Independence Day 2024 : पोस्ट ऑफिसमधून घरबसल्या खरेदी करू शकता तिरंगा, तुम्हाला येईल 'इतका' खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 06:40 PM2024-08-12T18:40:46+5:302024-08-12T19:02:35+5:30

Independence Day 2024 : देश यंदा ७८ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे.

१५ ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्यदिनाचा उत्साह आता अवघ्या दोन दिवसांवर येऊन पोहोचला असून देशभर त्याची धूम पाहायला मिळत आहे. देशात स्वातंत्र्य दिन मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे.

देश यंदा ७८ वा स्वातंत्र्य दिवस साजरा करणार आहे. देशभरात स्वातंत्र्यदिनी देशभक्तीचा रंग भरला आहे. या दिवशी भारताचे पंतप्रधान लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतात.

याशिवाय अनेक शाळा, महाविद्यालये, संस्थांमध्ये या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. तसेच, याठिकाणी तिरंगा ध्वजही फडकवला जातो. यासोबतच अनेक भारतीय आपल्या घरावर ध्वज फडकवतात. रस्त्यावरही या दिवशी लोक हातात तिरंगा घेऊन रॅली काढतात.

अशात जर तुम्ही आपल्या घरावर तिरंगा फडकवण्यासाठी खरेदी करणार असाल तर तो घर बसल्या खरेदी करु शकता, तेही अगदी स्वस्तात. पोस्ट ऑफिसने ही सुविधा उपलब्ध करुन दिली आहे.

पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईटवर https://www.epostoffice.gov.in/ProductDetails/Guest_productDetails भेट देऊन तुम्ही घरबसल्या तिरंगा खरेदी करु शकता. यासाठी तुम्हाला २५ रुपये खर्च करावे लागतील.