चॉकलेट इंडस्ट्री किती मोठी आहे? वाचून विश्वास बसणार नाही; 'या' दिवसात होतो सर्वाधिक खप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 10:48 IST2025-02-06T10:45:10+5:302025-02-06T10:48:32+5:30

Valentine Day : चॉकलेट आवडत नाही असा व्यक्ती दुर्मिळच म्हणावा लागेल. आपल्याकडे लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण चॉकलेट खाण्याचा आनंद घेतो. मात्र, कोणत्या दिवशी चॉकलेटला सर्वाधिक मागणी असते माहिती आहे का?

उद्या म्हणजे ७ फेब्रुवारीपासून जगभरात प्रेमाच्या सप्ताहाची सुरुवात होत आहे. भारतातही बाजारपेठा फुले, भेटवस्तू, चॉकलेट, शुभेच्छा पत्रे अशा कितीतरी गोष्टींनी फुलली आहे. 'रोज डे'ने या सप्ताहाची सुरुवात होऊन १४ फेब्रुवारीला प्रेम दिवसाने या सप्ताहाचा गोड शेवट होतो. तर ९ फेब्रुवारीला चॉकलेट डे असल्याने या दिवशी चॉकलेटला मोठी मागणी असते.

भारतातही चॉकलेटचा अब्जावधी रुपयांचा व्यवसाय आहे. सणासुदीला चॉकलेट्सची खरेदी वाढत असते. मात्र, व्हॅलेंटाईन वीकमध्येच कोट्यवधी रुपयांच्या चॉकलेट्सची खरेदी-विक्री होते. या पार्श्वभूमीवर भारतातील चॉकलेटची बाजारपेठ किती मोठी आहे? कोणत्या ब्रँडला सर्वात जास्त मागणी असते हे जाणून घेऊ.

भारतातील चॉकलेट बाजाराचा आकार २०२३ मध्ये २.६ अब्ज अमेरिकन डॉलर्स म्हणजेच २१ लाख कोटींवर पोहोचला आहे. अशीच वाढ राहिली तर आगामी दहा वर्षात चॉकलेटची बाजारपेठ ५.३ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल, अशी IMARC समूहाची अपेक्षा आहे.

देशभरात ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म वाढल्याने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय चॉकलेट उत्पादनांची मागणी, यामुळे चॉकलेट मार्केट वाढत आहे. एकूण बाजारपेठेत व्हाईट चॉकलेट आणि मिल्क चॉकलेटचा मोठा वाटा आहे. कॅडबरी, नेस्ले, फेरेरो रोचर, अमूल, पार्ले, मार्स आणि हर्शे चॉकलेट्स या देशातील सर्वाधिक पसंतीच्या चॉकलेट ब्रँड्सचा समावेश आहे.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चॉकलेट व्यवसायात लक्षणीय वाढ होते. अनेक कंपन्या या दिवशी खास चॉकलेट गिफ्ट बॉक्स बनवतात. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी चॉकलेटची किंमत ५० रुपयांपासून ३ हजार रुपयांपर्यंत असते. व्हॅलेंटाईन डेला चॉकलेट्ससोबतच गुलाबाचीही खरेदी केली जाते.

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी चॉकलेट्सच्या खास तयारीसाठी कंपन्या हार्टच्या आकाराच्या बॉक्समध्ये चॉकलेट्स विकतात. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी चॉकलेट्सच्या खास तयारीसाठी कंपन्या खिशाला अनुकूल चॉकलेट हॅम्पर्सही बनवतात.

नॅशनल कन्फेक्शनर्स असोसिएशनच्या मते, यूएसमध्ये व्हॅलेंटाईन डे चॉकलेट विक्रीतून दरवर्षी अंदाजे ४ अब्ज डॉलरची कमाई होते. यामुळे 'व्हॅलेंटाईन डे' हा दिवस चॉकलेट विक्रीसाठी तिसरी सर्वात मोठी सुट्टी बनते.