Senior Citizen Investment : ज्येष्ठ नागरिक कसं करू शकतात टॅक्स प्लॅनिंग; पाहा याच्याशी निगडीत महत्त्वाच्या गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2022 03:22 PM2022-03-23T15:22:37+5:302022-03-23T15:35:43+5:30

Senior Citizen Investment : ज्येष्ठ नागरिक बचत योजना आणि FD मध्ये निश्चित परताव्यासह कर बचतीचा लाभ घेऊ शकतात.

Senior Citizen Investment : ज्येष्ठ नागरिकांनाही एका मर्यादेनंतर मिळणाऱ्या उत्पन्नावर कर भरावा लागतो. ज्येष्ठ नागरिकांनाही टॅक्स सेव्हिंग (Tax Savings) साठी काही पारंपारिक योजनांचा लाभ घेता येतो.

सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी वार्षित करमुक्त उत्पन्न हे तीन लाख रुपये आहे. तर सामान्य लोकांसाठी ही मर्यादा अडीच लाख रुपये इतकी आहे. दरम्यान, यासाठी टॅक्स सेव्हिंगसाठी कोणत्याही विशेष योजना नसल्या तरी परंपरागत योजनांमध्ये गुंतवणूक करून टॅक्स (Income Tax) वाचवता येऊ शकतो.

सीनिअर सिटिजन सेव्हिंग स्कीम म्हणजेच SCSS निवृत्त कर्मचाऱ्यांना लक्षात घेऊन तयार केलेली स्कीम आहे. या स्कीममध्ये सर्वाधिक १५ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, वार्षिक १.५ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर सूट उपलब्ध आहे.

या स्कीममध्ये गुंतवणूक करायची असल्यास पोस्ट ऑफिस किंवा बँकेत गुंतवणूक करता येते. या योजनेत मिळणारे व्याज गुंतवणूकदाराच्या वार्षिक उत्पन्नात जोडले जाते. तसंच त्यावर स्लॅबनुसार कर भरावा लागतो.

ज्येष्ठ नागरिकांमध्ये सर्वाधिक लोकप्रिय असलेला असलेला पर्याय म्हणजे एफडी. यामध्ये व्याज भलेही कमी मिळत असेल तरी लोकांचा कल एफडीकडे जास्त असतो. पाच वर्षांच्या एफडीमध्ये दीड लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणूकीवर लाभ मिळू शकतो.

तसंच बहुतांश बँक अन्य लोकांच्या तुलनेत ज्येष्ठ नागरिकांना वार्षिक अर्धा टक्का अधिक व्याज देतात. सध्या पोस्ट ऑफिसात सर्वाधित ६.७ टक्के व्याज दिलं जातं. दरम्यान, एफडीच्या व्याजही वार्षिक उत्पन्नात जोडलं जातं, तसंच त्यावर स्लॅबनुसार टॅक्सही द्यावा लागतो.

वयाच्या ७० वर्षापर्यंत नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) मध्ये गुंतवणूक करता येते. आयकर कलम 80C अंतर्गत गुंतवणूक आणि खर्च मर्यादा पूर्ण झाल्यास, तुम्ही NPS मध्ये ५० हजार रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकता. या गुंतवणुकीला 80C व्यतिरिक्त आयकरात सूट मिळेल. NPS ने सुरुवातीपासूनच चांगले रिटर्न्स दिले आहेत. त्यामुळे निवृत्तीनंतर या स्कीमचा विचार करता येईल.

टॅक्स सेव्हिंगसाठी ELSS सर्वात कमी म्हणजेच तीन वर्षाच्या लॉक इन पीरिअड असलेली स्कीम आहे. सामान्यत: ज्येष्ठ नागरिकांना इक्विटीमध्ये गुंतवणूकीचा सल्ला देण्यात येत नाही. निवृत्तीच्या वेळी जो चांगला फंड मिळाला आहे, ज्याचं पेन्शनही चांगलं आहे. ते एकदा मिळालेल्या रकमेतून आपल्या कुटुंबाचा खर्च चालवू शकतात, कर आणि गुंतवणूक तज्ज्ञ बलवंत जैन यांनी सांगितलं.

गेल्या १० वर्षांतील आकडेवारीकडे पाहिलं तर ELSS नं वार्षिक १६ टक्क्यांचं रिटर्न दिलं आहे. यामध्ये वार्षिक एक लाखांपर्यंतची गुंतवणूक टॅक्स फ्री आहे. ही स्कीम अन्य टॅक्स सेव्हिंग स्कीम्समध्ये चांगली मानली जाते.

ज्येष्ठ नागरिकांना आयकर कायद्याच्या 80C अंतर्गत आरोग्य विम्यावर ५० हजार रुपयांपर्यंतच्या प्रीमिअमवर सूट मिळते. जर प्रीमियमची रक्कम ५० हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तर आरोग्याशी संबंधित तपासणीचा खर्च यामध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो. उदा. जर तुम्ही ३० हजार रुपयांच्या आरोग्य विमा घेतला तर यात २० रुपयांच्या आरोग्याशी संबंधित तपासणीचा खर्च समाविष्ट करू शकता.

जे निवृत्ती वेतनाच्या कक्षेत येत नाहीत त्यांनी त्यांचे पैसे अशा योजनांमध्ये गुंतवावे ज्यातून नियमित उत्पन्न मिळत असेल. सीनिअर सिटिजन सेव्हिंग स्कीम आणि FD मध्ये निश्चित रिटर्न्स सोबतच टॅक्स सेव्हिंगचा लाभ घेऊ शकतात. जर तुम्ही थोडीशी जोखीम घेऊ शकत असाल तर तुम्ही ELSS च्या माध्यमातून म्युच्युअल फंडात गुंतवणूक करावी. टीप : कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा किंवा या क्षेत्रातील जाणकारांचा सल्ला घ्यावा.