बँकेतून किती पैसे काढता येतात? हातउसने किती घ्यावेत-द्यावेत? जाणून घ्या आयकरचा नियम... By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 11:36 AM 2023-12-18T11:36:20+5:30 2023-12-18T11:41:49+5:30
आयकर खात्याकडून सुरू असलेल्या छापेमारीच्या सत्रामुळे सध्या संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. काँग्रेसच्या खासदाराकडे साडेतीनशे कोटींहून अधिक रक्कम सापडली आहे. आयकर खात्याकडून सुरू असलेल्या छापेमारीच्या सत्रामुळे सध्या संपूर्ण देश ढवळून निघाला आहे. झारखंडमधील काँग्रेसचे खासदार धीरज प्रसाद साहू यांच्या परिवाराशी संबंधित विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत आयकर खात्याने तब्बल ३५२ कोटींची रोकड जप्त केली आहे.
परंतु, या प्रकरणामुळे आयकर खात्याच्या नियमांनुसार कोणत्याही व्यक्तीला आपल्याजवळ किती संपत्ती ठेवता येते तसेच रोखीने किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी किती मर्यादा घालून दिली आहे, याबाबी चर्चेत आल्या आहेत. आयकर खात्याच्या छापेमारीत घरात प्रचंड संपत्ती आढळल्यास मात्र अडचण निर्माण होऊ शकते.
ही संपत्ती नेमकी कोणत्या मार्गाने मिळविली याचा तपशील त्या व्यक्तीला सादर करावा लागतो. याबाबत योग्य पुरावे सादर करता न आल्यास त्या व्यक्तीवर दंडात्मक कारवाई होऊ शकते. आढळलेल्या बेहिशेबी संपत्तीच्या एकूण मूल्याच्या १३७ टक्के दंड ठोठावला जातो.
किती कर्ज, ठेव देता येते? कर्ज किंवा ठेव म्हणून २० हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम कोणालाही कुणाकडूनही स्वीकारता येत नाही. आयकर विभागाकडून यासाठी बंदी घालण्यात आली आहे.
मित्र किंवा नातेवाइकाकडून एकाच दिवसात २ लाख किंवा त्याहून अधिक रोख रक्कम स्वीकारण्यास मनाई करण्यात आली आहे.
पॅन कार्ड का बंधनकारक? ५० हजार रुपये किंवा त्याहून अधिक रकमेचा व्यवहार करावयाचा असल्यास त्या व्यक्तीला पॅन क्रमांक देणे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने बंधनकारक केले आहे. पॅनकार्डशिवाय एकावेळी इतकी रक्कम बँकेत जमा करता किंवा काढून घेता येत नाही.
...तर मागे चौकशीचा ससेमिरा ३० लाखांहून अधिक किमतीच्या मालमत्तेच्या खरेदी किंवा विक्रीचा व्यवहार रोखीने करण्यात आल्यास अशा व्यवहाराची तपास यंत्रणा चौकशी करू शकतात.
एका वेळी एक लाखाहून अधिक रकमेचा व्यवहार डेबिट किंवा क्रेडिट कार्डाच्या साहाय्याने करण्यात आल्यास याची यंत्रणा चौकशी करू शकतात.
किती टीडीएस, किती दंड? एक कोटीहून अधिक रक्कम बँकेतून काढून घेतली जात असेल तर त्या व्यक्तीला २ टक्के इतका टीडीएस भरावा लागतो.
एकाच वेळी २० लाख किंवा त्याहून अधिक रकमेचा रोखीच्या स्वरूपात व्यवहार करण्यात आला असेल तर त्यावरही यंत्रणा दंड आकारू शकतात.