मुकेश अंबानींचे तीन व्याही किती श्रीमंत?; पिरामल, मेहता, मर्चंट यांची नेटवर्थ पाहून व्हाल थक्क By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2024 12:27 PM 2024-07-15T12:27:32+5:30 2024-07-15T12:40:53+5:30
Mukesh Ambani News : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. दरम्यान, मुकेश अंबानींच्या तिनही व्याह्यांपैकी कोणाची नेटवर्थ सर्वात जास्त आहे हे जाणून घेऊ? Mukesh Ambani News : देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा १२ जुलै रोजी मुंबईत पार पडला. या विवाह सोहळ्याला दे देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटींना निमंत्रित करण्यात आलं होतं.
या विवाह सोहळ्यापूर्वी मुकेश अंबानी यांनी पहिल्यांदा जामनगरमध्ये आणि त्यानंतर एका आलिशान क्रुझवर प्री वेडिंग सेरेमनीचं आयोजन केलं होतं. दोन्ही कार्यक्रमांना बॉलिवूड सेलिब्रिटी, श्रीमंत व्यक्ती, उद्योगजक आणि जगभरातील नामवंत व्यक्तींनी हजेरी लावली होती.
अनंत अंबानी यांच्यापूर्वी मुकेश आणि निता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी आणि मुलगी ईशा अंबानी यांचा यापूर्वीच विवाह पार पडला आहे. अंबानी यांचे तीनही व्याही हे उद्योजकच आहेत. आकाश अंबानी यांचे सासरे रसेल मेहता हे मोठे ज्वेलरी व्यावसायिक आहेत. तर ईशा अंबानी यांचे सासरे अजय पिरामल यांचीही गणना प्रसिद्ध व्यावसायिकांमध्ये होते. अनंत अंबानी यांचे सासरे एका मोठ्या फार्मा कंपनीचे मालक आहेत. मुकेश अंबानींच्या या व्याह्यांपैकी कोणाची नेटवर्थ सर्वात जास्त आहे हे जाणून घेऊ?
स्वाती आणि अजय पिरामल - मुकेश अंबानी यांच्या व्याहींमध्ये अजय पिरामल हे सर्वात श्रीमंत आहेत. पिरामल समूहाचे अध्यक्ष अजय पिरामल यांचा मुलगा आनंद पिरामल यांच्याशी मुकेश आणि निता अंबानी यांची कन्या ईशा अंबानी यांचा विवाह झालाय. पिरामल समूहाचा व्यवसाय फार्मापासून ते हेल्थ आणि वित्त क्षेत्रापर्यंत पसरलेला आहे. जगातील ३० हून अधिक देशांमध्ये या समूहाचा व्यवसाय पसरलेला आहे. फोर्ब्सनुसार, अजय पिरामल यांची नेटवर्थ सुमारे तीन अब्ज डॉलर्स म्हणजेच जवळपास २५ हजार कोटी रुपये आहे.
मोना आणि रसेल मेहता - मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांचा विवाह श्लोका मेहता यांच्याशी झालाय. श्लोका मेहता यांचे वडील रसेल मेहता यांचीही गणना देशातील बड्या उद्योगपतींमध्ये केली जाते. रसेल मेहता हे रोझी ब्लू या हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मोठ्या ब्रँडचे एमडी आहेत. कंपनीचा व्यवसाय १२ देशांमध्ये पसरलेला असून देशातील २६ शहरांमध्ये कंपनीची ३६ हून अधिक स्टोअर्स आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रसेल मेहता यांची नेटवर्थ जवळपास ३ हजार कोटी रुपये आहे.
शैला आणि विरेन मर्चंट - मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा विवाह सोहळा १२ जुलै रोजी पार पडला. यामध्ये देश-विदेशातील अनेक सेलिब्रिटी, राजकीय व्यक्ती आणि उद्योजकांनीही हजेरी लावली होती. काही महिन्यांपूर्वी जामनगरमध्ये झालेल्या प्री-वेडिंग सेरेमनीलाही जगभरातील सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं. राधिका मर्चंट यांचे वडील विरेन मर्चंट हे फार्मा कंपनी एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत. ते इतरही अनेक कंपन्यांचे संचालक आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार त्यांची नेटवर्थ जवळपास ७५५ कोटी रुपये आहे.
मुकेश अंबानी - देशातील सर्वात मौल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रिजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. ब्लूमबर्ग बिलियनेयर्स इंडेक्सनुसार त्यांची नेटवर्थ १२० अब्ज डॉलर असून जगातील श्रीमंतांच्या यादीत ते ११ व्या क्रमांकावर आहेत. या वर्षी त्यांच्या संपत्तीत २३.८ अब्ज डॉलरची वाढ झाली. रिलायन्समध्ये अंबानी कुटुंबाचा ४२ टक्के हिस्सा आहे. या समूहाच्या व्यवसायाची व्याप्ती पेट्रोकेमिकल्सपासून रिटेल, टेलिकॉम, मीडिया अँड एंटरटेन्मेंट आणि ग्रीन एनर्जीपर्यंत पसरलेली आहे.