LIC चा IPO हवाय? २८ फेब्रुवारीपूर्वी ‘हे’ काम करा; गुंतवणुकीचा मार्ग होईल मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2022 03:59 PM2022-02-16T15:59:54+5:302022-02-16T16:04:49+5:30

घरबसल्या एका सोप्या प्रक्रियेने तुमचा एलआसीचा आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. पाहा, डिटेल्स...

गेल्या अनेक महिन्यांपासून विमा क्षेत्रात आघाडीवर असलेल्या भारतीय जीवन विमा निगम म्हणजेच LIC च्या IPO बाबत अनेक चर्चा सुरू आहेत. एलआयसीने सेबीकडे प्रस्तावही सादर केला आहे.

देशातील सर्वात मोठ्या आयपीओकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. LIC ने या IPO मध्ये पॉलिसीधारकांसाठी राखीव श्रेणी (रिझर्व्ह कॅटेगरी) ठेवली आहे. अशा प्रकारे पॉलिसीधारक एलआयसी आयपीओसाठी राखीव श्रेणीमध्ये अर्ज करू शकतात. मात्र, त्यासाठी एक प्रक्रिया पार पाडणे आवश्यक असल्याचे सांगितले जात आहे.

LIC ने SEBI ला केलेल्या IPO अर्जानुसार, आयपीओमध्ये पॉलिसीधारक कोट्याचा लाभ घेण्यासाठी, तुमच्या पॅन कार्डचे तपशील २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत एलआयसीच्या डेटाबेसमध्ये अपडेट करावे लागतील.

यानंतरच LIC चे ग्राहक पॉलिसीधारक कोट्याअंतर्गत IPO मध्ये अर्ज करू शकतील. ही प्रक्रिया अतिशय सोपी असून, घरबसल्या तुम्ही हे करू शकाल. त्यासाठी नेमके काय करावे, ते जाणून घेऊया...

सर्वप्रथम, पॉलिसीधारकांना एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळाला https://licindia.in/ ला भेट द्यावी लागेल. यानंतर तुम्हाला ऑनलाइन पॅन नोंदणीचा पर्याय निवडावा. आता तुम्हाला ऑनलाइन पॅन नोंदणी पृष्ठावर क्लिक करावे.

आता या पेजवर तुम्ही प्रोसिडवर क्लिक करावे. आता तुम्हाला तुमचा ईमेल आयडी, पॅन क्रमांक, मोबाइल क्रमांक आणि LIC पॉलिसी क्रमांकचा तपशील येथे भरावा लागेल. यानंतर कॅप्चा कोड टाकावा.

यानंतर तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी (OTP) मागवावा. मिळालेला ओटीपी प्रविष्ट करा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा. आता तुमचा फॉर्म सबमिट केला जाईल आणि तुम्हाला स्क्रीनवर यशस्वी नोंदणी झाल्याचा संदेश दिसेल.

एलआयसी पॉलिसीधारक त्यांचे पॅन कार्ड अपडेट झाल्याचे स्टेटस देखील तपासू शकतात. यासाठी पॉलिसीधारकांनी https://linkpan.licindia.in/UIDSeedingWebApp/getPolicyPANStatus ला भेट द्यावी.

येथे तुम्हाला तुमचा पॉलिसी क्रमांक, जन्मतारीख आणि पॅन क्रमांक टाकावा. आता कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि नंतर सबमिट पर्यायावर क्लिक करा. आता तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड अपडेटचे स्टेटस स्क्रीनवर दिसेल.

एलआयसी आयपीओमध्ये कंपनीची एकूण इक्विटी साईज ही ६३२ कोटी शेअर एवढी प्रचंड असणार आहे. LIC पॉलिसीधारकांना याच्या १० टक्के शेअर मिळणार आहेत. एकूण शेअर्स पैकी सरकार ५ टक्के शेअर्स विकत आहे. हा आकडा ३१.६ कोटी एवढा आहे. यापैकी १० टक्के म्हणजे ३.१६ कोटींहून अधिक शेअर पॉलिसीधारकांसाठी राखीव असणार आहेत.

LIC च्या IPO मसुद्यानुसार, त्यातील ५० टक्के शेअर्स पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (QIBs) राखीव असतील. याचा अर्थ असा की एकूण ३१,६२,४९,८८५ समभागांपैकी अर्धे म्हणजे सुमारे १५.८ कोटी समभाग QIB साठी बाजूला ठेवले जातील. त्याच वेळी, १५ टक्के शेअर्स गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येतील.

मीडिया रिपोर्टनुसार, एलआयसीची डॉलरमध्ये व्हॅल्यू सांगायची झाल्यास ७२ अब्ज डॉलर असल्याचे म्हटले आहे. यानुसार एलआयसीची मार्केट व्हॅल्यू चार पट असू शकते. असे झाल्यास LIC ची मार्केट व्हॅल्यू २८८ अब्ज डॉलर म्हणजे २२ लाख कोटी रुपये असू शकेल. यानंतर LIC ही सर्वांत मोठी मूल्यवान कंपनी ठरू शकेल.