अवघ्या १३ हजारात सुरू केला आईस्क्रिमचा व्यवसाय, आज आहे २० हजार कोटींचा ब्रँड

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 08:30 AM2024-01-03T08:30:52+5:302024-01-03T08:56:55+5:30

एकेकाळी आरजी चंद्रमोगन यांनी कार्टवर आईस्क्रीमही विकलं. अथक मेहनतीच्या जोरावर त्यांनी आपला ब्रँड सुरू केला.

तुम्हीही Hutsun चं आईस्क्रीम खाल्लं असेल किंवा दही, बटर यांसारखे पदार्थही वापरले असतील. १९७० मध्ये सुरू झालेला हा आइस्क्रीम ब्रँड त्याच्या फ्लेवर आणि चवीमुळे लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे, परंतु तुम्हाला माहित आहे का की एका व्यक्तीनं गाडीवर कुल्फी विकून त्याची सुरुवात केली होती.

त्या व्यक्तीचा पगार एकेकाळी ६५ रुपये होता. नंतर त्यांनी आपली बचत गुंतवून आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला. आज त्यांच्या कंपनीचं मूल्य २० हजार कोटींच्यावर गेलं आहे. आज आपण जाणून घेऊ Hutsun अॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेडचे ​​(Hatsun Agro Product Limited) संस्थापक आरजी चंद्रमोगन यांची कहाणी.

एकेकाळी हातगाडीवर कुल्फी विकणारे चंद्रमोगन आज देशातील दिग्गज उद्योगपतींपैकी एक आहेत. श्रीमंतांच्या यादीत ते मुकेश अंबानी, गौतम अदानी यांसारख्या उद्योगपतींच्या शर्यतीत आहेत. हटसन अॅग्रो प्रॉडक्ट्सचे मालक आरजी चंद्रमोगन यांचा जन्म तामिळनाडूच्या विरुधुनगर जिल्ह्यातील थिरुथंगल येथे झाला.

त्यांचं सुरूवातीचं शिक्षण गावातच झालं. कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण अर्धवट सोडावं लागलं. अभ्यास सोडून त्यांना एका लाकडाच्या मिलमध्ये नोकरी करावी लागली. तिथे त्यांना ६५ रुपये पगार मिळत असे.

जवळपास वर्षभर चंद्रमोगन यांनी ६५ रुपये पगारावर काम केलं. अचानक त्यांच्या स्वत:चं काम सुरुवात करायचा विचार आला. त्यांची स्वतःची काही बचत होती आणि कुटुंबीयांनी जमीन विकून १३ हजार रुपये दिले. या पैशातून त्यांनी १९७० मध्ये आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला.

रोयापुरममध्ये २५० चौरस फूट जागा भाड्याने घेतली आणि तीन कर्मचाऱ्यांसोबत आईस्क्रीम बनवायला सुरुवात केली. ते स्वतः आईस्क्रीम विकायला गाडी घेऊन जायचे. हळूहळू लोकांना त्यांच्या आईस्क्रीमची चव आवडू लागली. व्यवसायाची पहिली १० वर्षे त्याच्यासाठी संघर्षाची होती.

सुरुवातीला त्यांचं लक्ष्य लहान गावं आणि शहरांवर होतं. १९८१ मध्ये त्यांनी आपला आईस्क्रीम ब्रँड अरुण लाँच केला. गावाचा प्रवास शहरांपर्यंत पोहोचला. त्यांची कमाईही वाढू लागली. जेव्हा काम वाढू लागलं तेव्हा १९८६ मध्ये त्यांनी आपल्या कंपनीचे नाव बदलून हटसन ऍग्रो प्रॉडक्ट्स असे ठेवले. आज त्यांची कंपनी Hutson Agro Products Limited ही देशातील सर्वात मोठ्या खाजगी डेअरी कंपन्यांपैकी एक आहे.

१० हजार गावांतील चार लाख शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. आज त्यांची कंपनी आईस्क्रीम व्यतिरिक्त दूध, हटसन दही, हटसन पनीर आणि इब्को या प्रोडक्टची विक्री करते. हटसनची उत्पादने जगातील ३८ देशांमध्ये निर्यात केली जातात.

आज त्यांच्या कंपनीचे मूल्यांकन २० हजार कोटींवर पोहोचले आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, आरजी चंद्रमोगन यांचा भारतातील श्रीमंतांच्या यादीत समावेश आहे. भारतातील श्रीमंतांच्या यादीत ते ९३ व्या क्रमांकावर आहेत. फोर्ब्सच्या मते, त्यांची एकूण संपत्ती २.४ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. एकेकाळी ६५ रुपयांची कमाई करणारे चंद्रमोगन आज कोट्यवधींचा व्यवसाय करत आहेत.