Gold ETF Investment: सोन्यात गुंतवणूक करायची असेल तर Gold ETF करू शकतो मालामाल, शुद्धतेसह मिळतात 'हे' बेनिफिट्स By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2024 02:26 PM 2024-07-31T14:26:45+5:30 2024-08-01T08:27:34+5:30
Gold ETF Investment: मोदी ३.० च्या पहिल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं स्वस्त असल्यानं गुंतवणूकदारांचा त्यात रस मोठ्या प्रमाणात वाढलाय. Gold Price: मोदी ३.० च्या पहिल्या अर्थसंकल्पात सोन्यावरील कस्टम ड्युटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोनं स्वस्त असल्यानं गुंतवणूकदारांचा त्यात रस मोठ्या प्रमाणात वाढलाय. भारत हा सोन्याचा जगातील सर्वात मोठा ग्राहक देश आहे. येथे लग्नापासून कोणत्याही शुभ कार्यात सोनं खरेदी केलं जातं. वर्षानुवर्षे लोक घरात सोनं खरेदीही करत आलेत.
आजच्या काळात अर्थातच गुंतवणुकीची अनेक नवी साधनं उपलब्ध आहेत, पण सोन्यातील गुंतवणुकीचं महत्त्व आजही कमी झालेलं नाही. सोन्याच्या किंमती कमी झाल्या असून यानंतर जर तुम्ही गुंतवणूकीचा विचार करत असाल तर, फिजिकल सोन्याऐवजी Gold ETF तुम्ही गुंतवणूक करू शकता. यामध्ये तुम्हाला ९९.५% शुद्धतेची हमी मिळेल, तसंच इतरही अनेक फायदे मिळतील.
गोल्ड ईटीएफ (एक्सचेंज ट्रेडेड फंड) हा म्युच्युअल फंडाचा गुंतवणूक पर्याय आहे, जो सोन्याच्या वाढत्या आणि घसरलेल्या किमतींवर आधारित आहे. येथे तुम्ही सोन्यात गुंतवणूक करू शकता. गोल्ड ईटीएफची शेअर्स प्रमाणे बीएसई आणि एनएसई वर खरेदी आणि विक्री करता येते. मात्र, यामध्ये तुम्हाला सोनं मिळत नाही. जेव्हा तुम्हाला त्यातून बाहेर पडायचं असेल, तेव्हा तुम्हाला सोन्याच्या किमतीएवढे पैसे मिळतील.
भौतिक सोन्यापेक्षा यामध्ये गुंतवणूक करणे सोपं आहे कारण ईटीएफ युनिट्समध्ये खरेदी केले जातात. एक गोल्ड ईटीएफ युनिट म्हणजे १ ग्रॅम सोनं. तुमच्याकडे जास्त पैसे नसल्यास, तुम्ही एक किंवा दोन युनिट सोनं खरेदी करू शकता. भौतिक सोनं खरेदी करताना, जर तुम्ही अगदी लहान अंगठी खरेदी केली तर तिचं वजन किमान ४ ते ५ ग्रॅम असेल, अशा परिस्थितीत तुम्हाला मोठ्या रकमेची आवश्यकता असते. गोल्ड ईटीएफ कमी किमतीतही खरेदी करता येते. याशिवाय एसआयपीद्वारे खरेदी करण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
तुम्ही प्रत्यक्ष सोनं खरेदी केल्यास, त्याच्या सुरक्षिततेबद्दल चिंता असते. तर गोल्ड ईटीएफमध्ये अशी कोणतीही समस्या नाही. तुम्ही इलेक्ट्रॉनिक सोनं, ज्या प्रकारे शेअर्स ठेवता, त्याप्रमाणे डिमॅट खात्यात ठेवू शकता. परंतु ते चोरीला जाण्याच्या जोखमीबद्दल तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही.
जेव्हा तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करता तेव्हा तुम्हाला त्याचा मेकिंग चार्ज देखील भरावा लागतो, ज्यामुळे सोन्याची किंमत महाग होते. पण गोल्ड ईटीएफमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचा मेकिंग चार्ज भरावा लागत नाही. गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी १ टक्का किंवा त्यापेक्षा कमी ब्रोकरेज आकारले जाते, शिवाय पोर्टफोलिओ मॅनेज करण्यासाठी वार्षिक १ टक्के चार्ज द्यावा लागतो. पण हे मेकिंग चार्जपेक्षा खूपच कमी आहे.
जर तुम्हाला गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला आधी डिमॅट खातं उघडावं लागेल. यामध्ये, तुम्ही एनएसईवर उपलब्ध गोल्ड ईटीएफचे युनिट्स खरेदी करू शकता. तुमच्या डीमॅट खात्याशी जोडलेल्या बँक खात्यातून तितकीच रक्कम कापली जाईल. एक-दोन दिवसांनी तुमच्या खात्यात गोल्ड ईटीएफ जमा केले जातील. हे फक्त ट्रेडिंग खात्याद्वारे विकलं जातं.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)