Independence Day 2022: भारताचा दबदबा! एकेकाळी ब्रिटनची शान होते 'हे' १० ब्रँड, आज सर्वांचे मालक आहेत भारतीय व्यक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 16:47 IST2022-08-15T16:36:13+5:302022-08-15T16:47:24+5:30
Independence Day 2022: भारत आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन भारताला आज ७५ वर्ष पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात आज उत्साहाचं आणि स्वातंत्र्याचं सेलिब्रेशन केलं जात आहे. बिझनेस वर्ल्डमध्ये एकेकाळी असलेला ब्रिटनचा दबदबा आज भारतानं मोडीस काढला आहे. याची काही उदाहरण पाहुयात...

१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. पण त्यानंतरही काही वर्ष व्यापार विश्वात ब्रिटनच्याच कंपन्यांचा दबदबा होता. त्यावेळी टाटा, बिरला, गोदरेज यांसारखे भारतीय उद्योगपती आपापल्या क्षेत्रात चांगलं काम करत होतेच. पण ब्रिटिश ब्रँडची त्यावेळी चांगली चलती होती. हळूहळू भारतीय ब्रँड आणि व्यापाऱ्यांनी विस्तार केला. आज अशी स्थिती आहे की ब्रिटनमधल्या अनेक नावाजलेल्या ब्रँडची मालकी भारतीय व्यक्तींकडे आहे.
एकेकाळी ब्रिटनचं जणू प्रतिक मानलं जाणाऱ्या कंपन्यांची मालकी आता भारतीय उद्योजकांकडे आली आहे. रॉयल एन्फिल्ड एक ब्रिटिश मोटारसायकलचा आयकॉनिक ब्रँड होता. ब्रिटनमधील Redditch मध्ये The Enfield Cycle Company Ltd रॉयल एन्फिल्ड ब्रँडच्या नावानं १९०१ साली कंपनी स्थापन झाली होती. भारताच्या स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष हा ब्रँड ब्रिटिशच राहिला होता. १९९४ साली वाहन निर्माती कंपनी आयशर मोटर्सनं एन्फिल्ड कंपनीची खरेदी केली. आज क्लासिक बाइक सेगमेंटमध्ये रॉयल एन्फिल्डचा दबदबा आहे.
Jaguar Land Rover
Jaguar Land Rover: जॅग्वार लँड रोव्हर एक लग्झरी कार कंपनी एकेकाळी ब्रिटिशच्या अभिमानाचं प्रतिक समजली जात होती. त्यानंतर अमेरिकन कंपनी फोर्ड मोटर्सनं याची खरेदी केली. फोर्ड मोटर्सच्या बऱ्याच प्रयत्नांनंतरही जॅग्वारच्या खरेदीत काही सुधारणा होऊ शकली नाही. फोर्डनं अखेरीस २००८ साली कंपनी विक्रीचा निर्णय घेतला. लागलीच भारतीय कंपनी टाटा मोटर्सनं यात रस दाखवला आणि जॅग्वार लँड रोव्हरची मालकी टाटांकडे आली. त्यानंतर जॅग्वार लँड रोव्हरचं नशीब पालटलं. टाटानं डिझाइन आणि अत्याधुनिकतेवर काम केलं. आता लँड रोव्हर फक्त भारत किंवा ब्रिटनमध्येच नाही, तर जगभर एक अव्वल लग्झरी कार ब्रँड म्हणून ओळखला जातो.
Tetley Tea
Tetley Tea: भारतात चहाविना सकाळ होत नाही असं म्हणतात. भारतात चहा इंग्रज घेऊन आले आणि यातून त्यांनी प्रचंड पैसा कमावला. Tetley Tea जगातील सर्वाधिक चहा विक्री करणारा ब्रँड म्हणून ओळखला जातो. आजही हा ब्रँड टाटा उद्योग समूहाचा भाग आहे. जवळपास २०० वर्ष जुनी ही कंपनी टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेनं विकत घेतली. तेव्हापासून हा ब्रिटिश बँड भारतीय कंपनीचा हिस्सेदार आहे. ब्रिटनसह कॅनडातही हा सर्वाधिक चहा विक्री करणारा ब्रँड आहे.
