'सुब्बू'च घोटाळेबाज 'हिमालयातील साधू'?; CBI ला संशय, नेत्याच्या दबावामुळे प्रकरण दाबल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 12:44 PM2022-02-22T12:44:22+5:302022-02-22T13:00:05+5:30

एका साधूच्या सल्ल्याने कोट्यवधी रुपयांचे भांडवल असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्णय घेणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांची सीबीआयकडून चौकशी सुरूच आहे.

एका साधूच्या सल्ल्याने कोट्यवधी रुपयांचे भांडवल असलेल्या राष्ट्रीय शेअर बाजाराचे निर्णय घेणाऱ्या चित्रा रामकृष्ण यांची सीबीआयकडून चौकशी सुरूच आहे. या प्रकरणात हिमालयात राहणारा साधू हा दुसरा-तिसरा कोणी नसून, आनंद सुब्रमण्यम अर्थात सुब्बूच असल्याचा संशय वाढत चालला आहे, तर दुसरीकडे अर्थमंत्रालयातील मोठा अधिकारी हाच साधू म्हणून वावरत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

आनंद सुब्रमण्यम हा सुरुवातीला एका पेट्रोलियम कंपनीत काम करीत होता. तेथे त्याला १५ लाख रुपये पगार होता. मात्र, चित्रा रामकृष्ण यांनी त्याला शेअर बाजाराची कोणतीही माहिती नसताना थेट वरिष्ठ पदावर बसविले आणि पगारही १५ लाखांवरून ४ कोटी २१ लाख रुपये दिला, असे सेबीने म्हटले आहे.

योगी आणखी दुसरा-तिसरा कोणी नसून आनंद सुब्रमण्यम हाच असावा, या शक्यतेपर्यंत सेबी आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा तपास आला होता.

कन्सल्टन्सी फर्म ई अँड वायच्या न्यायवैद्यक तपासात असे म्हटले आहे की, चित्रा रामकृष्ण यांना स्वतः आनंद सुब्रमण्यम हाच निर्णय घेण्यास भाग पाडत होता. तसे निर्देश देत होता, असे सेबी म्हणते.

सुब्रमण्यम यांच्या डेस्कटॉपवर anand.subramanian९ आणि sironmani.१० या नावाने स्काइप खाते आढळून आले होते. ही खाती rigyajursama@outlook.com आणि आनंद सुब्रमण्यम यांच्या मोबाइलशी जोडली गेली होती.

मात्र, याचा ठोस पुरावा सेबीला सापडलेला नाही. हे प्रकरण सेबी, एनएसईवर दिल्लीतील नेत्यांकडून दबाव आल्यामुळे दाबले गेले, असा संशय यामुळे निर्माण झाला आहे.

चित्रा यांच्याकडून झालेल्या गंभीर चुका आणि गैरवर्तनाची माहिती एनएसई संचालक मंडळाला होती. मात्र, यात सर्वांचेच अप्रत्यक्षपणे हात गुंतल्याने या घोटाळ्याची माहिती सेबीला देण्यात आली नाही आणि अखेर चित्रा या चमकदार कामगिरी करणाऱ्या महिला अध्यक्षा, म्हणून स्तुतिसुमने उधळून घेत राजीनामा देत बाहेर पडल्या. या कार्यक्रमाला एनएसईतील वरिष्ठ अधिकारी, माजी अर्थसचिव, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, कंपनी व्यवहार मंत्रालयाचे माजी सचिव यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा साधू वैगेरे कोणी नसून अर्थमंत्रालयातील मोठा अधिकारी असण्याची शक्यता आहे. या अधिकाऱ्यानेच चित्रा रामकृष्ण यांचे करिअर घडविले होते. संबंधित व्यक्तीला राष्ट्रीय शेअर बाजारातील कामकाज आणि अधिकारी यांची सर्व माहिती होती.

आनंद हा बाहेरील व्यक्ती होता आणि त्याला शेअर बाजाराची माहिती नव्हती. त्यामुळे हा साधू अर्थमंत्रालयाशी संबंधित असणारा अधिकारी असण्याची शक्यता अधिक आहे.