योग्य गुंतवणूक करा, 'ही' सरकारी स्कीम तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश; सहजरित्या समजून घ्या गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 08:45 AM2023-11-04T08:45:02+5:302023-11-04T09:06:30+5:30

कोट्यधीश होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर गुंतवणूक हा सर्वोत्तम मार्ग आहे.

कोट्यधीश होणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर गुंतवणूक हा सर्वोत्तम मार्ग आहे. दीर्घकालीन गुंतवणूक तुम्हाला सहजरित्या कोट्यधीश बनवू शकते.

तुम्ही नोकरी करत असाल तर लवकरात लवकर गुंतवणूक सुरू करा. तुम्ही जितकी जास्त गुंतवणूक कराल तितका चांगला परतावा तुम्हाला मिळेल. चला जाणून घेऊया अशा सरकारी योजनेबद्दल जी तुम्हाला २५ वर्षांत हमखास कोट्यधीश बनवू शकते.

आम्ही देशातील सर्वात लोकप्रिय स्मॉल सेव्हिंग स्कीम सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) बद्दल बोलत आहोत. या योजनेत तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि तुम्हाला त्यावर उत्तम व्याजही मिळेल. पीपीएफ ही एक लोकप्रिय योजना आहे कारण त्यात जमा केलेले पैसे, मिळणारे व्याज आणि मॅच्युरिटीवर मिळणारी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे.

सरकारच्या EEE योजनेत त्याचा समावेश आहे. EEE म्हणजे Exempt. दरवर्षी ठेवींवर कर सवलतीचा दावा करण्याचा पर्याय आहे. दरवर्षी मिळणाऱ्या व्याजावर कोणताही कर भरावा लागत नाही. अकाऊंट मॅच्युअर झाल्यावर, संपूर्ण रक्कम करमुक्त असेल.

या योजनेअंतर्गत, तुम्ही वार्षिक किमान ५०० रुपये आणि जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता. पीपीएफ खातं मॅच्युअर होण्यासाठी १५ वर्षे लागतात.

बँका आणि पोस्ट ऑफिसमधील फिक्स्ड डिपॉझिटपेक्षा पीपीएफ योजना जास्त व्याज देते. ही योजना १ एप्रिल २०२३ पासून ७.१ टक्के व्याजदर देत आहे.

कोणताही भारतीय पीपीएफ खातं उघडू शकतो. पीपीएफ योजनेत १५ वर्षांपर्यंत गुंतवणूक करावी लागते. जर तुम्हाला ते मॅच्युरिटीनंतरही चालू ठेवायचं असेल तर अशा परिस्थितीत तुम्ही पीपीएफ खात्याचा कालावधी ५ वर्षांसाठी वाढवू शकता.

पीपीएफ योजनेत थोडे पैसे जमा करून तुम्ही कोट्यधीश बनू शकता. याचं सूत्र अगदी सोपं आहे. दररोज केवळ ४११ रुपये म्हणजेच वार्षिक १.५ लाख रुपये गुंतवून तुम्ही २५ वर्षांत ७.१ टक्के व्याजदरानं १.३ कोटी रुपये कमवू शकता.