टाटा, अदानी, महिंद्रा अन्... इस्रायल-इराण युद्धामुळे 'या' 10 भारतीय कंपन्यांचे मोठे नुकसान By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2024 03:04 PM 2024-10-04T15:04:50+5:30 2024-10-04T15:12:18+5:30
Israel-Iran War Impact: इस्रायल-इराणी यांच्यातील वाढत्या संघर्षाचा परिणाम इतर देशांनाही भोगावा लागतोय. Israel-Iran War Impact: मध्य-पूर्वेतील तणाव (Middle East Crisis) दिवसेंदिवस वाढतोय. आधी इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाले, नंतर इस्रायल-लेबनॉन आणि आता इस्रायल-इराण यांच्यात संघर्ष पेटला आहे. या परिस्थितीमुळे संपूर्ण जगाचे लक्ष या संघर्षाकडे लागले आहे. युद्धाचे परिणाम या देशांसोबतच इतर देशांनाही भोगावे लागत आहेत. अमेरिकेपासून भारतापर्यंतचे शेअर बाजार ढवळून निघाले आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत (Crude Oil Price Hike) वाढ झाल्याने चिंता आणखी वाढली आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर, इस्रायलमध्ये व्यवसाय करणाऱ्या अनेक कंपन्या इस्रायल-इराण युद्धामुळे चिंतेत आहेत.
टाटा ते अदानी...अनेकांच्या व्यवसायावर परिणाम- इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारात घबराट पसरली आहे. गुरुवारच्या व्यवहारात Sensex 1769 अंकांनी आणि Nifty 546 अंकांनी घसरला, तर शुक्रवारीही बाजार घसरणीसह सुरू झाला. या युद्धामुळे सुमारे 14 भारतीय कंपन्यांच्या व्यवसायावर परिणाम हो आहे. यामध्ये टाटा समूहातील कंपन्यांपासून ते अदानी समूहातील कंपन्यांचाही समावेश आहे. युद्धाचा फटका या कंपन्यांच्या शेअर्सवर पडू लागला आहे.
14 पेक्षा जास्त कंपन्यांचा मोठा व्यवसाय- मीडिया रिपोर्ट्सनुसार, इस्रायलमध्ये 14 हून अधिक भारतीय कंपन्या व्यवसाय करतात. यामध्ये अदानी समूहाची अदानी पोर्ट, फार्मा क्षेत्रातील सनफार्मा, ज्वेलरी क्षेत्रातील कल्याण ज्वेलर्स, टाटा समूहाची टायटन, टीसीएस, विप्रो, टेक महिंद्रा...अशा मोठ्या कंपन्यांच्या समावेश आहे.
हैफा बंदरात गौतम अदानी यांची मोठी गुंतवणूक- इस्रायलशी संबंध असलेल्या सर्वात प्रमुख भारतीय कंपन्यांपैकी अदानी पोर्ट्सचा इस्रायलच्या सर्वात व्यस्त बंदरांपैकी एक असलेल्या हैफा बंदरात मोठा हिस्सा आहे. वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी अदानी पोर्ट्सचे शेअर्स सुमारे 3 टक्क्यांनी घसरले. याशिवाय इस्रायली तारो फार्मास्युटिकल्समधील मोठा भागधारक असलेल्या सन फार्मास्युटिकल्सलाही याचा फटका बसू शकतो. फार्मा क्षेत्रातील इतर कंपन्यांमध्ये डॉ. रेड्डीज आणि ल्युपिन यांचाही समावेश आहे, ज्यांचे तेल अवीवस्थित फार्मा दिग्गज तेवा फार्मास्युटिकलशी संबंध आहेत.
दागिन्यांपासून ते आयटीपर्यंत टाटांचा व्यवसाय- इस्रायलमध्ये व्यवसाय करणाऱ्या भारतीय कंपन्यांच्या यादीतील पुढचे मोठे नाव टाटा समूहाचे आहे. ज्यांचा व्यवसाय ज्वेलरी क्षेत्रापासून ते आयटी क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे. इराण आणि इस्रायलमधील युद्ध वाढले, तर टायटन आणि टीसीएसच्या व्यवसायावर परिणाम होऊ शकतो. कल्याण ज्वेलर्सदेखील इस्रायलमध्ये आहे. इस्रायलमधील बड्या कंपन्यांना आयटी सेवा देणाऱ्या विप्रो आणि टेक महिंद्रा याही युद्ध परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत.
बँकिंग आणि खाणकाम क्षेत्रालाही फटका- इराण आणि इस्रायलमधील संघर्ष वाढण्याच्या भीतीने बँकिंग आणि खाण क्षेत्रात खळबळ उडाली आहे. देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) देखील इस्रायलमध्ये आहे. खाण क्षेत्रातील बड्या कंपन्यांपैकी एक असलेल्या लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चा व्यवसायही तेथे पसरला आहे. एशियन पेंट्स आणि बर्जर पेंट्सच्या उत्पादनांनाही इस्रायलमध्ये मोठी मागणी आहे, पण वाढत्या तणावामुळे या कंपन्यांचे शेअर्स मागील व्यवहाराच्या दिवशी 3-4% नी घसरले.