सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट किती फायदेशीर, काय आहे खास, पैसे गुंतवावे का? जाणून घ्या सर्वकाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 09:44 AM2023-06-20T09:44:09+5:302023-06-20T09:55:25+5:30

एफडी किंवा इतर कोणत्याही गुंतवणूक स्कीमपेक्षा सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करून आपल्याला अधिक नफा मिळवता येऊ शकतात.

ग्राहकांना 19 जून ते 23 जून 2023 या 5 दिवसांच्या कालावधीसाठी सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) योजनेच्या नवीन टप्प्यात गुंतवणूक करण्याची संधी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारे सरकारच्या वतीने सॉवरेन गोल्ड बॉन्ड जारी केले जातात.

एफडी किंवा इतर कोणत्याही गुंतवणूक स्कीमपेक्षा सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करून आपल्याला अधिक नफा मिळवता येऊ शकतात. सॉवरेन गोल्ड बाँडचा पुढील टप्पा 11 सप्टेंबर 2023 पासून सुरू होण्याची शक्यता आहे.

तुम्हाला सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये (SGB) गुंतवणूक करायची असल्यास, तुम्ही जारी करणारी बँक, पोस्ट ऑफिस, एजंट यांच्यामार्फत अर्ज भरून गुंतवणूक करू शकता. हा अर्ज रिझर्व्ह बँकेच्या वेबसाइटवर डाउनलोड करण्यासाठी देखील उपलब्ध आहे. बँका ग्राहकांना गुंतवणुकीसाठी ऑनलाइन अर्ज सेवा देखील प्रदान करतात.

सॉवरेन गोल्ड बाँड 2023-24 सीरिज 1 साठी बाँडची इश्यू प्राईज 5,926 रुपये प्रति ग्रॅम आहे. त्याचवेळी, डिजिटल माध्यमातून अर्ज भरणाऱ्या गुंतवणूकदारांना रिझर्व्ह बँक प्रति ग्रॅममागे 50 रुपयांची सूट देत आहे. अशा गुंतवणूकदारांसाठी, गोल्ड बाँडची इश्यू प्राईज 5,876 रुपये प्रति ग्रॅम राहील.

सराफा बाजारात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 5,937 रुपये आहे. त्याच वेळी, सॉवरेन गोल्ड बाँडची किंमत 5,876 प्रति ग्रॅम आहे. याचा अर्थ बाजारातील सोन्यापेक्षा ते 61 रुपयांनी स्वस्त आहे.

सॉवरेन गोल्ड बाँड योजनेचा मॅच्युरिटी कालावधी एकूण 8 वर्षांचा आहे. तर, गुंतवणूकदार 5 वर्षांत या योजनेतून बाहेर पडू शकतात. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेच्या गुंतवणूकदारांना सहामाही आधारावर नॉमिनल व्हॅल्यूवर वार्षिक 2.50 टक्के दरानं व्याज मिळेल.

सॉवरेन गोल्ड बाँड योजनेअंतर्गत प्रत्येक आर्थिक वर्षात (एप्रिल-मार्च) किमान 1 ग्रॅम, तर जास्तीत जास्त 4 किलो सोनं खरेदी केलं जाऊ शकतं. एचयुएफसाठी 4 किलोच्या खरेदीची मर्यादा निश्चित केली आहे. तर, ट्रस्ट आणि इतर संस्थांसाठी 20 किलोची खरेदी मर्यादा आहे.