भारत बनला सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला जगातील पाचवा देश, पण याचा सर्वसामान्यांना फायदा काय? जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2022 03:15 PM 2022-09-03T15:15:12+5:30 2022-09-03T15:29:27+5:30
भारतानं जागतिक आर्थिक पातळीवर आज एक मोठं यश प्राप्त केलं. भारतानं ब्रिटनला मागे टाकत जगातील टॉप-५ अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत स्थान प्राप्त केलं आहे भारतानं जागतिक आर्थिक पातळीवर आज एक मोठं यश प्राप्त केलं. भारतानं ब्रिटनला मागे टाकत जगातील टॉप-५ अर्थव्यवस्था असलेल्या देशांच्या यादीत स्थान प्राप्त केलं आहे. सकाळपासून सोशल मीडियात याचीच जोरदार चर्चा आहे. पण भारताच्या या यशाचा देशातील सर्वसामान्य नागरिकांना काय फायदा होणार आहे? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. याचीच माहिती आपण जाणून घेऊयात...
भारतानं अर्थव्यवस्थेच्या बाबतीत त्रैमासिक आधारावर ब्रिटनला मागे टाकलं आहे. भारताचा विकास पाहता, वार्षिक आधारावरही भारत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल हे जवळपास निश्चित आहे. यावेळी भारताचा टॉप १० मध्ये झालेला प्रवेश कायम असून त्यात केवळ सुधारणा दिसून येईल, असा अंदाज आहे. या वृत्तासोबतच सोशल मीडियावर या रँकिंगचा सर्वसामान्यांवर काय परिणाम होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. या क्रमवारीतील सुधारणांचा सामान्य लोकांवर कसा परिणाम होईल, असा प्रश्न उपस्थित होणं यात काहीच गैर नाही.
भारतापेक्षा खालच्या क्रमांकावर कसा गेला ब्रिटन? आपण जर आकडे बाजूला ठेवून ब्रिटन भारताच्या मागे जाण्याची कारणं नीट समजून घेतली तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे आर्थिक संकटांच्या काळात भारतानं आव्हानांना अधिक चांगल्या प्रकारे तोंड दिलं. त्याच वेळी, ब्रिटनला त्यांच्या अर्थव्यवस्थेतील संथपणाचा फटका बसला आहे. तसंच जारी करण्यात आलेले आकडे डॉलरमध्ये दिलेले आहेत आणि हे लक्षात घेण्यासारखे आहे की भारतीय रुपयानं डॉलरच्या तुलनेत यूके पाउंडपेक्षा खूप चांगली कामगिरी केली आहे.
ज्या तिमाहीत गणना केली गेली त्या तिमाहीत, रुपयाच्या तुलनेत पाऊंड देखील लक्षणीयरित्या कोसळला आहे. म्हणजेच पाउंडच्या तुलनेत भारताचे चलन मजबूत असल्याचं सिद्ध झालं आहे. दुसरीकडे, भारतीय अर्थव्यवस्था ७ टक्के वाढ नोंदवत आहे, जिथं ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेची वाढ १ टक्क्यांपेक्षा कमी आहे. या कारणांमुळे भारताने वेगवान वाढ कायम ठेवली पण UK भारतासारखी कामगिरी करू शकला नाही आणि भारताच्या मागे राहिला.
क्रमवारीचा सर्वसामान्य नागरिकांवर परिणाम काय? भारताची अर्थव्यवस्था सध्या महागाई, रुपयाची घसरण, कच्च्या तेलाचे वाढते दर, वस्तूंच्या किमती याच्याशी झुंज देत आहे. या आव्हानांना केवळ भारतच नाही तर संपूर्ण जग सामोरे जात आहे. अर्थात, क्रमवारीत वाढ झाल्याचा लगेच परिणाम होणार नाही. कारण महागाईसारखे घटक सर्वच अर्थव्यवस्थांवर वर्चस्व गाजवतात आणि त्यामुळे अर्थव्यवस्थांचा आकार वाढत आहे. मात्र, भारताचे हे यश नावापुरतेच आहे, असंही नाही. दीर्घकाळ टॉप-५ मध्ये राहणं केवळ अर्थव्यवस्थेसाठीच सकारात्मक नाही तर सर्वसामान्यांच्या जीवनावरही त्याचा चांगला परिणाम होईल.
रँकिंग सुधारण्याचा काय परिणाम होईल टॉप-५ अर्थव्यवस्थांमध्ये समाविष्ट होणे ही प्रत्येक भारतीयासाठी सर्वप्रथम अभिमानाची बाब आहे आणि यामुळे जगभरातील भारतीयांचे स्थान अधिक मजबूत होईल, मग निर्यातीच्या संधी असोत किंवा पासपोर्टचे सामर्थ्य. कारण मजबूत अर्थव्यवस्थेसह प्रत्येकाला नाते मजबूत ठेवायचे असते. त्याच वेळी, याचा सर्वात मोठा परिणाम हा होईल की भारतावरील परदेशी गुंतवणूकदारांचा विश्वास आणखी वाढेल.
गुंतवणुकदारांना भारतातील गुंतवणुकीवर अधिक विश्वास ठेवता येईल. कारण भारतानं कठीण काळातही वाढ कायम ठेवली आहे, अशा परिस्थितीत जगभरातील गुंतवणूकदार अधिक विश्वासार्ह देश म्हणून भारताकडे पाहतील. हे देशातील गुंतवणुकीच्या दृष्टीने अतिशय चांगली गोष्ट आहे.
त्याचवेळी, सरकार आक्रमकपणे मेक इन इंडिया आणि प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह सारख्या योजना गुंतवणूकदारांसमोर ठेवत असताना, टॉप 5 मध्ये येण्यामुळे भारत हा गुंतवणूकदारांसाठी सर्वात आकर्षक बाजारपेठ असल्याचा भारत सरकारचा दावा अधिक बळकट होईल.
सध्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार चीनचा पर्याय शोधत आहेत. अशा गुंतवणूकदारांसाठी अर्थव्यवस्थेची सकारात्मक आकडेवारी अत्यंत सूचक ठरेल. जर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढवली आणि एफडीआय वाढला, तर यामुळे देशात रोजगाराच्या संधी तर वाढतीलच शिवाय लोकांचे उत्पन्नही वाढेल आणि काम सुरू करणाऱ्यांनाही संधी मिळेल. म्हणजेच भारतातील टॉप 5 मध्ये सामील झाल्यामुळे सर्वसामान्य भारतीयांसाठी नवीन संधी मिळू शकतात हे स्पष्ट आहे.