तुम्ही किती प्रकारची गृहकर्जे घेऊ शकता?; एका क्लिकवर सर्वकाही जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2022 12:24 PM2022-09-14T12:24:32+5:302022-09-14T12:35:45+5:30

साधारणत: घर घेताना माणूस गृहकर्ज घेतोच, पण गृहकर्ज अनेक प्रकारांत उपलब्ध असते, हे बहुतांश लोकांना माहितीच नसते. वेगवेगळ्या प्रकारची गृहकर्जे वेगवेगळ्या गरजेनुसार वापरता येतात. आज आपण त्याबद्दलच जाणून घेऊ या.

घर खरेदी कर्ज : तयार असलेले नवे/जुने घर खरेदीसाठी हे कर्ज मिळते. फिक्स्ड आणि फ्लोटिंग अशा दोन्ही व्याज प्रकारात ते मिळते. त्याची परतफेडीची मुदत ३० वर्षांपर्यंत असते.

पूर्व-मंजूर गृहकर्ज : घर खरेदी करण्याची क्षमता असलेल्यांना प्रत्यक्ष घर खरेदी करण्याच्या आधीच हे कर्ज ऑफर केले जाते.

घर बांधणी कर्ज : तुमच्याकडे भूखंड (प्लॉट) असेल, तर त्यावर घर बांधण्यासाठी तुम्हाला कर्ज मिळते. त्याची परतफेडीची मुदत १५ वर्षांपर्यंत असते.

भूखंड कर्ज : घर बांधण्यासाठी भूखंड घेऊ इच्छित असाल तर हे कर्ज तुमच्यासाठी आहे. यातील कर्जाची रक्कम ही भूखंडाची किंमत तसेच तुमचा क्रेडिट प्रोफाईल यावर अवलंबून असते.

टॉप-अप कर्ज :  तुमच्या सध्याच्या गृहकर्जावर हे कर्ज मिळते. ते तुम्ही घराचे नूतनीकरण, व्यवसाय विस्तार, मुलांचे शिक्षणाचा अथवा लग्नाचा खर्च आदी कुठल्याही कारणासाठी वापरू शकता.

घर विस्तार/नूतनीकरण कर्ज : तुमच्या सध्याच्या घराचा विस्तार किंवा नूतनीकरण यासाठी हे कर्ज मिळते. घराचे इंटेरियरपासून ते जास्तीच्या खोल्या बांधण्यापर्यंत विविध प्रकारच्या कामासाठी ते वापरता येते.

गृहकर्ज हस्तांतरण :  सध्याच्या बँकेपेक्षा स्वस्त कर्ज उपलब्ध असेल, तर आताचे कर्ज तुम्ही नव्या बँकेत हस्तांतरित करून घेऊ शकता. यात शिल्लक राहिलेल्या कर्जाचे नवी बँक हस्तांतरण करून घेते.

कर्ज घेण्यापूर्वी ही काळजी घ्या...बँकबाजार डॉट कॉमचे सीईओ अधिल शेट्टी यांनी सांगितले की, आपल्या गरजांचा नीट अभ्यास करून कर्जाचा प्रकार निवडायला हवा. सहज उपलब्धता आणि स्वस्त व्याज दर बघून योग्य पर्याय निवडावा.

क्रेडिट स्कोअर, उत्पन्न, परतफेडीची क्षमता इत्यादी निकषांचा विचार करून बँक तुम्हाला कर्ज देते. अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विविध बँका व वित्तीय संस्थांच्या व्याज दराचा तुलनात्मक अभ्यास करा. कर्जाच्या अटीही नीट वाचून व समजून घ्या, म्हणजे नंतर परतफेड करताना तुम्हाला अडचणी येणार नाहीत.