५००० किंवा १०००० रुपयांच्या SIP नं १ कोटी किती वर्षांत जमा होतील? गुंतवणूकीपूर्वी जाणून घ्या संपूर्ण कॅलक्युलेशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 09:08 IST2025-01-16T08:59:41+5:302025-01-16T09:08:33+5:30

SIP Investment : गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात मोठी घसरण झाली असली तरी आर्थिक तज्ज्ञांनी एसआयपी बंद करण्याचा सल्ला दिला नाही. एसआयपीच्या माध्यमातून तुम्ही मोठी रक्कम उभी करू शकता.

SIP Investment : गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात मोठी घसरण झाली असली तरी आर्थिक तज्ज्ञांनी एसआयपी बंद करण्याचा सल्ला दिला नाही. म्हणजे बाजारात चढ-उतार कितीही झाला तरी गुंतवणूक कायम ठेवावं असंही त्यांनी म्हटलंय.

दीर्घ मुदतीत चांगला परतावा मिळवण्यासाठी एसआयपी नेहमीच उपयुक्त ठरतात. आता प्रश्न असा पडतो की जर तुम्हाला कोट्यधीश व्हायचं असेल म्हणजे एक कोटी रुपये जमा करायचे असतील तर ५००० किंवा १०,००० रुपयांच्या एसआयपीसाठी किती वर्षे लागतील? जाणून घेऊया संपूर्ण कॅलक्युलेशन.

जर एखाद्या गुंतवणूकदाराने म्युच्युअल फंडात १०,००० रुपयांची एसआयपी ठेवली आणि त्याच्या गुंतवणुकीवर वार्षिक १२% परतावा मिळाला तर त्याला सुमारे १ कोटी रुपये जमा करण्यास २० वर्षे लागतील. त्याचबरोबर जर त्यानं एसआयपीच्या रकमेच्या १० टक्के रक्कम वर्षागणिक वाढवली तर त्या व्यक्तीला १६ वर्षांत १.०३ कोटी रुपये मिळतील.

१६ वर्षांसाठी १० हजार रुपयांच्या मासिक एसआयपीद्वारे तुम्ही रक्कम गुंतवली तर किती रक्कम जमा होईल हे पाहू. १० टक्के वार्षिक स्टेप अपसह जर तुम्ही रक्कम जमा केली तर, ४३,१३,३६८ रुपयांच्या गुंतवणुकीवर सुमारे ६०,०६,२८९ रुपयांचा परतावा मिळेल.

जर तुम्हाला ५००० रुपयांच्या एसआयपीमधून १ कोटीचे टार्गेट मिळवायचं असेल तर तुम्हाला जवळपास २६ वर्षे एसआयपी करावी लागेल. केलेल्या गुंतवणुकीवर तुम्हाला वार्षिक १२ टक्के परतावा मिळणं आवश्यक आहे. २६ वर्षांत तुम्ही जवळपास १,०७,५५,५६० रुपये जमा कराल. दुसरीकडे, जर आपण वार्षिक १०% स्टेप अप एसआयपी केली तर २१ वर्षांत आपण १ कोटी रुपये जमा कराल.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)