फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन कशी देतात बंपर डिस्काउटं? बाजारभावापेक्षा स्वस्त का मिळतात वस्तू, जाणून घ्या ऑफर्सचा खेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 04:58 PM2024-10-03T16:58:22+5:302024-10-03T17:02:20+5:30

Flipkart-Amazon Offer & Sale : सध्या Flipkart आणि Amazon सारख्या ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर फेस्टीव सिझन सुरू आहे. या ई कॉमर्स कंपन्या जवळपास सर्वच वस्तूंवर आकर्षक ऑफर्स आणि बंपर सूट देत आहेत. प्रत्यक्षात कंपनीच्या साईट्सवर किंवा शोरुममध्ये इतकी सूट दिली जात नाही. मग या कंपन्या प्रॉडक्ट स्वस्त कशा देतात?

ई-कॉमर्स साइट्सवर मोठ्या प्रमाणात डिस्काउंट उपलब्ध असल्याने बहुतांश लोक बाजाराऐवजी ऑनलाइन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

या प्रकाराला कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या व्यापारी संघटनांनी विरोध केला आहे. संघटनेने वस्तूंवर डिस्काउंट देण्यामागचं सत्यही सांगितलंय.

फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर कंपन्या थेट कंपनीकडून माल उचलत असल्याने त्यांना स्वस्त मिळत असल्याचं बोललं जातं. मात्र, व्यापारी संघटनांनी हा दावा फेटाळून लावला. ई-कॉमर्स कंपन्या अवास्तव किंमती ठरवत असून उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात सूट देण्यासाठी पैसा खर्च करत आहेत. या प्रकारामुळे मोबाईल फोनचे ग्रे मार्केट (अनधिकृत मार्केट) तयार असल्याचा आरोप व्यापारी संघटनांनी केला.

काही ब्रँड आणि बँका मोठ्या सवलती देण्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांशी संगनमत करत असल्याचा आरोप एआयएमआरएचे संस्थापक आणि अध्यक्ष कैलाश लाखयानी यांनी केला.

AIMRA ने ई-कॉमर्स कंपन्यांशी संगनमत केल्याच्या आरोपाखाली चिनी मोबाईल फोन उत्पादक OnePlus, IQOO आणि Poco यांचे ऑपरेशन्स निलंबित करण्याची मागणी केली आहे.