Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी मोठा दिलासा! आजपासून 'ही' सुविधा सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 08:59 AM2022-06-29T08:59:56+5:302022-06-29T09:05:36+5:30

Indian Railways : प्रवाशांना आता जनरल तिकिटावर कोणत्याही मेल किंवा एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे.

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद करण्यात आलेली रेल्वेची जनरल तिकीट सुविधा तब्बल अडीच वर्षानंतर सुरू करण्यात आली आहे. आजपासून म्हणजेच २९ जूनपासून जनरल तिकीट घेऊन मेल आणि एक्सप्रेस रेल्वेमधून प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.

रेल्वेच्या या व्यवस्थेमुळे प्रवाशांना तिकीट दरात २० रुपयांपर्यंत बचत करावी लागणार आहे. त्यामुळे जनरल श्रेणीतील डब्यांमधील आरक्षणाची पद्धत पूर्णपणे रद्द होणार आहे. १ जुलैपर्यंत ही यंत्रणा पूर्णपणे रुळावर येईल.

प्रवाशांना आता जनरल तिकिटावर कोणत्याही मेल किंवा एक्सप्रेस ट्रेनमध्ये प्रवास करता येणार आहे. सध्या प्रवाशांना जनरल तिकिटावर १५ रुपये, स्लीपरवर २० रुपये, एसी-३ मध्ये ४०, एसी-२ मध्ये ५० आणि एसी-१ मध्ये ६० रुपये असे आरक्षण शुल्क द्यावे लागते.

सध्या ज्या गाड्या चालवल्या जात आहेत, त्यामध्ये फक्त एका बाजूने सामान्य तिकीट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. कोरोनाच्या काळात रेल्वेने ट्रेनमधील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनरल डब्यांमध्ये आरक्षणाची व्यवस्था लागू केली होती.

सामान्य कोचमध्ये तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशाला भाड्याच्या रकमेव्यतिरिक्त 15 रुपये आरक्षण शुल्क भरावे लागत होते. जनरल डब्यातील जागा रिकाम्या असल्या तरी गाडी सुटण्याच्या चार तास आधी तिकिटांचे आरक्षण करणे बंधनकारक होते.

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, बहुतांश गाड्यांमध्ये जनरल तिकीट काढण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे. आजपासून पश्चिम मध्य रेल्वेच्या गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू होणार आहे. त्यानंतर 5 जुलैपर्यंत गाड्यांच्या 100 टक्के सामान्य डब्यांसाठी आरक्षण करण्याचे बंधन रद्द केले जाईल.

दरम्यान, कोरोनापूर्वी जवळपास सर्वच ट्रेनमध्ये जनरल क्लासची तिकिटे उपलब्ध होती. कोरोनाच्या काळात काही महिने रेल्वे सेवा बंद होती. त्यानंतर रुळावरून गाड्या धावू लागल्यावर जनरल तिकीट बंद करण्यात आले.