१९४७ ला १०० रुपये गुंतवले असते, तर किती झाले असते?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2022 10:13 AM2022-08-14T10:13:48+5:302022-08-14T10:22:33+5:30

- चंद्रकांत दडस : १९४७ पासून आतापर्यंत सोने, चांदी, बचत खाते, एफडी किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करून ठेवली असती, तर त्यातून मिळणारे रिटर्न हे नक्कीच डोळे दिपवणारे ठरतात.

कोणतीही गुंतवणूक ही दीर्घकालीन असेल, तरच फायद्याची ठरते. १९४७ पासून आतापर्यंत सोने, चांदी, बचत खाते, एफडी किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करून ठेवली असती, तर त्यातून मिळणारे रिटर्न हे नक्कीच डोळे दिपवणारे ठरतात. जर तुम्ही १०० रुपये १९४७ मध्ये विविध ठिकाणी गुंतवले असते, तर त्याचे २०२२ मध्ये आपल्याला किती रिटर्न मिळाले असते, ते पाहू...

भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हापासून सोन्याच्या दरात आतापर्यंत तब्बल ५२ हजार टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. १९४७ मध्ये सोन्याचा भाव ८८ रुपये प्रति १० ग्रॅम होता. त्यामुळे जर त्यावेळी सोन्यात १०० रुपये गुंतवले असते, तर आता ५२ लाख रुपये रिटर्न मिळाले असते.

१९४७ मध्ये चांदी १०७ रुपये किलो होती. चांदीने आतापर्यंत ५८,७०० रिटर्न दिले आहेत. जर चांदीत १९४७ मध्ये १०० रुपयांची गुंतवणूक केली असती, तर २०२२ मध्ये त्याची किंमत ५८ लाख ७० हजार रुपये झाली असती.

१९४७ च्या दरम्यान एफडीतील गुंतवणूक रिटर्न कमी होते. मात्र त्यानंतर ते साधारण १२ टक्क्यांपर्यंत वाढत गेले आणि त्यानंतर ते पुन्हा आता ५ ते ६ टक्क्यांपर्यंत आले आहेत. जर एफडीमध्ये १२ टक्के दराने १०० रुपये ७५ वर्षांसाठी गुंतवले असते, तर आज त्याचे ८ हजार ४०० रुपये इतके मिळाले असते.

शेअर बाजारात सातत्याने गुंतवणूक केली असती, तर त्यातून आज नक्कीच कोट्यधीश झाला असता. शेअर बाजाराने आतापर्यंत सरासरी १७ टक्के परतावा दिला आहे. जर समजा तुम्ही सिम्फनी या कंपनीत १६ वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती, तर आज तुम्हाला २,५३,००० टक्के रिटर्न मिळाले असते.

गुंतवणूक ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. त्यात सातत्य ठेवले, तर उत्तम परतावा मिळतो. महिन्याकाठी मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी किमान ४० टक्के गुंतवणूक करण्याचे लक्ष्य ठेवावे. गुंतवणुकीचे पर्याय अनेक ठेवावेत. त्यामुळे अनेक फायदे मिळतात. गुंतवणूक केली आणि अनावश्यक खर्चाला आळा घातला, तर तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य नक्की मिळेल.