पहिल्याच दिवशी महागाईचा झटका! LPG सिलिंडरचा दर 39 रुपयांनी वाढला, पण एक मोठा दिलासाही मिळाला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2024 09:17 AM2024-09-01T09:17:23+5:302024-09-01T09:30:09+5:30

LPG Cylinder: सरकारी तेल आणि गॅस विपणन कंपन्यांनी आज, 1 सप्टेंबरपासून (रविवार) एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल केले आहेत...

नव्या महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. सरकारी तेल आणि गॅस विपणन कंपन्यांनी आज, 1 सप्टेंबरपासून (रविवार) एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल केले आहेत.

या दरवाढीनंतर आता 19 किलोचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर महागला आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात यावेळीही कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

सरकारी तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नोटिफिकेशननुसार, आजपासून देशातील विविध शहरांमध्ये एलपीजी सिलिंडरच्या दरात सुमारे 39 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मात्र, ही वाढ केवळ 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरसाठीच आहे.

सलग दुसऱ्या महिन्यात वाढवण्यात आली किंमत - यापूर्वी ऑगस्ट महिन्यात व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 8 ते 9 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. म्हणजेच व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती सलग दुसऱ्या महिन्यात वाढवण्यात आल्या आहेत.

आपल्या शहरातील दर - या नव्या दर वाढीनंतर, आजपासून दिल्लीत 19 किलोच्या व्यावसाइक एलपीजी सिलिंडरची किंमत 1,691.50 रुपये झाली आहे. हा सिलिंडर कोलकात्यात 1,802.50 रुपयांना मिळेल. मुंबईतील लोकांना या सिलिंडरसाठी 1,644 रुपये मोजावे लागतील. तर चेन्नईमध्ये हा सिलिंडर 1,855 रुपयांवर पोहोचला आहे.

घरगुती सिलिंडरच्या किमतीत 6 महिन्यांपासून कुठलाही बदल नाही - मार्च महिन्यापासून घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिला दिनानिमित्त (8 मार्च 2024) एलपीजी सिलिंडरच्या किमती 100 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली होती. त्याच्या एक दिवस आधीही म्हणजे ७ मार्चला मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या बाबतीत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.

यानंतर, मंत्रिमंडळाने 31 मार्च 2025 पर्यंत पीएम उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपये सबसिडी देण्याची घोषणा केली होती. यानंतर 14 किलोच्या सिलिंडरच्या किंमतीत कुठलाही बदल झालेला नाही.