१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचं बँकेत खातं कसं उघडाल? पाहा कोणते डॉक्युमेंट्स आहेत आवश्यक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2021 12:48 PM2021-02-26T12:48:12+5:302021-02-26T13:02:23+5:30

आपलं स्वत:चं जसं बँक खातं आहे, तसंच लहान मुलांचं बँक खातं उघडून त्यांच्या भविष्याची तरतूद करणं आपल्याला शक्य आहे.

यासोबतच पैसे साठवणं आणि त्याचा वापर कसा करायचा याचं शिक्षणदेखील त्यांना या माध्यमातून देता येणं शक्य आहे.

याला मायनर अकाऊंट असं म्हटलं जातं. लहान मुलांचं बँक खातं हे ज्यांचं वय १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या मुलांसाठी आहे. यात साठवलेल्या पैशांचा वापर मुलांच्या पुढील शिक्षणासाठी किंवा उच्च शिक्षणासाठी करता येणं शक्य आहे.

लहान मुलांतर्फे मुलांचे पालक हे त्यांचं खातं सुरू करू शकतात. तसंच लहान मुलांसह त्यांचे पालक जॉईंट अकाऊंटही सुरू करू शकतात. याव्यतिरिक्त लहान मुलांची कायदेशीररित्या सांभाळण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे तेदेखील लहान मुलांचं खातं सुरू करू शकतात.

लहान मुलांचं खातं सुरू करण्यासाठी सामान्य खातं सुरू करण्यासाठी लागणाराच फॉर्म भरावा लागतो. यामध्ये लहान मुलाचं नाव, घराचा पत्ता आणि त्याची जबाबदारी असलेल्या व्यक्तीचं किंवा पालकाची माहिती आणि स्वाक्षरी असणं अनिवार्य आहे.

हे खातं उघडण्यासाठी लहान मुलाच्या जन्माचा दाखला, केव्हायसी कागदपत्रे आणि त्या मुलाचं आधार कार्ड आवश्यक आहे.

१० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांचं खातं त्याचे पालक किंवा सांभाळ करणारी व्यक्ती चालवू शकते. परंतु १० वर्षावरील मुलांचं खातं त्यांना स्वत:ही चालवता येतं.

एकदा त्या मुलाचं वय १८ वर्षे झाल्यानंतर ते खातं आपणहून सेव्हिंग अकाऊंटमध्ये बदलतं. त्यानंतर त्याचे पालक किंवा सांभाळ करणारी व्यक्ती ते खातं चालवू शकत नाही.

दरम्यान, त्यांना यासाठी वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्याचा दाखला, केव्हायसी डिटेल्स आणि अॅप्लिकेशन फॉर्मही द्यावा लागतो.

बँका अशा खात्यांवर पैशांच्या देवाणघेवाणीवर मर्यादा घालतात. याव्यतिरिक्त आई-वडिलांना मुलांच्या खात्यावरी अतिरिक्त देवाण-घेवाणीची परवानगी मिळते. ज्यामुळे ते आपल्या मुलांच्या ट्रान्झॅक्शन्सवर नजर ठेवू शकतील.