाच रंजक आणि संघर्षमय आहे. टाटांसारख्या बड्या कुटुंबात जन्मलेल्या रतन टाटा यांना सर्व गोष्टी सहजरित्या मिळाल्या असे नाही. त्यासाठी त्यांनाही कष्ट करावे लागले.
रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी (Ratan Tata Birth Date) झाला. इयत्ता आठवीपर्यंत रतन टाटा यांनी मुंबईतील कॅम्पियन स्कूल येथे आपले शालेय शिक्षण घेतले. यानंतर कॅथेड्रल अँड जॉन कॉनन स्कूल आणि शिमला येथील बिशप कॉटन स्कूल येथून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. (Ratan Tata Education)
यानंतर रतन टाटा परेदशात शिक्षणासाठी गेले. सन १९५५ मध्ये रतन टाटा यांनी न्यूयॉर्क सिटीमधील रिवरडेल कंट्री स्कूल येथून पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. तर १९५९ मध्ये कॉर्नेल विद्यापीठातून आर्टिटेक्चरची पदवी घेतली. हार्वर्ड बिझनेस स्कूल येथून ७ आठवड्यांचा अॅडवान्स्ड मॅनेजमेंट प्रोग्राम पूर्ण केला. यानंतर रतन टाटा यांनी मागे वळून पाहिले नाही, असे सांगितले जाते. (Ratan Tata Career)
सुरुवातीच्या काळात अनुभव घेण्यासाठी रतन टाटा यांनी टाटा सन्समध्ये काम करायला सुरुवात केली. विद्यार्थी जीवनात रतन टाटा यांना विमान उडवण्याचा मोठा छंद होता. एकदा संधीही मिळाली होती. मात्र, त्यावेळेस पैसे नसल्यामुळे संधी साध्य करता येत नव्हती. विमान उडवता आले पाहिजे, यासाठीच्या शिक्षणासाठी रतन टाटा यांनी वेळेप्रसंगी धुणीभांडी करण्याचेही काम केले.
अमेरिकेतील आपल्या १० वर्षांच्या विद्यार्थी जीवनातील वास्तव्यात रतन टाटा यांनी अनेक ठिकाणी नोकऱ्या केल्या. हॉटेल, रेस्टॉरंट यांसारख्या ठिकाणीही कामे केली. आज तेच रतन टाटा जगभरातील अनेक उद्योजकांपैकी आघाडीचे उद्योजक आहेत.
टाटा कंपनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करते. रतन टाटा यांची मेहनत आणि कठोर परिश्रम यामुळे टाटा यांचे नावलौकीक आहे. आज मेहनतीच्या जीवावरच टाटा यांच्या कुठल्याही गोष्टीची कमतरता नाही. रतन टाटा यांनी सर्वसामान्यांसाठी एक स्वप्न पाहिले होते. प्रत्येक माणसाला चारचाकीतून फिरता यावे यासाठी रतन टाटांनी त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट नॅनो ही कार भारतात सर्वात स्वस्त कार बाजारात आणली.
रतन टाटा यांच्याकडे कार आहेत तसे फाइट जेटही आहेत. त्यांच्याकडे पायलटचे लायसन्स आहे. एकेकाळी भारतीय एअर फोर्स ए-१६ फायटर जेट त्यांनी उडवले आहे. मिठापासून ते संरक्षण दलांसाठी विमाने तयार करण्यापर्यंत ३० कंपन्यांचे परिचालन टाटा समूहाच्या अंतर्गत केले जाते.
सन २००० मध्ये जेव्हा टाटा टीने टेटली ताब्यात घेतली तेव्हा जागतिक स्तरावर टाटांची सुरुवात झाली. त्यांनी अवघ्या ९ वर्षात जवळपास ३६ कंपन्या टेकओव्हर केल्या. टेटली टेकओव्हरनंतर त्यांनी अनेक छोटे-मोठे टेकओव्हर केले. यामध्ये टाटा स्टीलने अँग्लो-डच पोलाद निर्मात्या कोरसचे अधिग्रहण आणि टाटा मोटर्सने ब्रिटीश ऑटोमोबाईल कंपनी जग्वार आणि लँड रोव्हरचे अधिग्रहण समाविष्ट केले आहे.
रतन टाटा यांनी भारतातील पहिले स्वदेशी वाहन टाटा इंडिका भारतीय बाजारात लॉंच केली होती. भारताची ही पूर्णपणे स्वदेशी कार १९९८ च्या ऑटो एक्स्पो आणि जिनिव्हा इंटरनॅशनल मोटर शोमध्ये सादर करण्यात आली होती. टाटा इंडिका पेट्रोल आणि डिझेल इंजिनसह उपलब्ध होती.
रतन टाटा यांचा नेहमीच दान आणि मदत करण्यावर विश्वास आहे. रतन टाटांनी एका ट्रस्टची स्थापना ८० लाख रुपयांच्या निधीसह केली. आजच्या घडीला टाटा ट्रस्ट भारतातील सर्वांत जुने आणि सर्वात प्रतिष्ठित धर्मादाय संस्था म्हणून अस्तित्वात आहेत. टाटा सन्स ही टाटा समूहाच्या कंपन्यांची प्रमुख प्रवर्तक संस्था आहे. टाटा सन्सचे ६६ टक्के इक्विटी शेअर्स हे चॅरिटेबल ट्रस्टकडे आहेत जे आरोग्य, शिक्षण, कला आणि संस्कृती आणि इतर धर्मादाय संस्थांना समर्थन देतात.
आताच्या घडीला जगभरात १० क्लस्टर अंतर्गत तब्बल ३० कंपन्यांचे परिचालन TATA समूहाकडून केले जाते. एवढेच नव्हे, तर जगातील १०० हून अधिक देशांमध्ये TATA ग्रुपचा पसरलेला आहे. देशातील कोट्यवधी नागरिक दररोज टाटाच्या उत्पादनाचा लाभ घेत असतात.
रतन टाटा यांना सन २००० मध्ये पद्मभूषण आणि सन २००८ मध्ये पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. देशातील हा तिसरा आणि दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे. तसेच रतन टाटा यांना अनेकविध लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
रतन टाटा यांचा लक्झरी बंगला मुंबईतील कुलाबा भागात आहे. या बंगल्यात अनेक रूम्स, जिम, स्वीमिंग पूल, सन डेक, बार, लॉन्जसहीत अनेक आधुनिक सुविधा आहेत. रतन टाटा यांच्याकडे डसॉल्ट फाल्कन २००० प्रायव्हेट जेटही आहे. फ्रान्सच्या इंजिनिअरांनी तयार केलेल्या या जेटची किंमत साधारण ३० मिलियन डॉलर म्हणजेच २२४ कोटी रूपये असल्याचं सांगितले जाते. रतन टाटा हे स्वत: पायलट आहेत आणि अनेकदा ते हे जेट स्वत: उडवतात.