How Tata Named AIR INDIA: पत्र उघड! टाटांनी कसे ठेवलेले एअर इंडियाचे नाव? 75 वर्षांपूर्वी ओपिनिअन पोल घेतलेला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 04:10 PM2022-02-06T16:10:51+5:302022-02-06T16:16:38+5:30

Who Named Air India? जेआरडी टाटा यांनी टाटा एअरलाइन्सच्या नावाने विमान कंपनी 1932 मध्ये सुरू केली होती. 1946 मध्ये या एअरलाईनचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आले.

एअर इंडिया पुन्हा एकदा टाटाची कंपनी बनली आहे. गेल्या महिन्यातच यावर सोपस्कार पूर्ण झाले. टाटा समूहाचे म्हणणे आहे की एअर इंडियाला पुन्हा लोकप्रिय बनवणे हे आपले पहिले प्राधान्य असेल असे टाटा समुहाने स्पष्ट केले आहे. टाटा समूहाला नाव आणि एअर इंडियाचा लोगो पुढील पाच वर्षे बदलता येणार नाही. म्हणजेच कंपनीचे नावही तसेच ठेवले जाणार आहे. परंतू या नावामागे ७५ वर्षांपूर्वी घडलेला एक रोचक किस्सा आहे.

टाटा समूहाने 18000 कोटी रुपयांची सर्वाधिक बोली लावून एअर इंडिया विकत घेतली. आता एअर इंडियामध्ये बदल होत असताना टाटा ग्रुपने आजच एक पत्र जाहीर केले आणि एअर इंडियाला हे नाव कसे पडले याचा किस्सा सांगितला आहे.

टाटा समूहाने एका ट्विटमध्ये 1946 चे पत्र शेअर केले आहे, ते आजच्या 78 वर्षांपूर्वी 1946 मध्ये टाटा मासिक बुलेटिनमध्ये प्रकाशित झाले होते. ज्यामध्ये AIR INDIA या नावावर शिक्का मारण्यासाठी कर्मचाऱ्यांमध्ये मतदान झाल्याचे म्हटले आहे.

टाटा कंपनीने चार नावे निश्चित केली होती. ज्यात इंडियन एअर लाइन्स, एअर-इंडिया, पॅन-इंडियन एअर लाइन्स आणि ट्रान्स-इंडियन एअर लाइन्स अशी नावे होती. या चार नावांपैकी एक नाव निश्चित करण्यासाठी टाटा कर्मचाऱ्यांमध्ये मतदान घेण्यात आले. ज्यामध्ये बहुतेक लोकांनी एअर इंडियाच्या नावावर शिक्कामोर्तब केले होते.

स्वातंत्र्यापूर्वी, 1946 मध्ये, एअरलाइन्सच्या नावावर झालेल्या मतदानाच्या पहिल्या फेरीत 64 कर्मचाऱ्यांनी एअर-इंडियाला, 51 कर्मचाऱ्यांनी इंडियन एअर लाईन्ससाठी, 28 कर्मचाऱ्यांनी ट्रान्स-इंडियन एअर लाईन्ससाठी आणि 19 कर्मचाऱ्यांनी पॅन-इंडियन एअर लाईन्ससाठी मतदान केले होते.

कमी मते मिळालेली दोन नावे शर्यतीतून बाहेर पडली. त्यानंतर पुन्हा मतदान घेण्यात आले. यामध्ये एअर-इंडियाला 72 आणि इंडियन एअरलाइन्सला 58 मते मिळाली. अशा प्रकारे टाटा कंपनीने एअरलाईन्सचे नाव AIR INDIA ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

विशेष म्हणजे, एअर इंडियाला पहिल्यांदा जेआरडी टाटा यांनी टाटा एअरलाइन्सच्या नावाने 1932 मध्ये सुरू केले होते. 1946 मध्ये त्याचे नाव बदलून एअर इंडिया करण्यात आले. त्यानंतर 1954 मध्ये सरकारने टाटांकडून एअर इंडिया विकत घेऊन तिचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

स्वातंत्र्याच्या वेळी देशात लहान-मोठ्या एकूण 9 विमान कंपन्या होत्या. 1954 मध्ये त्याचे राष्ट्रीयीकरण झाले.

देशांतर्गत सेवेसाठी इंडियन एअरलाइन्स आणि परदेशात एअर इंडिया या दोन कंपन्या स्थापन करण्यासाठी सर्व कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात आले. 1953 पर्यंत, एअर इंडिया टाटा समूहाच्या मालकीची होती आणि तिचे अध्यक्ष जेआरडी टाटा होते.