ICICI बँकेच्या क्रेडिट कार्ड युजर्संना झटका, आता 'हे' शुल्क पूर्वीपेक्षा जास्त भरावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 12:54 PM2022-01-21T12:54:32+5:302022-01-21T13:07:17+5:30

ICICI Bank : आयसीआयसी (ICICI Bank) बँकेने क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यास विलंब शुल्क (Late Payment Charges) वाढवले ​​आहे.

नोटाबंदीनंतर क्रेडिट कार्ड (Credit Card) वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. तुम्हीही क्रेडिट कार्डने खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. दरम्यान, आयसीआयसी (ICICI Bank) बँकेने क्रेडिट कार्डचे बिल वेळेवर न भरल्यास विलंब शुल्क (Late Payment Charges) वाढवले ​​आहे.

काही प्रकरणांमध्ये, ग्राहकांना क्रेडिट कार्ड बिल (Credit Card Bill भरण्यास विलंब होतो. आता असे झाले तर तुमचे बजेट बिघडू शकते. म्हणजेच पेमेंट करण्यासाठी आता तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त सतर्क राहावे लागेल. क्रेडिट कार्ड ग्राहकांना आयसीआयसीआय बँकेने मेसेज आणि ई-मेलद्वारे याची माहिती दिली आहे.

मेसेजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, वाढलेले शुल्क 10 फेब्रुवारी 2022 पासून लागू होईल. विलंब शुल्कसोबतच आता क्रेडिट कार्डमधून पैसे काढणेही (Cash From Credit Card) पूर्वीपेक्षा महाग होणार आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रेडिट कार्ड जारी करणार्‍या इतर बँकाही पूर्वीपेक्षा विलंब शुल्कसाठी अधिक शुल्क आकारण्याचा विचार करत आहेत. याबाबत बँकांकडून लवकरच घोषणा अपेक्षित आहे.

आयसीआयसीआय बँकेने ग्राहकांना पाठवलेल्या मेसेजनुसार (Message From ICICI Bank), जर तुमची थकबाकी 100 रुपयांपेक्षा कमी असेल, तर तुम्हाला विलंब शुल्क म्हणून कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही. ज्यांच्या क्रेडिट कार्डची थकबाकी 100 रुपयांपेक्षा कमी आहे, अशा आयसीआयसीआय बँक ग्राहकांवर कोणतेही विलंब शुल्क आकारले जाणार नाही.

100 ते 500 रुपयांच्या शिल्लक रकमेवर 100 रुपये विलंब शुल्क भरावे लागेल. जर तुमची क्रेडिट कार्ड शिल्लक रुपये 501 ते 5,000 रुपयांच्या दरम्यान असेल, तर बँक तुम्हाला उशिरा पेमेंटसाठी 500 रुपये विलंब शुल्क आकारेल. जर तुमच्या क्रेडिट कार्डची थकबाकी 10,000 रुपयांपर्यंत असेल, तर उशिरा पेमेंट केल्यास 750 रुपये दंड आकारला जाईल.

25,000 रुपयांपर्यंतच्या थकबाकीसाठी 900 रुपये आणि 50,000 रुपयांपर्यंतच्या थकबाकीसाठी 1,000 रुपये आहे. जर शिल्लक 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल, तर 1,200 रुपयांपर्यंत लेट पेमेंट शुल्क म्हणून भरावे लागेल. याशिवाय, ग्राहकाच्या बचत बँक खात्यातून 50 रुपये आणि जीएसटी कापला जाईल.

आयसीआयसीआय बँकेच्या म्हणण्यानुसार, क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढण्यासाठी ग्राहकाला किमान 500 रुपये शुल्क भरावे लागेल. हे शुल्क 20,000 रुपयांपर्यंतच्या रोख रकमेवर लागू होईल. यापेक्षा जास्त रक्कम काढल्यास एकूण रकमेच्या २.५ टक्के दंड भरावा लागेल. चेक रिटर्न आणि ऑटो डेबिट रिटर्न अयशस्वी झाल्यास, किमान 500 रुपये दंड भरावा लागेल.