..तर आयफोनसाठी खरच किडन्या विकाव्या लागतील? ३ लाखांपर्यंत जाणार किंमत? काय आहे कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:08 IST2025-04-13T12:03:27+5:302025-04-13T12:08:01+5:30

Apple iphone : तुम्ही जर आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी वाईट ठरू शकते. कारण, आयफोनची किंमत दुप्पट होऊ शकते.

स्मार्टफोनमध्ये 'आयफोन' हा स्टेटस सिम्बॉल मानला जातो. बहुतेक तरुण तो खरेदी करण्यासाठी धडपड करत असतात. तुम्ही देखील आयफोन करण्याचा विचार करत असाल तर तुमचं हे स्वप्न धूसर होण्याची शक्यता आहे.

जगभरात बनवल्या जाणाऱ्या सर्व आयफोनपैकी जवळपास ९० टक्के आयफोन एकट्या चीनमध्ये तयार केले जातात. तोच चीन ज्यावर अमेरिकेने १४५ टक्के कर लादला आहे. याचा अर्थ असा की आता जर तुम्ही चीनमध्ये बनवलेला आयफोन अमेरिकेत आयात केला तर त्याची किंमत पूर्वीपेक्षा जास्त असेल.

या टॅरिफच्या भितीमुळे, अ‍ॅपलने भारतातून अमेरिकन आयफोनचे ६ मोठे कंटेनर आयात केले आहेत. पण, जर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनवरील आयात शुल्क कमी केले नाही. तर आयफोनची किंमत सध्याच्या किमतीच्या दुप्पट होईल.

आयफोनची निर्मिती अमेरिकेत व्हावी अशी डोनाल्ड ट्रम्प यांची इच्छा आहे. व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेकडे देशात आयफोन तयार करण्यासाठी पुरेसे कामगार आणि संसाधने आहेत.

वास्तविक, यावर कंपनीने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही. पण, विश्लेषकांचा असा दावा आहे, की अमेरिकेत आयफोन बनवण्याचे स्वप्न खूप महागडे ठरू शकते.

कारण, चीनमध्ये कामगार खर्च अमेरिकेच्या तुलनेत फारच कमी आहे. अशा परिस्थितीत आयफोन १६ प्रोची सध्याची किंमत ११९९ डॉलर आहे. यात कामगार खर्चात वाढ झाल्यास त्याची किंमत २५ डॉलरने वाढेल. या वाढीसह, आयफोन १६ प्रोची किंमत १५०० डॉलर्स होईल. अमेरिकेत बनवलेल्या आयफोन १६ प्रोची किंमत ३५०० डॉलर (३.०१ लाख रुपये) असेल.

सध्या अ‍ॅपल कंपनीचे सर्व स्मार्टफोन चीन आणि भारतासारख्या देशांमध्ये तयार होत आहे. ती सर्व व्यवस्था अमेरिकेत उभी करणे वाटतं तितके सोपे नाही. यासाठी कंपनीला मोठा खर्च करावा लागेल. या सर्वांचा परिणाम आयफोनच्या किमतीवरही पाहायला मिळेल.