६० वर्षांनंतर PF खात्यातून किती पेन्शन मिळेल? आनंदी निवृत्तीसाठी नियम आणि गणित समजून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 13:22 IST2025-03-26T13:14:43+5:302025-03-26T13:22:14+5:30
epfo pension : ईपीएफओनुसार, जर तुम्ही १० वर्षांसाठी पीएफ खात्यात योगदान दिले असेल, तर तुम्हाला पेन्शन मिळण्याचा हक्क आहे. पण, तुम्हाला किती पेन्शन मिळेल? हे कसे ठरवले जाते?

म्हातारपण नातवांसोबत आनंदात घालवायचा विचार करत असाल तर आर्थिक नियोजन करणे आवश्यक आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचे पीएफ खाते असेल तर तुम्हाला निवृत्तीनंतर किती पेन्शन मिळेल हा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच येत असेल.
विशेषत: जेव्हा निवृत्तीचे वय ६० वर्षांपर्यंत असते. तेव्हा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेचे (EPFO) नियम काय आहेत?पेन्शनचे गणित कसे केले जाते? हे माहिती असणे आवश्यक आहे.
तुम्ही खासगी क्षेत्रात काम करत असाल तर तुमच्या पगाराच्या १२ टक्के रक्कम तुमच्या पीएफ खात्यात जमा केली जाते. तुमची कंपनीही तितकेच योगदान देते. मात्र यामध्ये ८.३३ टक्के पेन्शन फंडात आणि ३.६७ टक्के पीएफमध्ये जमा केले जातात.
ईपीएफओनुसार, जर तुम्ही १० वर्षांसाठी पीएफ खात्यात योगदान दिले असेल, तर तुम्हाला पेन्शन मिळण्याचा हक्क आहे. तुम्ही वयाच्या ५० व्या वर्षी देखील पेन्शनचा दावा करू शकता. परंतु, दरवर्षी यात ४ टक्के कपात केली जाईल. तर, तुम्ही वयाच्या ५८ वर्षांपर्यंत वाट पाहिल्यास तुम्हाला पूर्ण पेन्शन मिळते.
जर तुम्ही ५८ वर्षांनंतर पेन्शनचा दावा केला नाही आणि ६० वर्षांपर्यंत पुढे ढकलला तर तुम्हाला दरवर्षी ४ टक्के वाढ मिळेल म्हणजेच वयाच्या ६० व्या वर्षी तुम्हाला ८ टक्क्यांपेक्षा जास्त पेन्शन मिळेल.
EPFO च्या सध्याच्या नियमांनुसार, पेन्शनपात्र पगाराची कमाल मर्यादा १५,००० रुपये आहे. याचा अर्थ असा की जर १५,००० x ८.३३/१०० = १,२५० दरमहा तुमच्या पेन्शन फंडात जमा केले जाऊ शकतात.
जेव्हा पेन्शनची गणना केली जाते तेव्हा हे सूत्र वापरून मोजले जाते. पेन्शनपात्र पगार x पेन्शनयोग्य सेवा / ७० = मासिक पेन्शन. आता ६०व्या वर्षी तुम्हाला किती पेन्शन मिळेल हा प्रश्न आहे.
जर तुम्ही वयाच्या २३ व्या वर्षी नोकरी सुरू केली आणि ५८ व्या वर्षी निवृत्त झालात, तर तुम्ही एकूण ३५ वर्षे काम केले आहे. या स्थितीत निवृत्ती वेतन = १५,०००, सेवा कालावधी = ३५ वर्षे तर निवृत्ती वेतन १५,००० x ३५/७० = ७,५०० प्रति महिना असेल.
त्याच वेळी, जर तुम्ही वयाच्या ६० व्या वर्षी पेन्शनचा दावा केला तर ८ टक्क्यांपर्यंत अतिरिक्त वाढ होईल. परंतु पीएफ पेन्शनची गणना मागील ६० महिन्यांच्या तुमच्या सरासरी पगारावर आधारित असते.