दररोज रिकाम्या असतात शेकडो सिट्स, या ट्रेनमुळे रेल्वेला होतोय कोट्यवधीचा तोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2024 05:10 PM2024-09-14T17:10:43+5:302024-09-14T17:18:17+5:30

Indian Railway, Tejas Express: भारतीय रेल्वेमधील हजारो ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्यातील काही गाड्यांना तर प्रचंड गर्दी असते. दरम्यान, रेल्वेच्या काही मार्गावर धावणाऱ्या गाड्या रेल्वेला भरपूर उत्पन्न मिळवून देतात. मात्र अशाही काही ट्रेन आहेत ज्यामुळे रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असतो.

भारतीय रेल्वेमधील हजारो ट्रेनमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. त्यातील काही गाड्यांना तर प्रचंड गर्दी असते. दरम्यान, रेल्वेच्या काही मार्गावर धावणाऱ्या गाड्या रेल्वेला भरपूर उत्पन्न मिळवून देतात. मात्र अशाही काही ट्रेन आहेत ज्यामुळे रेल्वेला कोट्यवधी रुपयांचा तोटा होत असतो.

दिल्लीहून धावणाऱ्या अशाच एका ट्रेनमुळे रेल्वेला तब्बल ६३ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. या ट्रेनचं नाव आहे तेजस एक्स्प्रेस. भारतीय रेल्वेकडून तेजस एक्स्प्रेसचं संचालन खाजगी ऑपरेटर्सकडे सोपवण्यात आलं होतं. सध्या दिल्ली ते लखनौ आमि मुंबई ते अहमदाबाद मार्गावरील तेजस ट्रेन चालवल्या जातात.

सन २०२२ मध्ये आयआरसीटीसीकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार या दोन्ही ट्रेन सध्या आर्थिक नुकसानीचा सामना करत आहेत. सन २०२२ च्या आकडेवारीनुसार दिल्ली ते लखनौ तेजस एक्स्प्रेस ही २७.५२ कोटी रुपये तोट्यामध्ये आहे. कमी प्रवाशी संख्या आणि सातत्याने होत असलेल्या तोट्यामुळे तेजस एक्स्प्रेसच्या फेऱ्याही कमी करण्यात आल्या होत्या. आधी सहा दिवस धावणाऱ्या या ट्रेनच्या फेऱ्या घटवून आता चार दिवसच करण्यात आल्या आहेत.

या ट्रेनच्या सुमारे २०० ते २५० सिट दररोज रिकाम्या असतात. त्यामुळे या ट्रेनमुळे होणाऱ्या तोट्यामध्ये सातत्याने भर पडत आहे. या ट्रेनच्या पुढे राजधानी आणि शताब्दी ट्रेन धावतात. तसेच त्यांचं तिकीट हे तेजसपेक्षा कमी आहे, तसेच त्यातीलल सुविधा तेजसच्या तोडीस तोड आहेत. त्यामुळे प्रवाशी केवळ पर्याय म्हणून तेजस एक्स्प्रेसचा विचार करतात.

त्यातच कोरोनानंतर तेजसची फ्रीक्वेंसीही कमी जास्त झाली आहे. प्रवाशी कमी असल्याने सन २०१९ ते २०२२ या काळात ही ट्रेन काही काळासाठी ५ वेळा बंद करण्यात आली होती. लखनौ-नवी दिल्ली तेजस एक्स्प्रेस २०१९-२० मध्ये २.३३ कोटींचा फायदा झाला होता. मात्र २०-२१ मध्ये १६.६९ कोटी रुपये एवढा तोटा आणि २०२१-२२ मध्ये ८.५० कोटी रुपयांचा तोटा झाला.

रेल्वेने २०१९ मध्ये आयआरसीटीसीला अहमदाबाद-मुंबई आणि लखनौ-दिल्ली या ट्रेनचं संचालन करण्याची जबाबदारी दिली होती. दरम्यान, तीन वर्षांत या दोन्ही ट्रेनचा तोटा वाढून ६२.८८ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. त्यावर आयआरसीटीसीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, कोरोना काळात ट्रेनच्या फेऱ्या दीर्घकाळासाठी बंद असतानाही रेल्वेला भाडं देण्यात आलं होतं. आता परिस्थिती पूर्वपदावर आल्याने या ट्रेनची स्थितीही सुधारेल.