इस्ट इंडिया कंपनीचं नाव माहित नसेल असं क्वचितच कुणी असावं. १८५७ पर्यंत याच कंपनीचा भारतीय बाजारपेठेवर कब्जा होता. एकेकाळी इस्ट इंडिया कंपनी कृषीपासून खाणकाम आणि रेल्वेपर्यंत सर्वच कामं पाहात होती. भारतीय वंशाचे व्यापारी संजीव मेहता यांनी ही कंपनी विकत घेतल्यानंतर तिला ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचं स्वरुप दिलं. आजही ही कंपनी चहा, कॉफी, चॉकलेट इत्यादी वस्तूंची ऑनलाइन विक्री करते.
Hamleys
Hamleys: गुणवत्तापूर्ण खेळणी बनवण्यात Hamleys चा हात कुणीही धरू शकत नाही. भारतासह अमेरिका, ब्रिटन, चीनसारख्या मोठ्या देशांमध्ये या ब्रँडची खेळणी विकली जातात. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स कंपनीनं २०१९ साली Hamleys कंपनीची खरेदी केली. सध्या जगभरात या ब्रँडचे २०० हून अधिक आउटलेट्स आहेत. अनेक देशांमध्ये ही कंपनी सर्वात मोठी किड्स टॉय बनवणारी कंपनी आहे. जागतिक पातळीवर नंबर वन बनवण्याच्या ध्येयासह रिलायन्स समूह सध्या काम करत आहे.
टाटांनी अनेक परदेशी कंपन्या आणि खासकरुन ब्रिटिश कंपन्यांची खरेदी केली आहे. ब्रिटिश आयटी कंपनी Diligenta देखील याचाच एक भाग आहे. टाटा समूहातील टीसीएस कंपनीनं Diligenta कंपनीची खरेदी केली. टीसीएस देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी म्हणून ओळखली जाते.
Corus Group
Corus Group: टाटांनी विकत घेतलेल्या ब्रँड्सपैकी कोरस ग्रूप हे देखील अत्यंत महत्वाचं नाव आहे. Corus Group न जगभरात भले स्टील मार्केटमध्ये ब्रिटनचं नावलौकिक केलेलं असलं तरी टाटा समूहाच्या टाटा स्टील लिमिटेड कंपनीनं २००७ साली Corus Group कंपनीला खरेदी केलं. आता ब्रिटनमध्ये हिच कंपनी Tata Steel Europe नावानं ओळखली जाते. ही कंपनी खरेदी करताच टाटांची युरोपातील स्टील बाजारपेठेत एन्ट्री झाली होती
Optare
Optare हा ब्रिटिश ब्रँड देखील आज भारतीय ऑटो कंपनी Ashok Leyland कंपनीचा हिस्सा आहे. ही कंपनी सिंगल डेकर, डबल डेकर, टूरिस्ट, लग्झरी आणि इलेक्ट्रिक बस तयार करण्याचं काम करते. युरोपातील सर्वाधिक विक्री होणारा हा ब्रँड आहे. इलेक्ट्रिक बस बनवण्यातही ही कंपनी अव्वल स्थानीआहे.
BSA Motorcycles
BSA Motorcycles: भारतातील क्लासिक बाइक बाजारात गेल्या काही महिन्यांत मोठे बदल झाले आहेत. या सेगमेंटमध्ये मोठा मागणीही आहे आणि सध्याची उपलब्ध संसाधन पाहाता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी मोठ्या तयारीत आहे. महिंद्रा समूहानं क्लासिक लिजेंडच्या माध्यमातून याची सुरुवात २०१६ साली BSA Motorcycles कंपनी खरेदी करुन केली. हा ब्रँड देखील एकेकाळी ब्रिटनचे टॉप व्यापारी असलेल्या Birmingham Small Arms Company कडे होता. दिवाळखोरीनंतर क्लासिक लीजेंडनं याचं अधिग्रहण केलं होतं. नुकतंच BSA Goldstar 650 लॉन्चच्या माध्यमातून या ब्रँडचं कमबॅक झालं आहे.
Imperial Energy: ब्रिटनच्या या पेट्रोलियम आणि गॅस कंपनीला भारताच्या सरकारी कंपनी असलेल्या ओएनजीसीनं खरेदी केलं आहे. ही कंपनी रशिया, ब्रिटन आणि इतर युरोपीय देशांमध्ये काम करते. सायबेरियातील सर्वात मोठी क्रूड ऑइल कंपनी म्हणून ती ओळखली जाते. या कंपनीच्या माध्यमातून सायबेरियातून जगातील अनेक देशांना तेल आणि गॅसची निर्यात होते.