कर्जावर पाच पटींपेक्षाही अधिक वाढलंय व्याज, जमा रकमेवर कमी व्याज देतायत सरकारी बँका

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 09:10 AM2022-11-04T09:10:21+5:302022-11-04T09:15:00+5:30

महागडे कर्ज आणि ठेवींवर कमी व्याजदर यामुळे ग्राहकांचे दुहेरी नुकसान होत आहे.

महागडे कर्ज आणि ठेवींवर कमी व्याजदर यामुळे ग्राहकांचे दुहेरी नुकसान होत आहे. कर्जावरील व्याजदरात झपाट्याने वाढ होत असल्याने ग्राहकांच्या ईएमआयमध्येही मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

त्याच वेळी, एफडी आणि बचत खात्यावर खूपच कमी व्याज मिळत आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने गेल्या सहा महिन्यांत देशात कर्जाच्या ईएमआयवरील व्याजदरात ज्या दराने वाढ केली आहे त्या तुलनेत ठेवींवरील व्याजदर वाढत नाहीत.

रिसर्च रिपोर्टनुसार कर्ज आणि ठेवींमधील वाढीचं अंतर 10 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. महागाई नियंत्रित करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात अनेक वेळा वाढ केली आहे. त्यामुळे बँकाही कर्जाच्या ईएमआयमध्ये वाढ करत आहेत.

मात्र, ठेवींवर कमी व्याज वाढत असल्याने ग्राहकांचंच नुकसान होत आहे. आगामी काळात कर्ज आणि ठेवींमधील वाढती तफावत पाहता ठेवींना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांचे व्याजदर वाढू शकतात, असा विश्वास केअर रेटिंगनं व्यक्त केलाय.

सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबद्दल बोलायचे तर, येथील ठेवींवरील सरासरी व्याजदर मार्च 2022 मध्ये 5.11 टक्क्यांच्या तुलनेत सप्टेंबर 2022 मध्ये 5.41 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. दुसरीकडे, जर खाजगी क्षेत्रातील बँकांबद्दल बोलायचं झालं तर, हा आकडा 5.13 टक्क्यांवरून 5.48 टक्के झाला आहे.

बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार, मार्च ते सप्टेंबर 2022 दरम्यान रेपो दर 1.9 टक्क्यांनी वाढला आहे. त्यानुसार, कर्जावरील व्याजदरात वाढ झाली, परंतु ठेवींच्या दरात केवळ 0.35 टक्क्यांनी वाढ झाली. त्यामुळे ठेवींच्या तुलनेत कर्जावरील व्याज पाचपटीने वाढले.

केअर रेटिंगच्या रिपोर्टनुसार जमा आणि कर्जाच्या वृद्धीतील अंतर 10 वर्षांच्या उच्चांकी स्तरावर पोहोचले आहे. यामध्ये 2016 या नोटबंदीचंही वर्ष येतं. परंतु त्याचा यात समावेश करण्यात आलेला नाही.