भारतीयांना विमा काढण्याची परवानगी नव्हती; जाणून घ्या LIC च्या जन्माची कहाणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2022 01:27 PM2022-12-01T13:27:33+5:302022-12-01T13:32:31+5:30

जगात विम्याच्या इतिहासाची सुरुवात ही थोडी नव्हेतर सहा हजार वर्षांपासूनची आहे. भारतात खूप उशिराने सुरुवात झाली.

देशात सध्या अनेक विमा कंपन्या आहेत. त्यात एलआयसीचे नाव खूप मोठे आहे. एवढे की ती जगातील सर्वात मोठी कंपनी होऊ शकते. एलआयसीने सर्वसामान्यांच्या आयुष्याला आर्थिक बळ दिले आहे. असे असले तरी एलआयसी ही काही भारतातील पहिली विमा कंपनी नव्हती. मुळात भारतीयांना विमा काढण्याची परवानगीही नव्हती. याच गोष्टींतून एलआयसी सारख्या कंपन्यांचा जन्म झाला.

विम्याचे कवच अनेकांना फायदेशीर ठरले आहे. निवृत्तीनंतर, उतारवयात कमाई आणि अकाली मृत्यूपश्चात कुटुंबाला आर्थिक संरक्षण आदी घटनांसाठी विमा हा खूप फायद्याचा ठरतो. सुरुवातीला विमा का काढावा, जर तुम्हाला काही झाले तर वगैरे लोकांना सांगितले जायचे. तेव्हा लोक यावर चिडायचे. परंतू आता लोकांना त्याचे फायदे कळू लागल्याने काही प्रमाणावर का होईना त्यांच्यात जागृती होऊ लागली आहे. जगात विम्याच्या इतिहासाची सुरुवात ही थोडी नव्हेतर सहा हजार वर्षांपासूनची आहे.

हाच जीवन विमा आधुनिक रुपात भारतात इंग्लंडमधून आला. इंग्रजांसाठी, युरोपीय लोकांसाठी १८१८ मध्ये विमा भारतात आणण्यात आला. भारतात पहिली विमा कंपनी ही एलआयसी नव्हती, तर ओरिएंटल लाइफ इंश्योरेंस कंपनी होती. कोलकातामध्ये इंग्रजांनी तिची स्थापना केली होती. मात्र, भारतीयांना विमा दिला जात नव्हता.

यामुळे भारतीयांनाही विमा मिळावा यासाठी मुट्टीलाल सीलसारख्या प्रतिष्ठीत लोकांनी तेव्हा खूप प्रयत्न केले. यानंतर काही विदेशी विमा कंपन्यांनी भारतीयांना विमा देण्यास सुरुवात केली. परंतू या कंपन्यांकडून भारतीयांसाठी इंग्रजांपेक्षा अधिकचा प्रिमिअम वसूल केला जात होता. अखेर १८७० मध्ये बॉम्बे म्यूचुअल लाइफ एश्योरेंस सोसाइटीने भारतीयांसाठी भारतीय जीवन विमा कंपनी सुरु केली. या कंपनीद्वारे स्वस्तात विमा दिला जाऊ लागला.

विसाव्या शतकात विमा कंपन्यांचा चांगला विस्तार होऊ लागला. १९३८ मध्ये जीवन विमा आणि गैर जीवन विम्याचा व्यवसाय नियंत्रित करण्यासाठी कायदा आला. याद्वारे सरकारचे कठोर नियंत्रण निर्माण झाले. नंतर विमा क्षेत्राच्या राष्ट्रीयीकरणाची मागणी होऊ लागली. यामुळे 1944 विधानसभेत जीवन बीमा अधिनियम 1938 मध्ये संशोधन करण्यासाठी विधेयक मांडण्यात आले.

१९४७ ला भारत स्वतंत्र झाला आणि नवीन नियम कायदे आले. १९ जानेवारी १९५६ ला विमा कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यावेळी भारतात एकूण १५४ विमा कंपन्या होत्या. तसेच १६ परदेशी आणि प्रॉव्हिडंट कंपन्या होत्या. यांचे राष्ट्रीयीकरण दोन टप्प्यांत करण्यात आले. यामुळे या कंपन्यांवर सरकारी मालकी निर्माण झाली. याचवेळी एलआयसीची निर्मिती झाली. ५ कोटींची गुंतवणूक करत सरकारने एलआयसीची स्थापना केली. याचा उद्देश गावागावात विम्याचे संरक्षण पोहोचविणे हा होता.

1956 मध्ये, LIC ची कॉर्पोरेट कार्यालयाव्यतिरिक्त 5 क्षेत्रीय कार्यालये, 33 मंडळ कार्यालये आणि 212 शाखा कार्यालये होती. विस्तार करण्यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात एक LIC शाखा उघडण्याची योजना आखण्यात आली. एलआयसीच्या व्यवसायात कमालीची सुधारणा झाली. 1957 मध्ये सुमारे 200 कोटींवरून महामंडळाने 1969-70 मध्येच 1000 कोटींचा आकडा पार केला.

2019 मध्ये देशातील 29 कोटी लोकांकडे LIC ची एक किंवा दोन पॉलिसी होत्या. LIC ने 15 ऑक्टोबर 2005 पर्यंत 1,01,32,955 नवीन पॉलिसी जारी करण्याचा आकडा ओलांडला होता. आज एलआयसीचे बाजारमुल्य चार लाख कोटी रुपयांहून अधिक आहे.