LICने नोंदवला १५ हजार कोटींचा निव्वळ नफा! आता शेअर घेणे फायद्याचे की तोट्याचे? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 02:52 PM2022-11-14T14:52:17+5:302022-11-14T14:56:49+5:30

दीर्घ पडझडीनंतर आता LIC शेअरमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, हा शेअर घ्यावा की नाही, याबाबत तज्ज्ञांचे मत जाणून घ्या...

देशातील विश्वासार्ह विमा कंपनी म्हणून LIC कडे पाहिले जाते. नाना प्रकारच्या तसेच वैविध्य असलेल्या पॉलिसी एलआयसी सादर करत असते. कोट्यवधी देशवासी याचा लाभ घेत असतात. मात्र, शेअर मार्केटमध्ये एलआयसीला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही.

LIC चा स्टॉक यावर्षी १७ मे रोजी शेअर बाजारात ८६७ रुपयांवर सूचिबद्ध झाला होता. ९४९ रुपयांच्या इश्यू किमतीच्या तुलनेत आठ टक्के सूट दिली होती. मात्र, शेअर सूचिबद्ध झाल्यापासून त्यात सातत्याने घसरण पाहायला मिळत आहे. एलआयसीच्या शेअरची ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत ५८८ रुपये होती. मात्र, आता एलआयसीचे शेअर वाढताना दिसत आहेत.

देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) ने आर्थिक वर्ष २०२२-२३ च्या दुसऱ्या तिमाहीचे (Q2FY23) निकाल सादर केले. सप्टेंबर तिमाहीत एलआयसीच्या नफ्यात जबरदस्त वाढ नोंदवली आहे. एलआयसीला दुसऱ्या तिमाहीत १५,९५२ कोटी रुपयांचा नफा झाला.

सप्टेंबर तिमाहीत एलआयसीचा निव्वळ नफा अनेक पटींनी वाढून १५,९५२ कोटी झाला आहे. विमा कंपनीने मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत १,४३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. एप्रिल ते जून या तिमाहीत विमा कंपनीचा निव्वळ नफा ६८२.९ कोटी रुपये होता.

एलआयसीचे एकूण प्रीमियम उत्पन्न दुसर्‍या तिमाहीत १,३२,६३१.७२ कोटी झाले, जे मागील वर्षीच्या माहीत रु. १,०४,९१३.९२ कोटी होते. ब्रोकरेज हाऊस आयसीआयसीआय सिक्युरिटीजने म्हटले आहे की, एलआयसी भारतीय विमा बाजारातील आघाडीची कंपनी आहे.

चांगल्या निकालानंतर, ब्रोकरेज फर्म आयसीआयसीआय सिक्युरिटीजने एलआयसीच्या शेअर्सवर खरेदी सल्ला दिला आहे. कंपनीचा आर्थिक वर्ष २०२२ पर्यंत एकूण बाजारातील हिस्सा ४४ टक्के आहे. ब्रोकिंग फर्मने एलआयसी शेअरची लक्ष्य किंमत ९१७ रुपये प्रति शेअर ठेवली आहे.

एलआयसीचा शेअर ११ नोव्हेंबर २०२२ रोजी ६२८.०५ रुपयांवर बंद झाला. या शेअरमध्ये आणखी ४६ टक्क्यांपर्यंत पर्यंत वाढ होऊ शकते. आताच्या घडीला एलआयसीचा शेअर ६६५.१० रुपयांवर आहे. अलीकडेच शेअरने ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला होता.

दरम्यान, देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचा एकूण एनपीए ३० सप्टेंबर रोजी २६,१११ कोटी रुपये होता, जो जूनमध्ये संपलेल्या तिमाहीत २६,६१९ कोटी रुपये होता. गेल्या वर्षी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत हा आकडा २८,९२९ कोटी रुपये होता. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटी सकल NPA प्रमाण पहिल्या तिमाहीत ५.८४ टक्क्यांवरून ५.६० टक्क्यांवर आला.

एक वर्षापूर्वी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत तो ६.५७ टक्के होता.जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत पहिल्या वर्षाच्या प्रीमियममधून मिळणारे उत्पन्न ११.३ टक्क्यांनी वाढून ९१२५ कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती कंपनीने दिली आहे. सिंगल प्रीमियम ६२ टक्क्यांनी वाढून ६६,९०१ कोटी रुपये झाला आहे.