120 टक्के नफा मिळवून देणारी गुंतवणूक; सॉवरेन गोल्ड बाँडचा पर्याय खुला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 09:07 AM2023-06-20T09:07:25+5:302023-06-20T09:17:08+5:30

यावर्षीसाठी गुंतवणूक सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : सोन्याची झळाळी कधीही कमी झालेली नाही आणि सातत्याने यातून नफा मिळतो. प्रत्यक्ष खरेदी न करताही आता सोन्यात गुंतवणूक करता येते. त्यासाठी सॉवरेन गोल्ड बाँडचा पर्याय सरकारनेच उपलब्ध करून दिला आहे. यावर्षीसाठी गुंतवणूक सर्वांसाठी खुली करण्यात आली आहे. त्यासाठी ५ हजार ९२६ रुपये प्रतिग्रॅम एवढी किंमत निश्चित करण्यात आली असून, २३ जूनपर्यंत गुंतवणूक करता येईल.

सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये २४ कॅरेट म्हणजे ९९.९ टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक केली जाते. त्यावर वार्षिक २.५ टक्के एवढे व्याज दिले जाते. पैशांची गरज भासल्यास त्यावर कर्जही घेता येते.

सॉवरेन गोल्ड बाँडमध्ये गुंतवणुकीसाठी ८ वर्षांचा कालावधी आहे. ८ वर्षांनंतर पैसे काढल्यास कोणताही कर लागत नाही. मात्र, त्यापूर्वी कर काढल्यास २०.८ टक्के एवढा दीर्घकालीन भांडवली कर द्यावा लागतो.

हा एक सरकारी बाँड आहे. त्याला डिमॅटच्या स्वरुपात परिवर्ततीत करता येते. आरबीआय हे बाँड जारी करते. सोन्याच्या किमतीएवढीच बाँडची किंमत असते.

‘आयबीजए’ने जाहीर केलेल्या दराच्या आधारे दर ठरतात. नाोंदणी सुरू होण्यापूर्वीच्या आठवड्यातील अखेरच्या तीन दिवसांतील दरांची सरासरी काढली जाते.

एका व्यक्तिला एका आर्थिक वर्षात किमान १ ग्रॅम व जास्तीत जास्त ४ किलो ग्रॅम एवढी गुंतवणूक करता येते. ट्रस्टसाठी मर्यादा २० किलो एवढी आहे.

ही योजना २०१५-१६ मध्ये सादर केली होती. त्यावेळी प्रतिग्रॅम २,६८४ रुपये एवढा होता. यावर्षीच्या योजनेसाठी ५,९२६ रुपये दर आहे. गेल्या सात वर्षांमध्ये १२० टक्के फायदा या योजनेने दिला आहे. सोन्यात दीर्घकालीन गुंतवणूक योग्य राहते आणि जास्त परतावा मिळतो.