मस्तच! १ लाखावर ४० हजारांचा फायदा; PM मोदीही घेतायत पोस्टाच्या 'या' स्कीमचा लाभ By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2021 02:45 PM 2021-03-05T14:45:46+5:30 2021-03-05T14:55:02+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले तेव्हा त्यांनी पोस्ट ऑफीसच्या योजनांचाही खूप प्रचार केला. गेल्या काही वर्षात पोस्ट ऑफीसच्या बचत योजनांप्रति लोकांचं आकर्षण देखील वाढलं आहे. पंतप्रधान मोदींनी देखील पोस्टाच्या एका स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे. याच स्कीमबाबत आपण आज जाणून घेणार आहोत... पोस्ट ऑफीसच्या बचत योजनांमध्ये चांगला परतावा (returns) मिळतो. याशिवाय या योजना अतिशय सुरक्षित देखील मानल्या जातात. पोस्टाची अशीच एक योजना आहे की ज्यात १ लाख रुपयांची गुंतवणूक केली की त्यावर तब्बल ४० हजार रुपयांपर्यंत व्याज मिळतं आणि याच योजनेमध्ये खुद्द पंतप्रधान मोदींनीही गुंतवणूक केली आहे.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (National Savings Certificates) नावाची पोस्टाची जबरदस्त योजना आहे. याची मुदत कालावधी ५ वर्षांची आहे आणि यात तुम्हाला ६.८ टक्के व्याज मिळते. व्याजाची आकारणी वार्षिक स्वरुपात केली जाते.
तुम्ही जमा केलेल्या रकमेवर व्याज हे मात्र जमाराशीची मुदत संपल्यावरच जमा केलं जातं. विशेष म्हणजे या स्कीममध्ये तुम्ही कमीत कमी १ हजार रुपये गुंतवू शकता. त्यामुळे १०० च्या गुणाकारात रक्कम गुंतवता येते.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमधील गुंतवणुकीचा आणखी एक फायदा म्हणजे तुम्हाला आयकरात ८० सी अंतर्गत सुट देखील मिळवता येते. ८० सीची मर्यादा तब्बल १.५० लाख रुपयांपर्यंत आहे.
पोस्टाच्या या योजनेत तुम्हाला ६.८ टक्के व्याज मिळते. उदा. तुम्ही या स्कीम अंतर्गत १ हजार रुपयांची गुंवणूक केली असता मुदतीनंतर तुम्हाला १३८९.४० रुपये मिळतात. म्हणजेच तुम्हाला ३८९.४९ रुपयाचा लाभ होतो. याचप्रमाणं १० हजार गुंतवले तर ३८९० रुपये आणि १ लाख रुपये गुंतवले तर ३८,९४९ रुपये तुम्हाला व्याज स्वरुपात मिळू शकतात.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या स्कीममध्ये गुंतवणूक केली आहे. गेल्या वर्षी जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार मोदींनी या स्कीममध्ये ८४,३२१ रुपये गुंतवले आहेत.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम तुम्हाला फक्त पोस्ट ऑफीसमध्ये जाऊनच सुरू करता येईल.
विशेष म्हणजे, या स्कीममध्ये तीन लोक सामायिक खात्याच्या रुपातही (जॉइंट अकाऊंट) गुंतवणूक करू शकतात.
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट योजना तुम्हाला ५ वर्षांची मुदत संपण्याआधी बंद करता येत नाही. मात्र, स्कीम धारकाचा मृत्यू झाल्यास ती बंद करता येऊ शकते.