रतन टाटांच्या पावलावर पाऊल? माळीबुवाच्या नावावर केली ५० हजार कोटींची संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:54 IST2025-03-10T16:47:08+5:302025-03-10T16:54:12+5:30
Nicolas Puech : काही दिवसांपूर्वी दिवंगत उद्योगपती रतन टाटा यांचे मृत्युपत्र समोर आलं होतं. यामध्ये त्यांनी आपला वैयक्तिक सहायक शांतनू नायडूसह अनेकांना संपत्तीत वाटा दिला होता.

जगात दानशूर लोकांची कमी नाही. दिवंगत उद्योगपती रतन टाटा हे याचं उत्तम उदाहरण आहे. गेल्या महिन्यात रतन टाटा यांचे मृत्युपत्र समोर आले. यामध्ये अशा एका व्यक्तीचे नाव होतं, ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती असेल. रतन टाटा यांनी जमशेदपूर येथील रहिवासी मोहिनी मोहन दत्ता यांना ५०० कोटी रुपयांची मालमत्ता विहीत केली होती.
आम्ही ६० वर्षांपासून एकमेकांना ओळखत असल्याचा दावा दत्ता यांनी केला. पण, याची माहिती फार कमी लोकांना होती. रतन टाटांप्रमाणेच, प्रसिद्ध फॅशन ब्रँड हर्मीसचे संस्थापक थियरी हर्मिस यांच्या पाचव्या पिढीतील वंशज निकोलस पुच यांनीही आपली अर्धी मालमत्ता अज्ञात व्यक्तीला दिली आहे. ८३ वर्षीय निकोलस पुच हे देखील रतन टाटांप्रमाणेच अविवाहित असून त्यांना मूलबाळ नाही.
निकोलस यांनी आपली अर्धी संपत्ती त्यांच्या बागेत काम करणाऱ्या माळीबुवांच्या नावावर केली. ५१ वर्षीय माळीबुवा एका सामान्य मोरोक्कन कुटुंबातील आहे. ते पूर्वी पुच यांच्या घरी बागकाम करत होते.
पुच यांची एकूण संपत्ती सुमारे एक लाख कोटी रुपये आहे. यापैकी ५० हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेचे मालक माळीबुवा झालेत. इतकेच नाही तर माराकेश, मोरोक्को आणि स्वित्झर्लंडमधील मॉन्ट्रो येथे कोट्यवधी रुपयांची २ आलिशान घरेही त्यांना मिळणार आहेत.
फ्रेंच अब्जाधीश आणि उद्योगपती निकोलस पुच हे फॅशन डिझायनर हर्मिसचे संस्थापक थियरी हर्मिसचे पाचवे वंशज आहेत. त्यांनी २०१४ मध्ये कंपनीच्या पर्यवेक्षकीय मंडळाचा राजीनामा दिला. त्याच्याकडे हर्मिसचे ५% शेअर्स आहेत. ते कंपनीचे सर्वात मोठे वैयक्तिक भागधारक आहेत.
पुच यांच्या कुटुंबाची कंपनीत जवळपास ६० टक्के हिस्सेदारी आहे. निकोलस आपल्या कुटुंबीयांपासून अनेक दिवसांपासून दूर आहेत.
१८३७ मध्ये फ्रेंच फॅशन हाऊस हर्मिसची स्थापना झाली. कंपनी लक्झरी चामड्याच्या वस्तू, रेशीम उत्पादने, गृह फर्निशिंग, दागिने, परफ्यूम आणि तयार कपड्यांचे उत्पादन करते. २०२४ पर्यंत कंपनीत २५००० कर्मचारी काम करत होते.