कोट्यवधी लोकांची ओळख असलेलं आधार कसं अस्तित्वात आलं, जनक कोण? सांगितली त्यामागची कहाणी By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2024 08:42 AM 2024-12-02T08:42:47+5:30 2024-12-02T08:51:01+5:30
Aadhaar Card : २००९ मध्ये सर्वप्रथम आधारला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणून आणण्यात आलं होतं. देशातील सर्व नागरिकांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर उपलब्ध करून देणं हा त्यामागचा उद्देश होता. Aadhaar Card : कोट्यवधी भारतीयांसाठी आधार आज एक महत्त्वाचा दस्तऐवज आहे. २००९ मध्ये सर्वप्रथम आधारला युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणून आणण्यात आलं होतं. देशातील सर्व नागरिकांना युनिक आयडेंटिफिकेशन नंबर उपलब्ध करून देणं हा त्यामागचा उद्देश होता.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की आधार प्रकल्पाची सुरुवात केवळ एका पानाच्या सूचनेपासून झाली. इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांनी इन्फोसिसच्या अस्तित्वाची कहाणी सांगितली. निलेकणी यांनी साध्या सरकारी निर्देशांचं रूपांतर आधारमध्ये केलं, ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक आयडी प्रणाली आहे. याचा वापर १.३ अब्जांहून अधिक लोक करतात.
लिंक्डइनचे सीईओ रायन रोसलान्स्की यांच्याशी नुकत्याच झालेल्या संवादादरम्यान निलेकणी यांनी हा परिवर्तनकारी प्रकल्प उभारण्याचा अनुभव सांगितला. छोटेखानी निर्देश देऊन त्यांनी हा मोठा प्रकल्प कसा उभारला याबद्दल सांगितलं. त्यांनी आपली नेतृत्वशैली, आव्हानं आणि यश कसं मिळालं यावरही प्रकाश टाकला. निलेकणी आता मुलांचं शिक्षण सुधारण्यासाठी 'एकस्टेप' या नव्या योजनेवर काम करत आहेत.
आधारची सुरुवात फक्त एका पानाच्या आदेशानं झाल्याचं निलेकणी यांनी सांगितलं. "मला एक पान देण्यात आलं होतं. ज्यावर प्रत्येक भारतीयाला एक विशेष ओळखपत्र देण्याबाबत सांगण्यात आलं होतं. त्यात कसं करायचं हे सांगण्यात आलं नव्हतं, फक्त करायचंय हे सांगण्यात आलेलं," असं निलेकणी म्हणाले.
कोणत्याही स्पष्ट आदेशाशिवाय त्यांनी अस्पष्ट कल्पना असलेल्या या प्रकल्पाला मोठ्या डिजिटल प्रणालीमध्ये बदललं. याद्वारे आता दररोज जवळपास ८ कोटी देवाणघेवाणी सांभाळल्या जातात. निलेकणी यांनी सिलिकॉन व्हॅलीतील सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञांना एकत्र आणलं. त्यांनी आपल्या उद्योजकतेची भावना सरकारी प्रकल्पाशी जोडली. इतरांना प्रभावी आणि प्रेरित करणं हा यशाचा मोठा भाग आहे यावर त्यांनी भर दिला. यावरून त्यांची अनोखी नेतृत्वशैली दिसून येते.
हा उपक्रम सुरू केल्यानंतर महिनाभरातच निलेकणी यांनी ६० कोटी युनिक आयडी तयार करण्याचं महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट ठेवलं होतं. या ध्येयावर अनेकांना संशय आला होता. परंतु, त्यांच्या दूरदृष्टीमुळे टीमला प्रेरणा मिळाली. तसंच अभूतपूर्व तांत्रिक प्रगतीला चालना दिली.
निलेकणी आपल्या यशाचं श्रेय कुतूहल आणि मानवकेंद्रित समस्या सोडविण्यावर लक्ष केंद्रित करणारी मानसिकता यांना देतात. "मी रोज सकाळी नवीन गोष्टी शिकण्याच्या इच्छेने उठतो," असंही निलेकणी रायन रोसलान्स्की यांच्याशी संवाद साधताना म्हणाले.
आधार व्यतिरिक्त निलेकणी आपल्या 'एकस्टेप' या नव्या प्रकल्पाद्वारे मोठ्या सामाजिक आव्हानांना सामोरं जात आहेत. २० कोटी मुलांची साक्षरता सुधारण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. साधी कल्पना, योग्य नेतृत्व आणि दूरदृष्टी असेल तर कोट्यवधी लोकांचे जीवन कसं बदलू शकतं, हे निलेकणी यांनी दाखवून दिले आहे. त्यांचे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी आहे.