IRCTC Shares : केवळ १० दिवसांत उडला गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावरील रंग; ३० हजार कोटींचा झटका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2021 09:46 AM2021-10-30T09:46:00+5:302021-10-30T09:51:33+5:30

IRCTC Share Price : काही दिवसापूर्वी गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या या शेअरनं आता त्यांना दिला मोठा झटका.

IRCTC Share Price : १९ ऑक्टोबर २०२१ हा दिवस इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशनसाठी (IRCTC) ऐतिहासिक होता. या दिवशी IRCTC च्या शेअरनं ६३९३ रूपयांचा आजवरचा उच्चांकी स्तर गाठला होता. तर कंपनीचं मार्केट कॅपही १ लाख कोटी रूपयांच्या वर गेलं होतं.

शेअर बाजारात एन्ट्री घेतल्यानंतर दोन वर्षांच्या आतच IRCTC च्या शेअर्सनं आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं होतं. परंतु आता गेल्या दहा दिवसांपासून परिस्थिती अगदी निराळी आहे.

या दरम्यान गुंतवणूकदारांना ३० हजार कोटी रूपयांपेक्षाही अधिक नुकसान झालंय. तर दुसरीकडे IRCTC Stock Split नं गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण केला आहे. चक्क १० दिवसांमध्येच गुंतवणूकदारांच्या चेहऱ्यावरचा रंग उडला आहे.

ऑल टाईम हायवर गेल्यानंतर लगेचच IRCTC च्या शेअर्सच्या दरात सातत्यानं घसरण दिसून आली. स्टॉक स्प्लिटपूर्वी कंपनीचा शेअर घसरून ४२०० रूपयांच्या स्तरावर पोहोचला होता. यामुळे गुंतवणूकदारांच्या नेट प्रॉफिटमध्येही घसरण झाली.

याचदरम्यान २८ ऑक्टोबर रोजी IRCTC स्टॉक स्प्लिट लागू झाला. सामान्यत: हे पाऊल छोट्या गुंतवणूकदारांचं हित पाहून घेतलं जातं. यामुळे ज्या शेअर्सची किंमत जास्त असते ते छोट्या गुंतवणूकदारांनाही खरेदी करता येतात. उदा. यापूर्वी IRCTC च्या शेअरचा दर ४२०० रूपये होता. परंतु स्टॉक स्प्लिटनंतर तो ९०० रूपयांपेक्षाही कमी झाला.

"जेव्हा कोणतीही कंपनी स्टॉक स्प्लिटची घोषणा करते तेव्हा किरकोळ गुंतवणूकदार शेअर्सची किंमत कमी झाली हा चुकीचा विचार करून ती खरेदी करतात. परंतु स्टॉक स्प्लिट ही केवळ शेअर्सची संख्या वाढवतं, याचा अर्थ तो शेअर स्वस्त झाला असा होता नाही," अशी प्रतिक्रिया झीरोदाचे संस्थापक नितीन कामथ यांनी दिली.

"याचा कंपनीच्या फंडामेंटलवर कोणताही परिणाम होत नाही," असंही ते म्हणाले. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांचे शेअर स्प्लिट झाले त्यांच्या नेट व्हॅल्यूमध्ये कोणतेही बदल झालेले नाही. परंतु त्यांच्याकडे असलेल्या स्टॉकची संख्या मात्र वाढली आहे.

स्टॉक स्प्लिटनंतर छोट्या गुंतवणूकदारांना शेअर्स खरेदी करणं सोपं झालं असलं तरी IRCTC च्या शेअर्सची घसरण सुरूच आहे. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या घसरणीमागे नफेखोरी हेदेखील मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

शुक्रवारी कामकाजाच्या दरम्यान IRCTC चे शेअर्स (IRCTC Shares) जबरदस्त आपटले होते. कामकाजाच्या सुरूवातीच्या टप्प्यात आयआरसीटीसीच्या शेअर्सला लोअर सर्किटही लागलं होतं. सरकारनं कंपनीला आपल्या बेवसाईटवरून येणाऱ्या सेवा शुल्काच्या रूपात येणाऱ्या महसूलातील ५० टक्के रक्कम देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आयआरसीटीच्या शेअर्समध्ये जबरदस्त घरसण दिसून आली होती. परंतु शुक्रवारी रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर शेअर्समध्ये पुन्हा वाढ झाली.

दीपम (DIPAM) च्या सचिवांनी यासंदर्भात एक ट्वीट करत माहिती दिली. "रेल्वे मंत्रालयानं आयआरसीटीसीच्या सेवा शुल्कावरील निर्णय मागे घेण्याची घोषणा केली आहे," असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं. गुरूवारी Stock Split नंतर १० टक्क्यांपेक्षा अधिक वर गेलेला आयआरसीटीसीचा शेअर शुक्रवारी सकाळी कामकाजादरम्यान २५ टक्क्यांपर्यंत खाली आला. आयआरसीटीच्या शेअरला ६८५.१५ रूपयांचं लोअर सर्किटही लागलं होतं.

सरकारनं भारतीय रेल्वेच्या ऑनलाइन शाखेला आपल्या इंटरनेट बुकिंगच्या सेवा शुल्काचा अर्धा हिस्सा शेअर करण्याचे निर्देश दिले होते. आयआरसीटीला रेल्वे मंत्रालयासोबत आपल्या वेबसाईटवरून येणाऱ्या बुकिंगमधून सेवा शुल्काच्या स्वरूपात मिळणाऱ्या महसूलाचा ५० टक्के सेवा शुल्काच्या रूपात शेअर करण्यास सांगण्यात आलं होतं. ही प्रक्रिया कोरोना महासाथीनंतर बंद करण्यात आली होती. परंतु हे माहिती समोर येताच आयआरसीटीसीचे शेअर्स आपटले होते.

शुक्रवारी सरकारनं आपला आदेश मागे घेतला असला तरी त्यानंतरही बीएसई इंडेक्सवर आयआरसीटीसीच्या शेअरचा दर ७.४५ टक्क्यांनी घसरून ८४५.६५ रूपयांवर आला. कंपनीचं मार्केट कॅपही आता ६७,६५२ कोटी रूपये झालं आहे.