सणासुदीच्या काळात Indian Railway मालामाल; तिकीट विक्रीतून कमावले 12 हजार कोटी!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 03:23 PM2024-11-28T15:23:12+5:302024-11-28T15:32:49+5:30

Indian Railway : भारतीय रेल्वेने या वर्षी 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 दरम्यान ही कमाई केली आहे.

नवी दिल्ली : या सणाच्या हंगामात (Festive Season 2024), भारतीय रेल्वेने (Indian Railway) 12,159.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. रेल्वेला तिकीट विक्रीतून ही कमाई मिळाली आहे. भारतीय रेल्वेने या वर्षी 1 सप्टेंबर 2024 ते 31 ऑक्टोबर 2024 दरम्यान ही कमाई केली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत ही माहिती दिली.

या दोन महिन्यांत गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी असे अनेक सण आले. यावेळी अनेकजण सण साजरा करण्यासाठी आपापल्या घरी जातात किंवा इतरत्र जातात. अशा परिस्थितीत, भारतातील बरेच लोक सणासुदीच्या काळात प्रवास करण्यासाठी भारतीय रेल्वेला प्राधान्य देतात.

अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत झोननिहाय आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीत त्यांनी भारतीय रेल्वेला तिकीट विक्रीतून किती महसूल मिळाला हे सांगितले. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत जवळपास 143.71 कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे.

बहुतांश प्रवासी सेंट्रल झोनमध्ये होते. सेंट्रल झोनमधील प्रवाशांची संख्या अंदाजे 31.63 कोटी होती. त्याचवेळी पश्चिम झोनमध्ये 26.13 कोटी तर पूर्व झोनमध्ये 24.67 कोटी प्रवासी होते. सर्वात कमी प्रवासी दक्षिण-पूर्व झोनमध्ये दिसून आले. केवळ 1.48 कोटी प्रवाशांनी येथून प्रवास केला.

आयएएनएस या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या सणासुदीच्या हंगामात 7,663 अतिरिक्त विशेष गाड्या चालवण्यात आल्या आहेत. या गाड्या गेल्या वर्षीच्या सणासुदीच्या तुलनेत 73 टक्के अधिक होत्या. तर 2023 मध्ये 4,429 विशेष गाड्या धावल्या होत्या. यंदा दिवाळी ते छठ सण दरम्यान 957.24 लाख प्रवाशांनी प्रवास केला आहे. गेल्या वर्षी 2023 मध्ये या कालावधीत प्रवाशांची संख्या 33.91 लाख होती.

4 नोव्हेंबर 2024 रोजी 1.2 कोटी प्रवाशांनी रेल्वे सेवेचा वापर केला. त्यापैकी 19.43 लाख प्रवासी आरक्षित तर 1.01 कोटी अनारक्षित होते. भारतीय रेल्वेने जारी केलेल्या निवेदनानुसार, 3 नोव्हेंबर रोजी 207 विशेष गाड्या चालवल्या. तर 4 नोव्हेंबर रोजी 203 विशेष गाड्या रुळावर धावल्या. या गाड्या सध्या सुरू असलेल्या विशेष गाड्यांव्यतिरिक्त चालवण्यात आल्या होत्या.