Indira IVF IPO: चित्रपटामुळे फिस्कटला ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन, चित्रपटात असे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 19:30 IST2025-03-26T19:21:44+5:302025-03-26T19:30:51+5:30

Indira IVF IPO Date: आरोग्य क्षेत्रातील मोठा आयपीओ म्हणून इंदिरा आयव्हीएफ आयपीओची चर्चा आहे. पण, एका चित्रपटामुळे ३५००० कोटींचा आयपीओ आणण्याचा प्लॅन फिस्कटला आहे. सेबीने काही मुद्दे उपस्थित केले आहेत. हे प्रकरण नेमके काय आहे, जाणून घ्या...

Indira IVF IPO News: सगळ्यांचे लक्ष असलेल्या इंदिरा आयव्हीएफचा आयपीओ लांबणीवर गेला आहे. इंदिरा आयव्हीएफचा आयपीओ ३५००० कोटींचा असून, एक चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख आणि आयपीओ आणण्याच्या तारखेबद्दलच सेबीने प्रश्न उपस्थित केले आहेत. (Indira ivf 3500 crore ipo update)

१९८८ मध्ये डॉ. अजय मुर्डिया यांनी राजस्थानातील उदयपूरमध्ये एका क्लिनिकमधून इंदिरा आयव्हीएफची सुरूवात केली होती. आता याचा आयपीओ येणार होता, पण एक चित्रपट आला आणि त्याचा संबंध या आयपीओशी जोडला जात आहे. त्यामुळे आयपीओ आणण्याचा प्लॅनच बॅकफूटवर आला आहे.

इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, सेबीने कंपनीशी संबंधित आणि काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या 'तुमको मेरी कसम' चित्रपटाबद्दल आक्षेप घेतला आहे. हा चित्रपट आयपीओचा अप्रत्यक्षपणे प्रचार करत आहे, अशी शंका सेबीने उपस्थित केली आहे.

इंदिरा आयव्हीएफने सेबीकडे डीआरएचपी दाखल केला होता. पण, सेबीने चित्रपटाचे प्रदर्शन आणि आयपीओ फायलिंग यासंबंधात प्रश्न उपस्थित केले. हा चित्रपट डॉ. अजय मुर्डिया यांच्या जीवनावर आधारित असून, त्यांनीच इंदिरा आयव्हीएफची सुरूवात केलेली आहे. इंदिरा आयव्हीएफची गोष्ट या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.

डॉ. मुर्डिया यांच्या मुलांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून, अनुपम खेर हे डॉ. अजय मुर्डिया यांच्या भूमिकेत आहेत. तर विक्रम भट्ट या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. माध्यमांच्या रिपोर्टनुसार, आयपीओबद्दल गुंतवणुकदारांना प्रभावित करण्याचा चित्रपटाचा हेतू असल्याचे सेबीला वाटते.

असे झाल्यास शेअर बाजाराच्या नियमांचं उल्लंघन होऊ शकते. त्यावरून सेबीने प्रश्न उपस्थित केले आणि इंदिरा आयव्हीएफला आपला ३५००० कोटींचा आयपीओ अनिश्चित काळासाठी मागे घ्यावा लागला आहे.

तुमको मेरी कसम चित्रपट अलिकडेच प्रदर्शित झाला आहे. डॉ. अजय मुर्डियांचे जीवनचरित्र म्हणून या चित्रपटाचे प्रमोशन केले गेले आहे. या चित्रपटात नाट्यमय घटना, कोर्टातील प्रकरणाचाही केला गेला आहे.

१२ कोटी रुपये बजेट असलेला तुमको मेरी कसम हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार कमाल करू शकला नाही. या चित्रपटाने आतापर्यंत केवळ ५४ लाख रुपयांचीच कमाई केली आहे.

इंदिरा आयव्हीएफचे भारतात फर्टिलिटी उपचारांसाठी मोठे नाव आहे. कंपनीचे देशात १५० केंद्र आणि ३३० विशेष तज्ज्ञ डॉक्टर कार्यरत आहे. मागील वर्षी गुंतवणूकदार फर्म EQT ने कंपनीत हिस्सेदारी खरेदी केली आहे.

१९९८ मध्ये सुरू झालेल्या इंदिरा आयव्हीएफ मोठी कंपनी बनली आहे. २०१५ मध्ये कॉर्पोरेट कंपनी म्हणून ती पुढे आली. कंपनीच्या दाव्यानुसार इंदिरा आयव्हीएफचे देशात १५० केंद्र असून, १.६० लाख जोडप्यांनी उपचार घेतले आहेत.

(टीप : यामध्ये केवळ आयपीओबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)