आजही केवळ ५ रुपयांना कसं मिळतंय Parle-G बिस्कीट? जाणून घ्या यामागचं गणित By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2022 03:02 PM 2022-08-09T15:02:31+5:30 2022-08-09T15:15:19+5:30
Parle-G Biscuit : गेल्या अनेक वर्षांपासून पारले जी चं बिस्कीट पाच रूपयांनाच कसं मिळतंय? यामगचं संपूर्ण गणित स्विगीचे डिझायन डायरेक्टर सप्तर्षी प्रकाश यांनी सांगितलं आहे. Parle-G Biscuit : पारले-जी बिस्किटाची चव आजही लोकांच्या जिभेवर आहे. भारतात, हा फक्त बिस्किटांचा ब्रँड नाही, तर त्याच्याशी अनेकांच्या भावनाही जोडल्या गेल्या आहेत. जेव्हा जेव्हा पार्ले-जी बिस्किटांचा उल्लेख येतो तेव्हा आपण आपल्या बालपणात जातो. पार्ले-जी बिस्किटमध्ये काळानुरूप अनेक बदल झाले, पण त्याची चव बदलली नाही.
यासोबत आणखी एक गोष्ट जी फार काळ बदलली नाही ती म्हणजे पारले जीच्या बिस्किटांच्या छोट्या पॅकेटची किंमत. आता हे पॅकेट चार रुपयांना मिळत असलं तरी बराच काळ पारले जीच्या छोट्या पॅकची किंमत ४ रूपये होती. वाढती महागाई आणि आवश्यक वस्तूंच्या सातत्यानं वाढत असलेल्या किंमतींदरम्यान, पारले जी नं आपल्या छोट्या पॅकेटची किंमत ५ रूपये कशी ठेवली असा प्रश्न नक्कीच तुमच्या डोक्यात येत असेल.
अनेक वर्ष पारले जी च्या लहान पुड्याची किंमत चार रूपये होती. अन्य बिस्कीटांच्या किंमती वाढत होत्या, तरी कंपनीनं तिच किंमत कायम ठेवली होती. परंतु हे कसं शक्य झालं, यामागील गणित स्विगीचे डिझाईन डायरेक्टर सप्तर्षि प्रकाश यांनी सांगितलं आहे. लिंक्डइनवर त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. तसंच हे कसं शक्य आहे? कधी याचा विचार केलाय का? असं त्यांनी म्हटलंय.
“१९९४ मध्ये पारले जी बिस्कीटच्या छोट्या पुड्याची किंमत ४ रूपये होती. त्यानंतर अनेक वर्षांनी त्यात केवळ एक रूपयाची वाढ करण्यात आली आणि त्याची किंमत ५ रूपये झाली. १९९४ ते २०२१ या दीर्घ कालावधीत पारले जी च्या पुड्याची किंमत ४ रुपये होती. पारले जीनं इतक्या मोठ्या स्तरावर आपली ओळख निर्माण करण्यासाठी मानसशास्त्राच्या पद्धतीचा वापर केला,” असं सप्तर्षि प्रकाश म्हणाले.
“आता जेव्हा मी छोटं पुडा म्हणतो तेव्हा तुमच्या डोक्यात काय येतं? असं एक पॅकेट जे तुमच्या हातात फिट बसेल. पॅकेटमध्ये मुठ्ठीभर बिस्कीटं असतात. पारले नं ही पद्धत समजून घेतली. त्यांनी याची किंमत वाढवण्याऐवजी लोकांच्या डोक्यात असलेली आपल्या छोट्या पॅकेटची धारणा कायम ठेवली. कालांतरानं त्यांनी त्याचं वजन कमी करण्यास सुरूवात केली. कालांतरानं वजन कमी होत गेलं, परंतु किंमत वाढली नाही,” असंही त्यांनी सांगितलं.
प्रकाश यांनी सांगितलं की पहिल्यांदा पारले जी चा छोटा पुडा १०० ग्रामचा येत होता. काही वर्षांनंतर त्याचं वजन कमी करून ९२.५ ग्राम झालं. त्यानंतर ते ८८ ग्राम करण्यात आले. आज पाच रुपयांना मिळणारं पारले जी चं पॅकेट ५५ ग्राम वजनासह येतं. १९९४ ते आतापर्यंत या बिस्कीटाच्या वजनात ४५ टक्क्यांची कपात झाली. ते या टेक्निकला ग्रेसफुल डिग्रेशन म्हणतात आणि चिप्स, टॉकलेट आणि टुथपेस्ट तयार करणाऱ्या कंपन्या या प्रकारे काम करतात असं सांगतात.
पारले जी ची सुरूवात १९२९ मध्ये झाली होती. पारले नं पहिल्यांदा १९३८ मध्ये पहिल्यांदा पारले ग्लुको (पारले ग्लुकोज) नावानं बिस्कीटांचं उत्पादन सुरू केली. १९४०-५० च्या दशकात कंपनीनं भारतातील पहिल्या ‘नमकीन बिस्कीट’ म्हटल्या जाणाऱ्या ‘मोनॅको’ बाजारात आणलं.