शिव नाडर यांचा मोठा निर्णय; मुलीच्या खांद्यावर सोपवली HCL ची जबाबदारी...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 14:02 IST2025-03-09T13:54:02+5:302025-03-09T14:02:09+5:30
HCLTech Succession : HCL Technologies चे संस्थापक शिव नाडर यांचा मोठा निर्णय!

HCLTech Succession Plan: देशातील आघाडीची तंत्रज्ञान (IT) कंपनी HCL Technologies चे संस्थापक शिव नाडर (Shiv Nadar) यांनी यांनी आपल्या मुलीला उत्तराधिकारी बनवले आहे.
यासह त्यांनी HCL कॉर्प आणि वामा दिल्लीमधील 47 टक्के भागभांडवल मुलगी रोशनी नादर-मल्होत्रा हिच्या नावे केले आहे. शिव नाडर यांच्या निर्णयानंतर रोशनी, HCL टेक्नॉलॉजीजची सर्वात मोठी शेअरहोल्डर बनली आहे.
एचसीएल टेकने स्टॉक एक्सचेंजमध्ये दाखल केलेल्या नियामक फाइलिंगमध्ये ही माहिती दिली आहे. कंपनीने सांगितले की, 6 मार्च 2025 रोजी शिव नाडर यांनी मुलगी रोशनी नादर मल्होत्राच्या नावे दोन 'गिफ्ट डीड' केले.
पहिले गिफ्ट म्हणजे, शिव नाडर यांनी वामा सुंदरी इन्व्हेस्टमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (वामा दिल्ली) मधील 47 टक्के हिस्सा रोशनीला भेट म्हणून हस्तांतरित केला आहे. दुसरे गिफ्ट म्हणजे, एचसीएल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडमधील 47 टक्के हिस्सा त्यांच्या मुलीला हस्तांतरित केला.
शिव नाडर आणि रोशनी हे दोघेही कंपनीचे प्रवर्तक आहेत, असेही फाइलिंगमध्ये सांगण्यात आले. तसेच, दोघेही वामा दिल्ली आणि एचसीएल कॉर्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेडचे भागधारक असून, हा कंपनीचे प्रवर्तक गट आहेत.
शिव नाडर यांनी वारसा सुव्यवस्थित करण्यासाठी, स्थिरता आणि नियंत्रण सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने भेटवस्तू डीडची अंमलबजावणी एका खाजगी कौटुंबिक व्यवस्थेनुसार केली आहे. HCL टेक्नॉलॉजीचा या कराराशी कोणताही संबंध नाही, असेही फाइलिंगमध्ये म्हटले आहे.
हा बदल सुलभ करण्यासाठी शेअर बाजार नियामक SEBI ने रोशनी नादर मल्होत्रा यांना ओपन ऑफर करण्यापासून सूट दिली आहे. या हस्तांतरणापूर्वी, शिव नाडर यांच्याकडे वामा दिल्ली आणि एचसीएल कॉर्पमध्ये 51 टक्के भागीदारी होती, तर रोशनी नाडर मल्होत्रा यांच्याकडे 10.33 टक्के भागीदारी होती. रोशनी नादर मल्होत्रा जुलै 2020 पासून HCL टेकच्या अध्यक्षा आहेत. आता त्यांच्याकडे कंपनीचे नेतृत्व आले आहे.