आता झटपट करता येणार रेल्वेच्या तिकिटाचं बुकिंग, IRCTC च्या नव्या वेबसाईटचं आज होतंय लाँचिंग

By बाळकृष्ण परब | Published: December 31, 2020 08:38 AM2020-12-31T08:38:19+5:302020-12-31T08:44:50+5:30

Indian Railway IRCTC : रेल्वेकडून IRCTC च्या नव्या वेबसाईटचं अनावरण आज दुपारी होणार आहे. नव्या वेबसाइटवर तिकीट बुक करणे अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.

रेल्वेचे ऑनलाइन तिकीट बुक करताना प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. आता रेल्वेचं तिकीट बुकिंग करणं अधिक सुलभ करण्यासाठी भारतीय रेल्वेने अजून एक पाऊल टाकले आहे. रेल्वेकडून IRCTC च्या नव्या वेबसाईटचं अनावरण आज दुपारी होणार आहे. नव्या वेबसाइटवर तिकीट बुक करणे अधिक सुलभ आणि जलद होणार आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ३१ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता IRCTC च्या नव्या संकेतस्थळाचं अनावरण होणार आहे. याबाबत रेल्वेमंत्र्यांनी सांगितले की, IRCTC चे संकेतस्थळ आणि अॅप अपग्रेड झाल्यानंतर प्रवाशांना आधीच्या तुलनेत अधिक वेगाना तिकीट बुक करता येतील.

म्हणजेच लवकरच इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनची वेबसाइट नव्या रूपात दिसणार आहे. नव्या वेबसाइटवर प्रवाशांसाठी अधिक चांगले फिचर्स असतील. तसेच नव्या वेबसाइटवर अधिक लोड पडला तरी ती हँग होणार नाही, असेही IRCTC कडून सांगण्यात आले.

एवढेच नाही तर नव्या वेबसाइटमध्ये आधीच्या तुलनेत अधिक अॅडही दिसतील. त्यामुळे IRCTC ला अधिकचा महसूल मिळू शकेल. तिकीट बुकिंगसह जर तुम्हाला जेवण बुक करायचे असल्यास तुम्हाला सहजपणे पर्याय उपलब्ध होतील.

रेल्वे प्रवाशांची वाढती संख्या विचारात घेऊन आता नव्या वेबसाइटवर प्रत्येक मिनिटाला १० हजारांहून अधिक तिकीट बुक होऊ शकतील. सध्या सेवेत असलेल्या IRCTC च्या वेबसाइटवर प्रत्येक मिनिटाला कमाल ७ हजार ५०० पर्यंत तिकिटांचे बुकिंग होते. ई तिकिटींग वेबसाइटच्या माध्यमातून प्रवाशांना त्यांच्या प्रवासासाठी संपूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्याचा रेल्वेचा प्रयत्न आहे.

रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार IRCTC च्या नव्या ई-तिकिटिंग संकेतस्थळावर आणि अॅपवर तिकीट बुकिंगमध्ये सर्व सुविधा सहजपणे उपलब्ध होतील. तत्पूर्वी २०१८ मध्ये IRCTC चे नवे रूप समोर आले होते. तेव्हापासून ही वेबसाइट प्रवाशांच्या सेवेत आहे. म्हणजे प्रवाशांसाठी नव्या वर्षात नव्या वेबसाइटची भेट मिळणार आहे.

Read in English