ICICI Bank: किराणापासून ते कपडे आता EMI वर घेता येणार, UPI पेमेंटवर मिळणार सुविधेचा लाभ By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 09:48 AM 2023-04-12T09:48:26+5:30 2023-04-12T10:00:41+5:30
पाहा काय आहे ही योजना आणि किती असेल हे लिमिट.. UPI Payments : आता तुम्ही UPI पेमेंटवरदेखील ईएमआयच्या (EMI) सुविधेचादेखील लाभ घेऊ शकता. ही सुविधा खासगी क्षेत्रातील बँक ICICI बँकेनं सुरू केली आहे.
बँकेच्या म्हणण्यानुसार, UPI पेमेंटसाठी ईएमआय सुविधेचा लाभ इलेक्ट्रॉनिक्स, किराणा सामान, कपडे, प्रवास आणि हॉटेल बुकिंग यांसारख्या श्रेणींमध्ये मिळू शकतो. बँकेच्या म्हणण्यानुसार, त्यांनी QR कोड स्कॅन करून केलेल्या UPI पेमेंटसाठी EMI सुविधा सुरू केली आहे.
बँकेने माहिती दिली की, ग्राहक बँकेच्या बाय नाऊ पे लेटर हा पर्याय वापरून ईएमआय सुविधेचा लाभ घेऊ शकतात. बँकेच्या पे लेटर सुविधेसाठी पात्र असलेले ग्राहक त्याद्वारे UPI पेमेंट करू शकतील. पेमेंट केल्यानंतर, ग्राहक ही रक्कम त्यांच्या सोयीनुसार हप्त्यांमध्ये बँकेला परत करू शकतील.
बँकेच्या म्हणण्यानुसार ही सुविधा प्रथमच सुरू करण्यात आली आहे. आता ग्राहक फक्त आवश्यक व्यापारी QR कोड स्कॅन करून आणि पेमेंट करून स्टोअरमधून उत्पादने त्वरित खरेदी करू शकतात.
या सुविधेद्वारे ग्राहक १० हजार रुपयांपर्यंत UPI पेमेंट करू शकतात. ग्राहकाला ते तीन, सहा किंवा नऊ महिन्यांत सुलभ हप्त्यांमध्ये बँकेला परत करावे लागेल. बँकेच्या म्हणण्यानुसार, ही नवीन सुविधा लवकरच ऑनलाइन शॉपिंगसाठीही सुरू केली जाईल.
ICICI बँकेने 2018 मध्ये पे लेटर सुविधा सुरू केली. या सुविधेमुळे ग्राहकांना काही वस्तू तात्काळ, पूर्णपणे डिजिटल आणि पेपरलेस पद्धतीनं खरेदी करता येतात. या सुविधेचा वापर करून ग्राहक ऑनलाइन खरेदी करू शकतात.
ग्राहक त्याद्वारे बिले भरू शकतात आणि स्टोअरमध्ये कोणत्याही व्यापारी UPI आयडीवर त्वरित पेमेंट करू शकतात. या सुविधेचा ग्राहकांना मोठा फायदा झाला आहे.