Infosys ची छप्परफाड कमाई! गत तिमाहीत ५,६८६ कोटींचा नफा; यंदा ५० हजार नोकऱ्या देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 10:46 PM2022-04-14T22:46:08+5:302022-04-14T22:50:46+5:30

इन्फोसिसला एकीकडे प्रचंड नफा झाला असून, दुसरीकडे ८ हजार कर्मचाऱ्यांनी कंपनीला रामराम केला आहे.

आताच्या घडीला विविध कंपन्यांचे गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीचे अहवाल समोर येऊ लागले आहेत. टाटा समूहाच्या TCS नंतर आता, देशातील दुसऱ्या क्रमांकाची सॉफ्टवेअर सेवा क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसने आपल्या तिमाहीची आकडेवारी जारी केली आहे.

Infosys ने टीसीएसपाठोपाठ चौथ्या तिमाहीत चांगल्या कामगिरीची नोंद करत ५,६८६ कोटी रुपयांच्या निव्वळ नफ्याची नोंद केली. वार्षिक आधारावर कंपनीच्या नफ्यात १२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

बेंगळूरु येथे मुख्यालय असलेल्या Infosys ने गेल्या वर्षी याच काळात ५,०७६ कोटी रुपयांचा करपश्चात नफा नोंदविला होता. मात्र गेल्या तिमाहीच्या तुलनेत सरलेल्या मार्च तिमाहीत निव्वळ नफ्यात २ टक्क्यांची घसरण झाली आहे. गेल्या तिमाहीत कंपनीने ५,८०९ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता.

Infosys कंपनीने जानेवारी ते मार्च २०२२ या चौथ्या तिमाहीत ३२,२७६ कोटी रुपयांचा महसूल मिळविला आहे. वार्षिक तुलनेत त्यात २३ टक्क्यांची वाढ झाली आहे, मात्र ऑक्टोबर ते डिसेंबर २०२१ तिमाहीशी तुलना करता त्यात एक टक्क्याची घसरण झाली आहे.

Infosys ने या तिमाहीत ३१,८६७ कोटींच्या महसुलाची कंपनीने नोंद केली होती. तर जानेवारी-मार्च २०२१ तिमाहीत कंपनीने २६,३११ कोटी रुपयांचा एकत्रित महसूल मिळविला होता.

सरलेल्या २०२१-२२ या संपूर्ण आर्थिक वर्षांत Infosys ने २२,११० कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे. जो त्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत १४ टक्क्यांनी अधिक राहिला आहे. एप्रिल-मार्च २०२१ या कालावधीत कंपनीने वर्षभरात १९,३५१ कोटींचा नफा मिळविला होता.

Infosys ने महसुलाच्या आघाडीवर २१ टक्क्यांची वाढ नोंदवत १,२१,६४१ कोटी रुपयांची महसूल प्राप्ती केली आहे. आधीच्या आर्थिक वर्षांत कंपनीने १,००,४७२ कोटी रुपयांचा महसूल मिळविला होता.

Infosys कंपनीच्या संचालक मंडळाने भागधारकांना खूश करताना, पाच रुपये दर्शनी मूल्य असलेल्या प्रत्येक समभागासाठी १६ रुपये अंतिम लाभांश जाहीर केला आहे.

सतत होणाऱ्या डिजिटल परिवर्तनामुळे प्रकल्प राबविण्याच्या त्यांच्या गरजेनुरूप ग्राहक अल्प कालावधीच्या कराराला प्राधान्य देत असले तरी कंपनीने सरलेल्या तिमाहीत स्थिर कामगिरी केली आहे, असे Infosys कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सलील पारेख यांनी सांगितले.

दरम्यान, मार्च तिमाहीत Infosys चा एट्रिशन रेट २७.७ टक्केपर्यंत वाढला, जो डिसेंबर तिमाहीत २५.५ टक्के होता. इन्फोसिसने गेल्या आर्थिक वर्षात ८५ हजार फ्रेशर्सची भरती प्रक्रिया राबवली होती आणि चालू आर्थिक वर्षात ५० हजार फ्रेशर्सना नोकऱ्या देण्याची योजना आहे.

जगभरात दबदबा असलेली भारतातील प्रमुख आयटी कंपनी इन्फोसिसला टाटा बायबाय करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गेल्या तीन महिन्यांत तब्बल ८०००० कर्मचाऱ्यांनी कंपनी सोडली आहे. कर्मचारी सोडून जाण्याच्या या वेगाने टीसीएसलाही मागे टाकले आहे.

आयटी कंपन्यांमध्ये टॅलेंट असलेले कर्मचारी फोडण्याचे वॉर नेहमीच सुरु असते. अशावेळी जास्त पगार ऑफर केला जातो. पोस्टही वाढविली जाते आणि कर्मचारी इकडच्या होडीतून तिकड्च्या होडीत उड्या मारतात, असे सांगितले जाते.