राजस्थानच्या उदयपूरमधील सिटी पॅलेसमध्ये लग्न करण्यासाठी किती खर्च येतो? काय आहे वैशिष्ट्ये? By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 04:23 PM 2024-11-26T16:23:18+5:30 2024-11-26T16:30:38+5:30
Udaipur City Palace : आजही महाराणा प्रतापांचे वंशज तलावांचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या उदरपूर येथे बांधलेल्या सुंदर सिटी पॅलेसमध्ये राहतात. हा पॅलेस केवळ राजघराण्याचे निवासस्थान नाही तर देशातील आवडत्या वेडिंग डेस्टिनेशन्सपैकी एक आहे. सेलिब्रेटी आणि श्रीमंत लोक या महालात विवाहसोहळा किंवा इतर कार्यक्रम आयोजित करणे हा त्यांचा अभिमान मानतात. अशा परिस्थितीत या पॅलेसमध्ये लग्नासाठी किती खर्च येतो, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात नेहमी येतो. उदयपूरच्या सिटी पॅलेसला कोणत्याही ओळखीची गरज नाही. पण, अलीकडच्या काही दिवसांपासून तो राजघराण्यातील वादांमुळे चर्चेत आला आहे. भाजप आमदार विश्वराज सिंह मेवाड आणि त्यांचे काका अरविंद सिंह मेवाड यांच्यात राजवाड्यावरील हक्कावरून हा वाद सुरू झाला आहे. आपणच राजघराण्याचे खरे वारस असल्याचा दावा दोघांनीही केला आहे.
उदयपूर सिटी पॅलेस १५५९ मध्ये सिसोदिया राजपूत यांचे वंशज महाराणा उदय सिंह यांनी बांधण्यास सुरुवात केली होती. मुघल आणि राजपुताना शैलीत बांधलेल्या या महालाला सुमारे ४०० वर्षांचा इतिहास आहे. तेव्हापासून आजतागायत राणांच्या अनेक वंशजांनी या महालात राज्य केले आहे.
उदयपूरचा सिटी पॅलेस हा राजस्थानमधील सर्वात उंच पॅलेस देखील आहे. त्याची लांबी २४४ मीटर आणि उंची ३०.४ मीटर आहे. हा महाल पिचोला तलावाच्या काठावर बांधण्यात आला आहे. या महालाला शीश महाल असेही म्हणतात. कारण त्याच्या सजावटीत हजारो आरशांचा वापर करण्यात आला आहे. हा पॅलेस त्याच्या सुंदर बाल्कनी आणि टॉवरसाठी देखील ओळखला जातो.
या वाड्याला भेट देण्यासाठी वर्षभर लोकांचा ओघ कायम असला तरी ऑक्टोबर ते मार्च हा येथे भेट देण्याचा उत्तम काळ आहे. लहान-मोठे असे ११ वेगवेगळे पॅलेस एकत्र करून सिटी पॅलेस तयार करण्यात आला आहे. याला भेट देण्यासाठी १५० ते ४०० रुपयांचे तिकीट खरेदी करावे लागते.
सिटी पॅलेसच्या प्रत्येक छोट्या महालाची बुकिंग किंमतही वेगळी आहे. जर तुम्ही जगमंदिर आयलंड पॅलेस बुक केला तर त्याची सुरुवात २० लाख रुपयांपासून सुरू होते. येथे फक्त रिसेप्शन आणि लग्न समारंभ आयोजित केले जाऊ शकतात. जर तुमच्याकडे ४०० पाहुणे असतील तर झनाना महाल बुक करणे चांगले राहील.
जर तुम्हाला राजेशाही थाटात भव्यदिव्य विवाह सोहळा आयोजित करायचा असेल. तर मानेक चौक बुक करा. कारण त्याची क्षमता १,००० पाहुण्यांची आहे. मात्र, सिटी पॅलेसमध्ये लग्न करण्याचा एकूण खर्च ९० लाख रुपयांपासून ते २ कोटी रुपयांपर्यंत आहे. यामुळेच येथे फक्त श्रीमंत लोक किंवा सेलिब्रिटीच लग्नाचे नियोजन करतात.
इथल्या हॉटेलमध्ये राहायचा विचार करत असाल तर तेही स्वस्त नाही. सिटी पॅलेसमधील फतेह प्रकाश हॉटेलमध्ये एका रात्रीचा खर्च सुमारे ४४ हजार रुपये आहे, तर शिव निवासमध्ये रात्र काढण्यासाठी २४ हजार रुपये मोजावे लागतील. जर बजेट हॉटेल शोधत असाल तर गार्डन हॉटेल बुक करू शकता. जिथे तुम्हाला एका रात्रीसाठी ७,८०० रुपये खर्च करावे लागतील.