देशातील एकमेव ट्रेन.. नाश्त्यापासून जेवणापर्यंत सर्व काही मोफत; महाराष्ट्रातून आहे मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 14:50 IST2025-04-14T14:46:06+5:302025-04-14T14:50:57+5:30
Free Food in Train : भारतात एक ट्रेन अशी आहे, जिच्यामध्ये प्रवासादरम्यान तुम्हाला नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सर्वकाही मोफत दिले जाते.

देशात सर्वात स्वस्त, वेगवान आणि सुरक्षित प्रवास वाहन म्हणजे रेल्वे. त्यामुळेच भारतीय रेल्वेने दररोज सुमारे २.५ कोटी प्रवासी प्रवास करतात. देशभरात जवळपास १३,४५२ गाड्या दररोज धावतात. यामध्ये अनेक लक्झरी आणि सुपरफास्ट गाड्यांचाही समावेश आहे. रेल्वेने प्रवास जरी स्वस्त असला तरी खाण्यापिण्यासाठी बराच खर्च होतो.
पण, जर तुम्हाला सांगितलं की सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत तुम्हाला सर्व मोफत दिले जाईल. तर तुमचा विश्वास बसेल का? पण, हे खरंय. या हजारो गाड्यांमध्ये, फक्त एकच ट्रेन अशी आहे जिथे प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते.
रेल्वेची ही विशेष ट्रेन देशातील दोन प्रसिद्ध धार्मिक स्थळांदरम्यान धावते. गेल्या २९ वर्षांपासून या ट्रेनमधील प्रवाशांना मोफत जेवण दिले जात आहे. वास्तविक, भारतीय रेल्वे धावत्या गाड्यांमध्ये सर्व प्रवाशांना जेवण पुरवते. पण, ही सुविधा सशुल्क आहे. पण, ही एकमेव ट्रेन आहे, जी प्रवासादरम्यान तुम्हाला कोणतेही शुल्क न घेता मोफत नाश्ता आणि रात्रीचे जेवण देते.
ही रेल्वे गाडी महाराष्ट्रातील नांदेड शहरापासून पंजाबमधील अमृतसर शहरापर्यंत धावते. या ट्रेनचे नाव सचखंड एक्सप्रेस (१२७१५) आहे. ही ट्रेन अमृतसरमधील प्रमुख धार्मिक स्थळ श्री हरमंदिर साहिब गुरुद्वारा येथून सुरू होते आणि महाराष्ट्रातील नांदेड जिल्ह्यातील श्री हजूर साहिब गुरुद्वाराला जाते.
१७०८ मध्ये नांदेडमध्ये शीखांचे १० वे गुरु श्री गुरु गोविंद सिंहजी यांचे निधन झाले. ही ट्रेन या दोन धार्मिक स्थळांमधील प्रवास पूर्ण करते.
सचखंड एक्सप्रेस ट्रेन २००० किलोमीटर अंतर प्रवास करते. या प्रवासादरम्यान ३९ स्थानकांवर थांबते. प्रवासादरम्यान, ६ थांब्यांवर लंगर आयोजित केला जातो, जिथे प्रवाशांना मोफत जेवण दिले जाते. नवी दिल्ली रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त, भोपाळ, परभणी, जालना, औरंगाबाद आणि मराठवाड्यातील काही ठिकाणी ही ट्रेन थांबते. हा प्रवास पूर्ण करण्यासाठी ट्रेनला सुमारे ३३ तास लागतात.
या ट्रेनचे थांबे देखील अशा प्रकारे ठेवले आहेत की प्रवाशांना आरामात जेवणाचा आनंद घेता येईल. ट्रेनमधील जेवणाचा मेनू बदलत राहतो, पण बहुतेक वेळा तुम्हाला कढी-भात, छोले, डाळ, खिचडी आणि बटाटा-फुलकोबी किंवा इतर कोणतीही भाजी दिली जाते.
या योजनेतील खर्च गुरुद्वारांना मिळालेल्या देणग्यांमधून केला जातो. मोफत लंगरचा आनंद घेण्यासाठी, या ट्रेनमधील सामान्य ते एसी बोगीतील प्रवासी त्यांच्यासोबत भांडी घेऊन जातात.