Investment Tips in Marathi: तुम्ही दर महिन्याला १००० रुपये वाचवू शकता का? विचार करा, २.३३ कोटी मिळवा By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 03:48 PM 2021-12-29T15:48:23+5:30 2021-12-29T16:03:15+5:30
Investment Tips in Marathi: अनेकांना वाटते की १००० रुपयांच्या गुंतवणूकीतून काय मिळणार आहे, गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम हवी, असे म्हणतात आणि आपल्याच नशीबावर धोंडा मारुन घेतात. आजकाल खर्चच एवढे वाढलेत की, महिन्याचा पगार संपतोच, पण नंतरचा खर्च करण्यासाठी क्रेडिट कार्ड वापरावे लागते. अनेकांसाठी १००० रुपये वाचविणे खूप मोठी रक्कम नाहीय. एखादा छोटा मुलगा देखील त्याला पालक देत असलेल्या पैशांतून एवढी रक्कम साठवू शकतो. गाव असेल किंवा शहर तुम्हाला तुमच्यासाठी काही पैसे राखून ठेवावेच लागतात.
जर तुम्ही महिन्याला १००० रुपये वाचवू शकत असाल तर तुम्हाला हे पैसे योग्य ठिकाणी गुंतविले तर २ कोटींहून अधिकची रक्कम तुम्ही मिळवू शकता. पण अनेकांना वाटते की १००० रुपयांच्या गुंतवणूकीतून काय मिळणार आहे, गुंतवणुकीसाठी मोठी रक्कम हवी, असे म्हणतात आणि आपल्याच नशीबावर धोंडा मारुन घेतात.
असे म्हणणाऱ्यांच्या हातात कधी मोठी रक्कम येत नाही आणि आली तरी ते गुंतवणूक करत नाहीत. तुम्ही असे करू नका. अशा विचारात असाल तर किती वर्षे संपली तरी शेवटी तुमच्या हातात काहीच राहणार नाही.
तुम्हीही असाच विचार करत असाल तर नवीन वर्षात तो बदला. छोट्या छोट्या रकमेच्या गुंतवणुकीतून तुम्ही मोठी रक्कम मिळवू शकता. १००० रुपये म्युच्युअल फंडात गुंतविले तर करोडपती होऊ शकता. सिस्टेमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनद्वारे तुम्ही हे करू शकता. पण सुरुवात जरूर करा.
तुम्ही हे पैसे बँकेत ठेवून कोटींमध्ये जमविण्याचे लक्ष्य मिळवू शकत नाहीत. यासाठी तुम्हाला दर महिन्याला Mutual Fund मध्ये १००० रुपये जमा करावे लागतील. गेल्या दोन दशकांत म्युच्युअल फंडाने चांगला रिटर्न दिला आहे. काही फंड असे आहेत ज्यांनी २० टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला आहे. (SIP in Marathi))
जाणून घ्या गणित... जर तुम्ही २० वर्षांपर्यंत महिन्याला १००० रुपये बाजुला काढले आणि गुंतवले तर त्यावर १२ टक्के वार्षिक व्याज मिळते. २० वर्षांनी तुम्हाला 9,99,148 रुपये मिळतील. तुम्हाला एकूण 2,40,000 रुपये जमा करावे लागतील. जर तुम्हाला १५ टक्के व्याज मिळाले तर १५ लाख रुपये मिळतील. २० टक्के रिटर्न मिळाला तर तुम्हाला 31,61,479 रुपये मिळतील.
३० वर्षांसाठी गुंतवणूक केली तर... जर तुम्ही ३०, ३५ वर्षांचे असाल आणि जर तुम्ही १००० रुपये तीस वर्षांसाठी गुंतवत राहिलात तर तुम्हाला हे पैसे काही कोटींत मिळण्याची शक्यता आहे. १००० रुपयांची एसआयपी केली, तुम्हाला १२ टक्के रिटर्न मिळाला तर तुम्हाला तीस वर्षांनी 35,29,914 रुपये मिळतील.
जर या काळात तुम्हाला १५ टक्के रिटर्न मिळाला तर ही रक्कम ७० लाखांवर जाईल. आणि जर का तुम्हाला २० टक्के रिटर्न मिळाला तर ही रक्कम 2,33,60,802 रुपयांवर म्हणजेच सव्वा दोन कोटींवर जाईल. महत्वाचे म्हणजे तुम्हाला या काळात फक्त ३ लाख ६० हजार रुपयेच जमा करावे लागणार आहेत.
लक्षात ठेवण्यासारखे... एसआयपी (SIP) मध्ये तुम्ही महिन्याला कमीतकमी ५०० रुपये गुंतवू शकता. चक्रवाढ व्याज मिळते. आर्थिक सल्लागाराची मदत हे फंड निवडताना घ्यावी. आणि सर्वात महत्वाची बाब म्हणजे म्यूचुअल फंड (Mutual Fund) हा जोखमीचा देखील असतो.