भारत आता थेट 'डॉलर'ला टक्कर देणार; ६४ देशांसोबत रुपयामध्येच व्यवहार करणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 04:40 PM2023-02-16T16:40:13+5:302023-02-16T16:49:31+5:30

परदेशातील व्यापारासाठी डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारतानं मोठं पाऊल उचललं आहे. रशियासोबत रुपयात व्यापार सुरू झाल्यानंतर देशात १७ व्होस्ट्रो खाती (Vostro Account) उघडण्यात आली आहेत. जर्मनी, इस्रायलसारख्या विकसित देशांसह एकूण ६४ देशांनी रुपयाच्या माध्यमातून व्यापार करण्यास स्वारस्य दाखवले आहे.

परदेशातून व्याज आकर्षित मिळवण्यासाठी आणि डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी RBI ने जुलै २०२२ मध्ये रुपयात व्यापार सेटलमेंट प्रणाली प्रस्तावित केली होती. युरोपियन युनियनमध्ये समाविष्ट असलेला जर्मनी हा देश प्रथमच आशियातील कोणत्याही चलनाशी म्हणजेच भारतीय रुपयाशी व्यवसाय करण्यासाठी पुढे आला आहे. जर भारत ३० पेक्षा जास्त देशांसोबत व्यापार करत असेल तर अशा स्थितीत रुपया आंतरराष्ट्रीय व्यापारिक मुद्रा स्वरुपात अस्तित्वात येऊ शकतो.

सुरुवातीच्या टप्प्यात रशियानंतर श्रीलंकेनेही भारतीय रुपयात व्यवसाय करण्याचे मान्य केले. तर आता आफ्रिकेतील अनेक देश, बांगलादेश, नेपाळ आणि म्यानमार या शेजारील देशांचा समावेश रुपयात व्यवसाय करू इच्छिणाऱ्या देशांमध्ये झाला आहे. या देशांना त्यांच्या परकीय चलनाच्या साठ्यात डॉलरची कमतरता भासत आहे.

ताजिकिस्तान, क्युबा, लक्झेंबर्ग आणि सुदान यांच्यातही रुपयात व्यापार करण्यासाठीची बोलणी सुरू आहेत. या चार देशांनी रुपयात व्यापार सेटलमेंटसाठी विशेष व्होस्ट्रो खात्यासाठी पावले उचलली आहेत. हे देश भारतात अशी खाती चालवणाऱ्या बँकांच्या संपर्कात आहेत. मॉरिशस आणि श्रीलंका सारख्या देशांसाठी विशेष व्होस्ट्रो खात्यांना आरबीआयने आधीच मान्यता दिली आहे.

रुपयाला आंतरराष्ट्रीय व्यापार मान्यता मिळाल्याने भारताला अनेक आघाड्यांवर फायदा होईल. जर यात यश आले, तर कच्च्या तेलासह आयात केलेल्या बहुतेक वस्तूंचे पैसे केवळ रुपयाद्वारे दिले जातील. सध्या भारत यासाठी दरवर्षी अब्जावधी डॉलर्स खर्च करतो.

याशिवाय अनेक परदेशी व्यवहार डॉलरमध्ये केले जातात. सध्या भारत डॉलरची गरज भागवण्यासाठी आंतरराष्ट्रीय बाजारात रुपयाची विक्री करतो. पण तेही तितके सोपे नाही. INR पूर्णपणे परिवर्तनीय नाही आणि म्हणूनच खरेदीदार शोधणे अनेकदा कठीण असते. दुसरीकडे भारतीय रुपयाच्या तुलनेत USD ला अधिक मागणी आहे. त्याचा पुरवठा फेडद्वारे नियंत्रित केला जातो.

रुपयातील व्यापार वाढत असल्याने, RBI ला INR साठी खरेदीदार शोधण्याची गरज भासणार नाही. या पाऊलामुळे भारतीय रुपयाची मागणी वाढेल. आंतरराष्ट्रीय बँकांना रूपांतरण शुल्क (कन्वहर्जन फी) न पाठवून जी रक्कम जमा होईल, ती शेवटी देशाच्या विकासासाठी उपयोगी पडेल.

भारताची रुपया व्यापार समझोता यंत्रणा ही आंतरराष्ट्रीय व्यवहारांसाठी डॉलर आणि इतर प्रमुख चलनांऐवजी रुपयाचा वापर करण्याचा एक मार्ग आहे. वस्तू आणि सेवांच्या आयात आणि निर्यातीसाठी देशांना परकीय चलनात पैसे द्यावे लागतात. यूएस डॉलर हे जगातील सर्वाधिक स्वीकारले जाणारे चलन असल्याने बहुतांश व्यवहार डॉलरमध्ये होतात.

गेल्या काही महिन्यांत डॉलरच्या मजबूतीमुळे जगभरातील अनेक देशांसाठी आयात महाग होत आहे. त्यामुळे पर्यायाची नितांत गरज निर्माण झाली आहे. व्होस्ट्रो खात्याच्या मदतीने, कोणताही देश भारतासोबत आयात किंवा निर्यातीचे मूल्य देण्यासाठी रुपया वापरू शकतो. या खात्याद्वारे, तुम्ही वस्तू आणि सेवांचे चलन अगदी सहज मिळवू शकता. यामुळे अमेरिकन डॉलरवरील अवलंबित्वही कमी होईल.

जर एखाद्या भारतीय खरेदीदाराला विदेशी व्यापाऱ्यासोबत रुपयांमध्ये व्यवहार करायचे असतील, तर ती रक्कम व्होस्ट्रो खात्यात जमा केली जाईल. जेव्हा भारतीय निर्यातदाराने पुरवठा केलेल्या मालाचे पैसे भरणे आवश्यक असते, तेव्हा हे व्होस्ट्रो खात्यातून रक्कम वळती केली जाईल आणि निर्यातदाराच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल.

विदेशी बँक भारतातील एडी बँकेशी विशेष व्होस्ट्रो खाते उघडण्यासाठी संपर्क साधू शकते, त्यानंतर भारतीय एडी बँक आरबीआयकडून मंजुरी मागते. आरबीआयने दिलेल्या मंजुरीनंतर AD बँक ऑफ इंडियामध्ये स्पेशल रुपी व्होस्ट्रो खाते कार्यान्वित होईल. दोन्ही बाजूंमध्‍ये रुपयात व्‍यापार सुरू झाल्‍याने, चलनांचा विनिमय दर बाजार दरानुसार निश्चित केला जाईल.

17 भारतीय बँक शाखांनी परदेशातील भागीदार व्यापारी बँकांसह रुपयात विदेशी व्यापार सुलभ करण्यासाठी विशेष व्होस्ट्रो खाती उघडली आहेत. १२ भारतीय बँकांच्या यादीमध्ये UCO बँक, IndusInd Bank Limited, Union Bank of India Limited, Canara Bank Limited, HDFC बँक लिमिटेड, येस बँक लिमिटेड, स्टेट बँक ऑफ इंडिया, IDBI बँक लिमिटेड यांचा समावेश आहे.