LIC च्या करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! अनावधानानेही करू नका ही मिस्टेक; एक चूक करेल मोठं नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 09:00 IST2025-02-06T08:50:02+5:302025-02-06T09:00:54+5:30
LIC Policyholders Alert: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) आपल्या ग्राहकांना आणि पॉलिसीधारकांना इशारा दिला आहे. पाहूया काय आहे हे प्रकरण.

LIC Policyholders Alert: भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) आपल्या ग्राहकांना आणि पॉलिसीधारकांना इशारा दिला आहे की. एलआयसीच्या नावानं बनावट मोबाइल अॅप्लिकेशन प्रसारित केलं जात आहेत. याबाबत कंपनीनं ग्राहकांना इशारा दिलाय.
एलआयसीनं ग्राहकांना एक नोटीस जारी करून केवळ अधिकृत वेबसाइट www.licindia.in किंवा एलआयसी डिजिटल अॅपद्वारे व्यवहार करण्याची विनंती केली आहे. तसंच, एलआयसीच्या अधिकृत वेबसाइटवर नमूद केलेल्या मान्यताप्राप्त, वैध आणि व्हेरिफाईड पेमेंट गेटवे वापरा, असं कंपनीनं म्हटलंय.
एलआयसी इंडियानं यासंदर्भात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. एलआयसीच्या नावानं बनावट मोबाइल अॅप्लिकेशन प्रसारित केलं जात असल्याचे विमा कंपनीच्या निदर्शनास अल्याचं त्यात नमूद करण्यात आलंय.
"आम्ही सर्व पॉलिसीधारक आणि ग्राहकांना आवाहन करतो की त्यांनी एलआयसीच्या अधिकृत वेबसाईटद्वारे (www.licindia.in) किंवा एलआयसी डिजिटल अॅपद्वारे आणि आमच्या वेबसाइटवर उपलब्ध इतर मंजूर/ प्रमाणित / व्हेरिफाईड गेटवेद्वारे व्यवहार करावेत. कोणत्याही पर्यायी डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे केलेल्या पेमेंटसाठी एलआयसी ऑफ इंडिया जबाबदार राहणार नाही, असंही त्यांनी आपल्या निवेदनात म्हटलंय.
ग्राहकांनी काय करावं? एलआयसीचे अधिकृत मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करा. सर्व देयकं आणि व्यवहारांसाठी केवळ www.licindia.in किंवा एलआयसी डिजिटल अॅप वापरा. कोणतंही संशयास्पद अॅप किंवा वेबसाइट दिसल्यास तत्काळ एलआयसी कस्टमर सर्व्हिसशी संपर्क साधावा. डिजिटल व्यवहार करताना सायबर सुरक्षेची काळजी घ्या आणि फसवणूक टाळा.
काही वेगवेगळ्या मार्गांनी कोणतीही आपत्कालीन परिस्थिती किंवा फसवणूक झाल्यास एलआयसी विमा कंपनीकडून तुम्ही मदत घेऊ शकता. जर तुम्हाला एलआयसी पॉलिसीशी संबंधित काही समस्या असतील किंवा माहिती हवी असेल तर तुम्ही एलआयसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेऊ शकता. याशिवाय टोल फ्री क्रमांक : 1800-267-9090 यावरही संपर्क साधू शकता. तुम्ही आपल्या जवळच्या शाखेलाही भेट देऊ शकता किंवा grievance@licindia.com या ईमेलद्वारेही तक्रार करू शकता. जर तुम्हाला एसएमएस सेवेद्वारे माहिती घ्यायची असेल तर ASKLIC <पॉलिसी नंबर> लिहून तुम्ही 9222492224 किंवा 56767877 यावर एसएमएस करू शकता.